आरशात स्वतःला पाहून बिबट्याने मारला पंजा!

आरशात स्वतःला पाहून बिबट्याने मारला पंजा!

नवी दिल्ली : वन्यप्राणी नदी-तलावात पाणी पीत असताना स्वतःचे प्रतिबिंबही पाहत असतात. मात्र, एखाद्या वन्यप्राण्याने जंगलात ठेवलेल्या मोठ्या आरशात स्वतःचे प्रतिबिंब पाहिलेले असत नाही. अचानक आपल्यासारखाच आणखी एक प्राणी समोर आला असल्याची भावना त्यांना होते आणि ते स्वसंरक्षणासाठी सज्ज होतात. अशीच एक प्रतिक्रिया आता पाहायला मिळाली आहे. जंगलात ठेवलेल्या आरशात स्वतःची छबी पाहून एक बिबट्या गोंधळला आणि त्याने गुरगुरत आरशाला पंजा मारला!
वन्यजीवनाबाबतचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियात शेअर केले जात असतात. असाच एक व्हिडीओ ‘एक्स’वर शेअर करण्यात आला असून, तो व्हायरलही झाला आहे. तो नेमका कुठला आहे हे कळण्यास मार्ग नसला, तरी बिबट्याचा झालेला गोंधळ पाहून अनेकांना गंमत वाटली. एका जंगलात वन्यप्राण्यांची प्रतिक्रिया पाहण्यासाठी हा आरसा ठेवण्यात आला होता.
त्यावेळी कुठून तरी हा पूर्ण वाढ झालेला बिबट्या तिथे आला आणि त्याने स्वतःला आरशात पाहिले. इतक्या जवळ कुणी तरी दुसराच तिथे असल्याचे पाहून तो गोंधळला आणि त्याने मागील दोन पायांवर आक्रमणाच्या मुद्रेत उभे राहत पंजा मारला! या व्हिडीओला दिलेल्या कॅप्शनमध्ये म्हटले आहे, ‘स्वतःला आरशात पाहिल्यावर बिबट्याची प्रतिक्रिया.’ पंधरा सेकंदांची ही क्लिप 8.70 लाखांपेक्षा अधिक वेळा पाहिली गेली आहे. अठरा हजार यूझर्सनी तिला लाईक केले व अनेकांनी त्यावर प्रतिक्रियाही दिल्या.