एक घास ‘३२ वेळा’ चावून खाण्याचे फायदे काय?

एक घास ‘३२ वेळा’ चावून खाण्याचे फायदे काय?

नवी दिल्ली : आपण नेहमी वयस्कर व्यक्तींकडून ऐकत आलो आहोत की, जेवण करताना घास नेहमी 32 वेळेस चावून खावा. अनेकांना वाटते की, तोंडात 32 दात असतात व त्यामुळे असे म्हटले जात असावे. खरे तर 32 वेळेला नसले तरी जेवण चांगल्या प्रकारे चावून खाणे गरजेचे आहे, असेच यामधून सुचवले जात असते. सध्याच्या घाईगडबडीच्या जगात अनेक लोक अक्षरशः बकाबक खाऊन आपल्या कामासाठी धावत असतात. असे घाईगडबडीत खाणे, नीट चावून न खाणे शरीरासाठी हानिकारक ठरत असते. नीट चावून खाल्ले की, जेवणाचा आनंदही मिळतो आणि अन्नात लाळ मिसळून पचनासाठीही मदत होते. एक घास ‘32 वेळा’ चावून खाण्याचे हे काही लाभ…
पाचन तंत्र सुधारते : जेवण जेवढे अधिक चावून खाल, ते तेवढेच छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये बदलते. यामुळे पोटामध्ये पाचन क्रिया सुधारण्यास मदत मिळते. तसेच जेवण चांगल्या प्रकारे पचते. जीवनसत्त्वे आणि खनिजे चांगल्या प्रकारे मिळतात- जेवण चावून खाल्ल्यामुळे जेवणातील पोषकतत्त्वे चांगल्या प्रकारे शोषून घेतली जातात. त्यामुळे शरीराला आवश्यक जीवनसत्त्वे व खनिजे मिळतात. हळूहळू जेवण केल्यास आणि अधिक चावून खाल्ल्यास पोट भरल्याची जाणीव होते व वजन नियंत्रणात राहते.