छोटा शकीलच्या मेव्हण्याचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन

छोटा शकीलच्या मेव्हण्याचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन

मुंबई; Bharat Live News Media वृत्तसेवा : अंडरवर्ल्ड डॉन छोटा शकील याचा मेव्हणा अबु बकर शेख उर्फ आरिफ भाईजान याचे शुक्रवारी जेजे रुग्णालयात हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले.
टेरर फंडीग प्रकरणात आरिफला राष्ट्रीय तपास यंत्रणेने अटक केली होती. यानंतर त्याला आर्थर रोड तुरुंगात ठेवण्यात आले होते. तेथेच आरिफला शुक्रवारी संध्याकाळी हृदय विकाराचा धक्का बसला. यानंतर त्याला तातडीने पोलीस बंदोबस्तात जेजे रुग्णालयात भरती करण्यात आले. तेथे उपचार सुरू असताना त्याला नंतर व्हेंटीलेटरवर ठेवण्यात आले.
मात्र काही वेळातच त्याचे निधन झाले. आरिफ हा छोटा शकीलची बहीण फदमिदाचा पती होता. तो दाऊद टोळीसाठी काम करायचा. डोंगरीत राहणाऱ्या आरिफ विरुध्द खंडणीसाठी धमकी दिल्याचे अनेक गुन्हे दाखल आहेत. खंडणीची ही रक्कम तो दाऊद व शकील यांच्या सांगण्यावरून दहशतवाद्यांना पुरवत असल्याचा आरोप त्याच्यावर होता. २००६ मध्ये तो भारतातून दुबईला पळून गेला होता. यानंतर त्याच्याविरुध्द मुंबई पोलिसांनी लुक आऊट नोटीसही जारी केली होती.