तुकोबांच्या पालखी रथाला हुपरीकरांची झळाळी!

तुकोबांच्या पालखी रथाला हुपरीकरांची झळाळी!

अमजद नदाफ

हुपरी : कोट्यवधी भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री संत तुकाराम महाराजांची मूर्ती, पालखी रथाला चंदेरी नगरी म्हणून ओळखल्या जाणार्‍या हुपरीकरांनी झळाळी दिली आहे.
श्री संत तुकाराम महाराज संस्थान देहू येथील देऊळवाड्यातील विठ्ठल-रुक्मिणी, शिळा मंदिरातील चांदीचा महिरप आणि पालखी, संत जगद्गुरू तुकाराम महाराज यांच्या चांदीच्या पादुका, मूर्ती आणि पालखी सोहळ्यातील आकर्षण असलेला चांदीचा रथ पॉलिश करून हुपरीच्या कारागिरांनी लख्ख बनवले आहे. संस्थानने ही सेवा करण्याची संधी हुपरीतील चांदी कारागिरांना दिली होती. देहूमध्ये जाऊन त्यांनी ही सेवा पार पाडली.
‘धन्य काळ संत भेटी, पायी मिठी पडली तो…’ अशीच भावना येथील या कारागिरांची झाली. ही सेवा करायची संधी मिळाल्याने आम्ही धन्य झालो, अशी भावना अभयसिंह घोरपडे यांनी व्यक्त केली. आषाढी एकादशीसाठी श्री क्षेत्र पंढरपूरला देहूतून ही पालखी 28 जूनला प्रस्थान करणार आहे. त्यासाठी हुपरीकरांनी ही पालखी पॉलिश करून सज्ज केली आहे.
हुपरी येथील चांदी उद्योग देशभर प्रसिद्ध आहे. त्यामुळे देहू संस्थानच्या ट्रस्टींनी येथील युवराज माने, अभयसिंह घोरपडे, बाबासाहेब गोंधळी यांच्याशी संपर्क साधून संत जगद्गुरू तुकाराम महाराज यांची चांदीची मूर्ती, रथ, पादुका पॉलिश करण्याची सेवा करण्याची संधी उपलब्ध करून दिली. त्यामुळे गुरुवारी सकाळी हुपरीहून अभयसिंह घोरपडे, युवराज माने, बाबासाहेब गोंधळी, अमित गायकवाड, सुनील कंगळे, सुनील गाठ, राघू मिठारी, विजय दिवाण, बंडू गिरी, सचिन पिसाळ, पिंटू बोंगार्डे, सचिन शिंदे, रामचंद्र माणकापुरे, प्रज्योत पाटील, विजय कुलकर्णी, श्रावण कमते, महेश खैरे, अनिल कुंभार, वासुदेव पन्हाळे, सिदू नायकवडे, मच्छिंद्र शिंदे, सनी करनुरे, श्रीधर कोळी, बाबासो सांगले, महादेव पवार, आनंदा भडगावे, सुरज सावरकर, बाळकृष्ण सुतार, बाळासाहेब केसरकर, वसंत पन्हाळे, संतोष कुंभार यांच्यासह 27 चांदी कारागीर देहूमध्ये दाखल झाले. हे सद्गुरूदास गोपाळकृष्ण पायी दिंडी सोहळ्यातील वारकरी आहेत. त्यांनी अत्यंत चोखपणे ही सेवा पार पाडत मूर्ती, रथ व पादुका लख्ख केल्या. संस्थानच्या पदाधिकार्‍यांनी या सेवेबद्दल सर्वांचा यथोचित सत्कार केला.