‘महाविकास’सह महायुतीतही जागावाटपाचा संघर्ष

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : विधानसभा निवडणुकीसाठी कोल्हापूर उत्तरमध्ये उमेदवारीसाठी महाविकास आघाडी व महायुतीमध्ये जागावाटपावरून तीव्र संघर्ष होण्याची चिन्हे आहेत. कोल्हापूर उत्तर मतदारसंघ सध्या काँग्रेसकडे आहे. मात्र, तेथे शिवसेना ठाकरे गटाची मागणी आहे; तर 2019 तसेच पोटनिवडणुकीत भाजपचा उमेदवार लढल्यामुळे भाजपचा या मतदारसंघावर दावा असेल. तर, यापूर्वीचे विजयाचे दाखले देत शिंदे शिवसेना आक्रमकपणाने या मतदारसंघावर दावा …

‘महाविकास’सह महायुतीतही जागावाटपाचा संघर्ष

कोल्हापूर; Bharat Live News Media वृत्तसेवा : विधानसभा निवडणुकीसाठी कोल्हापूर उत्तरमध्ये उमेदवारीसाठी महाविकास आघाडी व महायुतीमध्ये जागावाटपावरून तीव्र संघर्ष होण्याची चिन्हे आहेत. कोल्हापूर उत्तर मतदारसंघ सध्या काँग्रेसकडे आहे. मात्र, तेथे शिवसेना ठाकरे गटाची मागणी आहे; तर 2019 तसेच पोटनिवडणुकीत भाजपचा उमेदवार लढल्यामुळे भाजपचा या मतदारसंघावर दावा असेल. तर, यापूर्वीचे विजयाचे दाखले देत शिंदे शिवसेना आक्रमकपणाने या मतदारसंघावर दावा सांगणार आहे.
कोल्हापूर उत्तरमध्ये 2019 च्या निवडणुकीत काँग्रेसचे चंद्रकांत जाधव यांनी विजय मिळविला व शिवसेनेच्या ताब्यातून हा मतदारसंघ आपल्याकडे खेचून घेतला. त्यांच्या अकाली निधनाने झालेल्या पोटनिवडणुकीत त्यांच्या पत्नी जयश्री जाधव या निवडून आल्या. त्यांनी भाजप उमेदवाराचा पराभव केला. भाजपने फार मोठी ताकद या निवडणुकीत लावली होती, तरी त्यांना विजय मिळविता आला नाही. भाजपचे मताधिक्य वाढले; पण विजय मिळाला नाही.
2019 च्या निवडणुकीत काँग्रेसचे चंद्रकांत जाधव हे शिवसेनेचे राजेश क्षीरसागर यांचा पराभव करून निवडून आले होते. त्यावेळी जाधव यांना 91 हजार 53 मते मिळाली होती; तर क्षीरसागर यांना 75 हजार 854 मते मिळाली होती. जाधव यांच्या अकाली निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत त्यांच्या पत्नी जयश्री जाधव निवडून आल्या आहेत. त्यांनी भाजपचे सत्यजित कदम यांचा पराभव केला. अत्यंत चुरशीने झालेल्या या पोटनिवडणुकीत भाजपने राज्यातील नेत्यांची मोठी फौज प्रचारात उतरवली होती. भाजपच्या आमदारांना प्रचारासाठी महापालिकेचे प्रभाग देऊन प्रचाराचे सूक्ष्म नियोजन केले होते. तरीही काँग्रेसने ही जागा कायम राखली. जयश्री जाधव यांना 97 हजार 332 मते मिळाली, तर सत्यजित कदम यांना 78 हजार 25 मते मिळाली होती.
आताच्या निवडणुकीला वेगळे संदर्भ आहेत. कोल्हापूर उत्तरमधून विद्यमान आमदार काँग्रेसचे आहेत. त्यामुळे काँग्रेसचा या जागेवर हक्क आहे. जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष सतेज पाटील हे या मतदारसंघावरील आपला दावा सोडणार नाहीत; पण लोकसभा निवडणुकीत शिवसेनेची जागा असताना शिवसेनेने ती काँग्रेसला दिल्याच्या बदल्यात आता शिवसेना ठाकरे गट या जागेवर मागणी करणार आहे. लोकसभेला आमचा हक्क सोडला, आता आम्हाला ही जागा हवी, अशी मागणी ठाकरे शिवसेनेकडून येऊ शकते. त्यासाठी यापूर्वी शिवसेनेच्या पाच वेळच्या विजयाचे दाखले दिले जाऊ शकतात, तर काँग्रेसनेही येथून चारवेळा विजय मिळविला आहे.
महायुतीतही असेच आहे. तेथे शिवसेना पाच वेळच्या विजयाचा दाखला देऊ शकते. राज्य नियोजन मंडळाचे कार्याध्यक्ष राजेश क्षीरसागर मैदानात उतरण्याच्या तयारीत आहेत; तर 78 हजार मतांच्या बळावर भाजप या मतदारसंघावर दावा सांगणार आहे.
कोल्हापूर उत्तरच्या निवडणुकीला कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीचा संदर्भ आहे. विधानसभेनंतर कोल्हापूर महापालिकेची निवडणूक होणार आहे. कोल्हापूर महापालिकेवरील वर्चस्वासाठी सतेज पाटील विरुद्ध धनंजय महाडिक असा सामना होणारच आहे. हे नेते ज्या पक्षात ती त्यांची आघाडी. त्यामुळे सतेज पाटील हे महाविकास आघाडीचे, तर धनंजय महाडिक हे महायुतीचे नेतृत्व करणार, यात शंका नाही.
महापालिकेवरील वर्चस्वासाठी आघाडी-युतीत ठिणगी?
कोल्हापूर महापालिकेची सत्ता हा समान धागा यामध्ये आहे. काँग्रेसला तसेच भाजपला महापालिकेवरील वर्चस्वासाठी ‘कोल्हापूर उत्तर’ हवे आहे; तर दोन्ही शिवसेनांनाही त्यासाठीच जागा हवी आहे. कोल्हापूर लोकसभेच्या बदल्यात विधानसभा आम्हाला, अशी मागणी ठाकरे शिवसेनेकडून केली जाणार आहे. त्यामुळे महापालिकेवरील वर्चस्वासाठी महाविकास आघाडी-युतीत ठिणगी पडण्याची शक्यता आहे.