कल्याणमध्ये दोन महिलांकडून सॉफ्टवेअर इंजिनिअरला 40 लाखांचा गंडा

कल्याणमध्ये दोन महिलांकडून सॉफ्टवेअर इंजिनिअरला 40 लाखांचा गंडा

डोंबिवली, Bharat Live News Media वृत्तसेवा : कल्याण पूर्व भागात राहणाऱ्या एका 25 वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनिअरची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. अर्धवेळ नोकरीचे अमिष दाखवून दोन महिलांनी युवकाची 40 लाख 40 हजार रुपयांची फसवणूक केली आहे. यानंतर युवकाने कोळसेवाडी पोलिस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल केला. प्रतिक अरविंद सिंग (वय.25, रा. माधुरी हॅप्पीहोम, हनुमाननगर, कल्याण-पूर्व) असे फसवणूक झालेल्या युवकाचे नाव आहे.
ही घटना दि. 6 ते 16 जून या 10 दिवसांच्या कालावधीत हा फसवणुकीचा प्रकार घडला. या संदर्भात पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, प्रतिक सिंग हा सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. पंधरा दिवसांपूर्वी घरी असताना त्यांना प्रिया आणि अविका मिश्रा या अनोळखी महिलांनी प्रतिकशी मोबाईलच्या माध्यमातून संपर्क साधला. ऑनलाईन माध्यमातून अर्धवेळ नोकरी मिळवून देण्याचे त्याला आमिष दाखविले. घरबसल्या अर्धवेळ नोकरी मिळते, या आशेने प्रतिकने चौकशी न करता विश्वास ठेवून त्या महिलांना आपली माहिती दिली.
यानंतर महिलांनी प्रतिकला व्हॉट्सॲप आणि टेलिग्रामच्या माध्यमातून संपर्क करून त्याला एक लिंक पाठवली. या लिंकच्या माध्यमातून गुंतवणुकीचे पर्याय पाठवले. त्या माध्यमातून प्रतिकला महिलांनी टप्प्याने गुंतवणूक करण्यास भाग पाडले. गुंतवणूकीचा गुणांक वाढेल त्याप्रमाणे चांगला नफा मिळेल असे अमिष संशयित आरोपी प्रिया आणि अविका यांनी प्रतिकला दाखविले. यानंतर प्रतिकच्या बँक खात्यातील पैसे त्यांनी स्वत:च्या अज्ञात बँक ट्रान्सफऱ केले. यानंतर त्या महिलांनी प्रतिकला प्रतिसाद देणे बंद केले.
अर्धवेळ नोकरी तर नाहीच, शिवाय गुंतवणूक केलेल्या रकमेवर अधिकचा परतावा मिळत नाही. गुंतवणूक केलेली मूळ रक्कम आरोपी महिला परत करत करणार, लक्षात आल्यानंतर या महिलांनी आपली फसवणूक केल्याची प्रतिकला खात्री पटली. यानंतर कोळसेवाडी पोलिसांनी माहिती व तंत्रज्ञान अंतर्गंत याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पोलिस निरीक्षक गणेश न्हायदे या प्रकरणाचा चौकस तपास करत आहेत.
अज्ञातांवर विश्वास का ठेवता? : पोलिस प्रशासन
गेल्या महिनाभरात कल्याण-डोंबिवलीतील दहाहून अधिक नागरिकांची वेगवेगळ्या लोकांनी वेगवेगळी कारणे सांगून ऑनलाईन गुंतवणुकीद्वारे लाखो रूपयांची फसवणूक केली आहे. या प्रकरणांची सध्या चौकशी सुरू आहे. प्रत्यक्ष भेटणारे अनोळखीच नव्हे तर ऑनलाईनद्वारे अप्रत्यक्ष संपर्क साधणाऱ्या अज्ञातांवर विश्वास ठेवणे म्हणजे फसवणुक होणे अटळ असते. त्यामुळे अशा लोकांच्या बोलण्यावर विश्वास का ठेवता ? असा सवाल पोलिसांकडून उपस्थित करण्यात येत आहे.
हेही वाचा :

जळगाव : तरूणाची पॉलीसीची रक्कम देण्याच्या नावाखाली फसवणूक
कोल्हापूर : वाठारच्या शरण्या निधी बँकेकडून २१ लाखांची फसवणूक
आमगावात शेअर मार्केटचे अमिष दाखवून 3 कोटींची फसवणूक