IND vs BAN : बांगला देशला हरवून भारताची उपांत्य फेरीकडे वाटचाल

अँटिग्वा; वृत्तसंस्था : टी-20 वर्ल्डकप 2024 च्या सुपर-8 फेरीत भारताने बांगला देशला हरवून उपांत्य फेरीतील प्रवेश जवळपास निश्चित केला आहे. भारताने बांगला देशवर 50 धावांनी मोठा विजय मिळवला. फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तिन्ही क्षेत्रांत भारताने सरस कामगिरी करून बांगला देशला हरवले. भारताने प्रथम फलंदाजी करताना 5 बाद 196 धावा केल्या. त्यानंतर बांगला देशला 8 …

IND vs BAN : बांगला देशला हरवून भारताची उपांत्य फेरीकडे वाटचाल

अँटिग्वा; वृत्तसंस्था : टी-20 वर्ल्डकप 2024 च्या सुपर-8 फेरीत भारताने बांगला देशला हरवून उपांत्य फेरीतील प्रवेश जवळपास निश्चित केला आहे. भारताने बांगला देशवर 50 धावांनी मोठा विजय मिळवला. फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तिन्ही क्षेत्रांत भारताने सरस कामगिरी करून बांगला देशला हरवले. भारताने प्रथम फलंदाजी करताना 5 बाद 196 धावा केल्या. त्यानंतर बांगला देशला 8 बाद 146 धावांवर रोखले. भारताने सांघिक कामगिरी करीत हा विजय मिळवला असला, तरी हार्दिक पंड्या (50 धावा), कुलदीप यादव (3 विकेटस्), जसप्रीत बुमराह (2 विकेटस्) यांनी भारताच्या विजयात विशेष योगदान दिले. भारताचा सुपर-8 फेरीतील हा सलग दुसरा विजय असून, याआधी त्यांनी अफगाणिस्तानला हरवले होते. यानंतर भारत आता ऑस्ट्रेलियाशी भिडणार आहे.
अँटिग्वाच्या मैदानावर शनिवारी झालेल्या सामन्यात भारताच्या आव्हानाचा पाठलाग करताना बांगला देशने सावध; पण दमदार सुरुवात केली. तांजीद हसन आणि लिट्टन दास यांनी बुमराहला सन्मान दिला, तर अर्शदीपकडून धावा वसूल केल्या. चौथ्या षटकात गोलंदाजीला आलेल्या अक्षरविरुद्ध त्यांनी हात खोलले. या षटकात 11 धावा निघाल्या. त्यानंतर हार्दिक पंड्याला षटकार ठोकल्याने लिट्टन दासचे धाडस वाढले; पण पुढच्याच चेंडूवर त्याने सूर्यकुमार यादवकडे झेल दिला. दासने 13 धावा केल्या. रोहितने बांगला देशवर दबाव वाढवण्यासाठी बुमराहला आणले. त्याने आपले काम जवळपास पूर्ण केले होते; परंतु ऋषभ पंतच्या हातून तांजीदचा झेल सुटला. यावेळी तो 24 धावांवर होता. हा झेल महागात पडला नाही; कारण कुलदीप यादवने 29 धावांवर असताना तांजीदला पायचित पकडले.
कुलदीपचा कहर इतक्यावरच थांबला नाही, त्याने तौहिद हृदोयलाही (4) पायचित केले. वाढत्या धावगतीच्या प्रेशरमध्ये साकिब अल हसन (11) रोहितकडे झेल देऊन परतला. ही विकेटही कुलदीपच्या नावावर लागली. एका बाजूने गळती सुरू असताना कर्णधार नजमूल हुसेन शांटो मात्र तंबू ठोकून उभा होता. हा तंबू उखडण्यासाठी रोहितने आपले ‘बूमरास्त्र’ काढले. बुमराहने शांटोला बाद केले. शांटो 32 चेंडूंत 40 धावा करून परतला. जाकेर अलीने अर्शदीपच्या विकेटच्या कॉलममध्ये 1 चा आकडा लिहिला.
रिशद हुसेनने 1 चौकार, 3 षटकार ठोकून पराभवाचे अंतर कमी केले. याला रोखण्यासाठी शेवटी ‘बूमरास्त्र’च उपयोगी आले. रोहित शर्माकडे झेल देऊन रिशद (24) परतला. अर्शदीपने शेवटच्या षटकात महमुदुल्ला (13) याला अक्षरकरवी बाद केले. शेवटी बांगला देशने 20 षटकांत 8 बाद 146 धावा केल्या.
तत्पूर्वी, बांगला देशने नाणेफेक जिंकून भारतीय संघाला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिले. बांगला देशच्या फिरकीपटूंनी मारा सुरू केला आणि रोहित शर्माने (23) त्यांचा चांगलाच समाचार घेतला; पण साकिब अल हसनने टाकलेल्या चौथ्या षटकात रोहित झेलबाद झाला. विराट कोहली चांगल्या टचमध्ये दिसला आणि त्याचे फटके पाहून चाहते आनंदित झाले. नवव्या षटकात तंजीम हसन साकिबने 3 चेंडूंत भारताला दोन मोठे धक्के दिले. विराट फटका मारण्यासाठी स्टेपआऊट झाला; परंतु चेंडूने त्रिफळा उडवला. विराटने 28 चेंडूंत 1 चौकार व 3 षटकारांसह 37 धावा केल्या. सूर्यकुमार यादवने पहिलाच चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेगला षटकार खेचला; परंतु पुढच्याच चेंडूवर यष्टिरक्षकाच्या हाती झेल देऊन परतला.
ऋषभ पंतने सातत्यपूर्ण कामगिरी सुरूच ठेवताना उत्तुंग फटके खेचले. रिशद हुसेनच्या षटकात चांगली फलंदाजी सुरू असताना ऋषभ रिव्हर्स स्वीप मारण्यासाठी गेला आणि झेलबाद झाला. ऋषभने 24 चेंडूंत 4 चौकार व 2 षटकारांसह 36 धावा केल्या. ऋषभचा हा फटका पाहून डग आऊटमध्ये बसलेला विराट चिडलेला दिसला. यानंतर हार्दिक पंड्या व शिवम दुबे यांनी 34 चेंडूंत 53 धावांची भागीदारी केली अन् रिशद हुसेनने शिवमची (34 धावा, 24 चेंडू, 3 षटकार) विकेट मिळवली. हार्दिकने 27 चेंडूंत 4 चौकार व 3 षटकारांसह नाबाद 50 धावा केल्या आणि भारताला 5 बाद 196 धावांपर्यंत पोहोचवले.