पेपर फोडल्यास १० वर्षे तुरुंगवास, १ कोटी दंड, केंद्राकडून कायदा लागू
Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : नीट (NEET) आणि यूजीसी- नेट (UGC-NET) परीक्षांमधील कथित गैरप्रकारांच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने भविष्यात पेपर फुटीच्या घटना रोखण्यासाठी एक मोठे पाऊल उचलले आहे. सरकारने शुक्रवारी सार्वजनिक परीक्षा (अयोग्य माध्यम प्रतिबंधक) कायदा, २०२४ अधिसूचित केला. देशभरात घेण्यात येणाऱ्या स्पर्धात्मक आणि सामायिक प्रवेश परीक्षांमधील गैरप्रकार रोखण्याचा या कायद्याचा उद्देश आहे.
या वर्षी फेब्रुवारीमध्ये संसदेत मंजूर केलेल्या या कायद्यात फसवणुकीला आळा घालण्यासाठी किमान ३ ते ५ वर्षांच्या तुरुंगवासाच्या शिक्षेची तरतूद आहे. तसेच फसवणुकीच्या संघटित गुन्ह्यांमध्ये सहभाग असलेल्यांना ५ ते १० वर्षांचा तुरुंगवास आणि कमीत कमी १ कोटी रुपयांचा दंडाच्या शिक्षेची तरतूद आहे.