मातृभक्षक! आईचा खून करून त्याने….

‘स्वामी तिन्ही जगाचा, आईविना भिकारी’, असं म्हटलं जातं. पण, त्याच आईच्यापोटी सैतानानं जन्म घेतला, तर काय? नऊ महिने पोटात सांभाळलेल्या, लहानाचा मोठा केलेल्या मुलानं आईचा खून केला. केवळ खून करूनच तो थांबला नाही, तर प्रत्यक्ष क्रौर्याचा सुध्दा भीतीने थरकाप उडेल, असे कृत्य त्याने केले. केवल अमानवी एवढ्या एकाच शब्दात त्याचं वर्णन करावं लागेल. या नराधम …

मातृभक्षक! आईचा खून करून त्याने….

शीतल पाटील, सांगली

‘स्वामी तिन्ही जगाचा, आईविना भिकारी’, असं म्हटलं जातं. पण, त्याच आईच्यापोटी सैतानानं जन्म घेतला, तर काय? नऊ महिने पोटात सांभाळलेल्या, लहानाचा मोठा केलेल्या मुलानं आईचा खून केला. केवळ खून करूनच तो थांबला नाही, तर प्रत्यक्ष क्रौर्याचा सुध्दा भीतीने थरकाप उडेल, असे कृत्य त्याने केले. केवल अमानवी एवढ्या एकाच शब्दात त्याचं वर्णन करावं लागेल. या नराधम पुत्राच्या कृत्यानं कोल्हापूरच नव्हे, तर संपूर्ण राज्याला हादरा बसला होता…
कोल्हापुरातील कावळा नाका परिसरातील वसाहतीत यल्लव्वा रामा कुंचीकोरवी (वय 62) या राहत होत्या. सर्वजण त्यांना चवळीअप्पा नावाने हाक मारत. यल्लव्वा यांचे पती कोल्हापूर महापालिकेकडे माळी होते. त्यांचं निधन झालेलं होतं. त्यांच्या पेन्शनवर यल्लव्वा यांचा उदरनिर्वाह सुरू होता. त्यांना दोन मुलं. दोन्ही मुलं त्याच वसाहतीत विभक्त राहत होती. लहान मुलगा सुनील (वय 35) हा पत्नी, दोन मुली, एक मुलगा यांच्यासोबत राहत होता. त्याला दारूचं व्यसन होतं. दारूच्या पैशासाठी तो पत्नीला मारहाण करी. या त्रासाला कंटाळून ती मुलांसह माहेरी मुंबईला निघून गेलेली होती. मुलाच्या पोटाचे हाल होतात, म्हणून यल्लव्वाच त्याला जेवण बनवून खाऊ घालत असत. शेवटी आईचं काळीज मुलासाठी तुटत होतं. पण, सुनीलला आईच्या उपकाराची कसलीच जाणीव नव्हती. तो पेन्शनच्या पैशासाठी तिच्याशी भांडण करायचा.
28 ऑगस्ट 2017 चा तो दिवस यल्लव्वा यांच्यासाठी शेवटचाच ठरला. सुनीलनं आईकडं पैसे मागितले. पण, तिने नकार देताच त्याने आईवर चाकूने सपासप वार केले. यल्लव्वा रक्ताच्या थारोळ्यात निपचित पडल्या. आतडी, पोटातील भाग बाहेर आलेला. शेजारी राहणार्‍या आठ वर्षाच्या मुलीने हा प्रकार पाहिला. तिने यल्लव्वा यांचा मोठा मुलगा राजू याला हा प्रकार सांगितला. तो धावतच आईच्या घरी आला. आई मृतावस्थेत, तर भाऊ रक्ताने माखलेला. तोही हादरला. त्यानं भावाच्या कानशिलात लगावली. तोपर्यंत घराबाहेर लोकांची तोबा गर्दी. सुनील पळून जाण्याच्या तयारीत होता, पण लोकांनी त्याला पकडून ठेवले.
शाहूपुरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक संजय मोरे पथकासह घटनास्थळी आले. घटनास्थळाची पाहणी करताना पोलिसही चक्रावून गेले. आधी सुनीलला ताब्यात घेऊन पोलिस ठाण्यात हलविले. घरात सर्वत्र रक्ताचा सडा पडला होता. पोलिस स्वयंपाकघरात गेल्यानंतर मात्र हृदय पिळवटून टाकणारं दृश्य दिसलं. एका तव्यात हळद, चटणी आणि रक्त, मांसाचा काही अंश दिसून आला. यावरून आरोपीने मृताच्या शरीराचे काही भाग शिजवून खाल्ले असावेत, असा संशय निरीक्षक संजय मोरे यांना आला. पंचनामा करून मृतदेह विच्छेदनासाठी सीपीआरला हलविला.
सुनीलचे रक्ताने माखलेले कपडे पंचांसमक्ष जप्त केले. त्याच्या सर्वांगावर रक्त लागल्यानं त्याचे नेलक्लिपिंग घेण्यात आले. आरोपीने आईचे मांस खाल्ले असल्याचे गृहित धरून त्याची उलटी काढून, तो स्टमक वॉशदेखील तपासणीसाठी पुणे येथील न्यायवैज्ञानिक प्रयोगशाळेकडे पाठविला. यल्लव्वाच्या डीएनएशी ते तंतोतंत जुळून आले.
पोलिस निरीक्षक संजय मोरे, हवालदार तानाजी चौगुले यांनी याचा तपास करून सत्र न्यायालयात आरोपीविरुद्ध दोषारोपपत्र दाखल केले. आईचा खून करून तिचे मांस शिजवून खाण्याच्या प्रकाराने कोल्हापुरात संतापाची लाट उसळली. माणुसकीला लाजवेल अशा या घृणास्पद घटनेने आई व मुलाच्या नात्याला काळिमा फासला होता.
आरोपीला फाशीची शिक्षा
पोलिस निरीक्षक संजय मोरे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने यल्लव्वा कुंचीकोरवी यांच्या खुनाचा तपास करून वस्तुनिष्ठ व तांत्रिक पुराव्याच्याआधारे न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. चार वर्षे या खटल्याची सुनावणी सुरू होती. न्यायालयाने आरोपी सुनील याला 2021 मध्ये फाशीची शिक्षा सुनावली. कोल्हापूर न्यायालयाने सुनावलेली ही दुसरी फाशीची शिक्षा होती.
हेही वाचा 

Pudhari Crime Diary : कुटुंब कलह : पहिला आघात महिलांवरच!
Pudhari Crime Diary : ‘एका स्क्रू’मुळे उलगडली ‘मर्डर मिस्ट्री’! एका अफलातून पोलिस तपासाची अद्भूत कहाणी
Pudhari Crime Diary : पत्नीसोबत मित्राचे प्रेमसंबंध असल्याचं संशयाचं भूत! अन् चौघांच्या आयुष्याची राखरांगोळी