अकरा धरण क्षेत्रांत अतिवृष्टी

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : शहरासह जिल्ह्यात शुक्रवारी पावसाची रिपरिप सुरू होती. सकाळी साडेदहा वाजेयर्पंत गेल्या 24 तासांत अकरा धरणांच्या पाणलोट क्षेत्रात आणि दोन तालुक्यांत अतिवृष्टी झाली. धरण परिसरात सुरू असलेल्या पावसाने धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ सुरू झाली आहे. जिल्ह्यात शुक्रवारी ठिकठिकाणी पावसाने हजेरी लावली. शहर आणि परिसरात दुपारी जोरदार पाऊस झाला. यानंतर अधूनमधून पावसाच्या सरी बरसत …

अकरा धरण क्षेत्रांत अतिवृष्टी

कोल्हापूर; Bharat Live News Media वृत्तसेवा : शहरासह जिल्ह्यात शुक्रवारी पावसाची रिपरिप सुरू होती. सकाळी साडेदहा वाजेयर्पंत गेल्या 24 तासांत अकरा धरणांच्या पाणलोट क्षेत्रात आणि दोन तालुक्यांत अतिवृष्टी झाली. धरण परिसरात सुरू असलेल्या पावसाने धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ सुरू झाली आहे.
जिल्ह्यात शुक्रवारी ठिकठिकाणी पावसाने हजेरी लावली. शहर आणि परिसरात दुपारी जोरदार पाऊस झाला. यानंतर अधूनमधून पावसाच्या सरी बरसत होत्या. जिल्ह्यातही काही भागांत पावसाचा जोर होता. गुरुवारी सकाळी साडेदहा ते शुक्रवारी सकाळी साडेदहा या 24 तासांत जिल्ह्यात सरासरी 31 मि.मी. पावसाची नोंद झाली. गगनबावडा (89.1 मि.मी.) व राधानगरी (74.6 मि.मी.) या दोन तालुक्यांत अतिवृष्टी झाली. भुदरगड (64.4), आजरा (60.9) व चंदगड (56.7) या तीन तालुक्यांतही धुवाँधार पाऊस झाला. शाहूवाडीत 28, गडहिंग्लजमध्ये 26, करवीरमध्ये 18.7, पन्हाळ्यात 15.1, कागलमध्ये 14.6 मि.मी. पाऊस झाला. कोल्हापूर शहरात 11 मि.मी. पाऊस झाला.
सहा ठिकाणी 100 मि.मी.पेक्षा जादा पाऊस
गेल्या 24 तासांत जिल्ह्यातील सात ठिकाणी अतिवृष्टी झाली. यापैकी सहा ठिकाणी 100 मि.मी.पेक्षा जादा पाऊस झाला. राधानगरीत (110.5), सरवडे (111.5), कसबा तारळे (110), गगनबावडा (149), कडगाव (132.3) व गवसे (116.8) मि.मी. पावसाची नोंद झाली. हेरे परिसरात 92.3 मि.मी. पाऊस झाला.
धरण क्षेत्रांत धुवाँधार
जिल्ह्यातील प्रमुख 15 धरणांपैकी 11 धरणांच्या पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी झाली. पाटगाव परिसरात 240 मि.मी., तर घटप्रभा परिसरात 205 मि.मी. पाऊस झाला. राधानगरी आणि चित्री प्रकल्पात प्रत्येकी 160 मि.मी., कुंभीत 151 मि.मी., जांबरेत 150 मि.मी., कोदेत 137 मि.मी., तर दूधगंगेत 107 मि.मी. असा 100 मि.मी.पेक्षा जादा पाऊस झाला. यासह तुळशी (94), जंगमहट्टी (86) व आंबेओहोळ (67) या धरण परिसरातही अतिवृष्टी झाली. वारणा परिसरात 61 मि.मी., कासारीत 41 मि.मी., कडवीत 48 मि.मी., तर चिकोत्रा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात 60 मि.मी. पाऊस झाला.
धरणांत पाण्याची आवक सुरू
पाऊस सुरू झाल्यानंतर काही दिवसांनंतर ओढे, नाले प्रवाहित होऊन धरणापर्यंत पाणी येण्यास सुरुवात होते. जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून धरण क्षेत्रांत पावसाचा जोर वाढल्याने धरणांत पाण्याची आवक सुरू झाली आहे. कासारी धरण वगळता सर्व धरणांतील पाणीसाठ्यात वाढ होऊ लागली आहे. राधानगरी धरणाचा पाणीसाठा गुरुवारी 2.01 टीएमसी होता, आज तो 2.19 टीएमसी झाला. दूधगंगा धरणात 3.14 टीएमसी असणारा पाणीसाठा गेल्या 24 तासांत 3.29 टीएमसीवर गेला. वारणेचाही साठा 10.42 टीएमसीवरून 10.50 टीएमसीपर्यंत गेला. अन्य सर्व धरणांतील पाणीसाठ्यात वाढ होऊ लागली आहे.
पंचगंगेच्या पाणी पातळीत वाढ सुरू
पावसाने पंचगंगेच्या पाणी पातळीतही संथ वाढ सुरू झाली आहे. गेल्या चार दिवसांपासून पाणी पातळी 9.4 फुटांवर होती. आज सकाळी ती 9.8 फुटांवर गेली. दिवसभरात त्यात आणखी वाढ होत गेली.
दोन मार्गांवरील एस.टी. वाहतुकीवर परिणाम
पावसाने रस्त्यावर चिखल झाल्याने दोन मार्गांवरील एस.टी. वाहतुकीवर परिणाम झाला आहे. रंकाळा-वाशी या मार्गावरील बस खापणेवाडीतून, तर रंकाळा-धनगरवाडा या मार्गावरील बस स्वयंभूवाडीतून परत आल्याचे एस.टी. महामंडळाच्या विभागीय कार्यालयाच्या वतीने सांगण्यात आले.