कुटुंब कलह; मत्सर महिमा!
डॉ. प्रदीप पाटील ( क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट व काऊंसेलर )
‘जळतो माझ्यावर…’, ‘एवढं जळू नको… ‘एवढं तिच्यामध्ये किंवा त्याच्यामध्ये असं काय आहे जे माझ्यामध्ये नाही?’ असं जेच्या कोणी म्हणतं तेव्हा त्या म्हणण्यामध्ये मत्सर डोकावत असतो! जेव्हा आपल्या जोडीदाराकडे दुसरा कोणीतरी आकृष्ट झालेला आहे तेव्हा आपली जळजळ वाढते. जेव्हा दुसऱ्याच्या भावना किंवा दुसऱ्याचे विचार किंवा अगदी दुसऱ्याची कृती सुद्धा जपायचा प्रयत्न आपल्याला दुर्लक्ष करून केला जातो, तेव्हा मत्सर हा ठरलेला असतो. कुटुंबामध्ये जेव्हा मुलांना आपल्या पालकांकडून अपेक्षा असते आणि त्या अपेक्षा या दुसऱ्यांसाठी पूर्ण केल्या जातात तेव्हा मत्सर हा टोकाला जातो.
मत्सर आणि भांडण ।
आजकाल अनेक बहुसंख्य कुटुंबांमध्ये आपला जोडीदार दुसऱ्या कुठल्या व्यक्तीत भावनिकदृष्ट्या गुंतला आहे किंवा त्याचे लैंगिक संबंध इतरांशी आहेत असे वाटू लागले की मत्सर मोठ्या प्रमाणावर जागा होतो. जेव्हा मत्सर जागा होतो तेव्हा अर्थातच भांडणं होतात. वाद विकोपाला जातात आणि स्वतःवरचा ताबा देखील सुटतो. आपले नाते आता पणाला लागले आहे, नाहीतर आपले नाते संपून जाईल, ही निर्माण होणारी भीती आणि टोकाची काळजी ही मत्सर या भावनेला जन्म देते. जेव्हा एकापेक्षा जास्त व्यक्ती संपर्कात येतात तेव्हा प्रत्येक व्यक्तीचे वागणे हे नात्याला पूरक असतेच असे नाही. मग ते नाते कोणत्याही स्वरुपाचे असो. अशावेळी त्या व्यक्तीकडून आपल्या नात्याला किंवा आपल्या स्थानाला धोका निर्माण होतोय अशी जाणीव जरी नुसती झाली तरी मत्सराग्रस्त व्हायला वेळ लागत नाही.
मत्सर आणि असूया।
मत्सर आणि असुया याच्यामध्ये फरक असतो. एखाद्या व्यक्तीमध्ये आपल्यापेक्षा जास्त गुग आहेत, क्षमता आहेत, कौशल्ये आहेत, यश संपादन केले आहे, तर अशावेळी आपल्याला वाटते की, आपल्यामध्ये ते नाही आणि त्यातून त्या व्यक्तीविषयी मनात असुया नावाची भावना वाहू लागते. मत्सरमध्ये तसे नसतो. प्रख्यात विवारवंत बरट्रांड रसेल हे म्हणतात की, असुया ही माणसाला दुःखी ठेवण्याचे मोठे कारण आहे।
लहान मुलातही मत्सर।
जर या मत्सराला संस्कृती, धर्म, किंवा आजूबाजूचा परिसर खतपाणी घालत असेल तर त्यातून हिंसक घडण्याची शक्यता कैक पटीने वाढते. मत्सर ही भावना मानवाला उत्क्रांतीमध्ये उपयोगी पडली होती. आपल्या जोडीदाराचा विश्वास चाचपून पाहण्यास मत्सर हा उपयोगी पडत असे. कारण जर आपल्या जोडीदाराने इतर कोणाशी जवळीक केली तर आपण त्या नाल्यांमध्ये घेतलेले कष्ट आणि निर्माण केलेली संतती याचे मोल वाया जाईल याची भीती वाटत होती. त्यातून जोडीदाराकडे किंवा नात्यातील कोणत्याही विश्वासू व्यक्तीकडे सातत्याने लक्ष ठेवणे घडत होते. अगदी पाच ते सहा महिन्यांच्या मुलाच्या मनामध्ये देखील मत्सर जागा होतो, असे प्रयोगात आढळले आहे.
ऑब्सेशन जेलसी!
जेव्हा मत्सर हा टोकाचा होतो तेव्हा त्याचे स्वभाव विकृतीमध्ये रूपांतर होते, ज्याला ‘ऑब्सेशन जेलसी’ म्हणतात. वास्तवात मत्सर हा अनेक विचार विकृतींना जन्म देतो. आपल्या प्रिय व्यक्तीवर किंवा नात्यातल्या व्यक्तीवर टोकाचा अधिकार गाजवण्याचा प्रयत्न करतो. ज्याच्याबद्दल मत्सर वाटतो त्याची कोणतीच गोष्ट ही योग्य नसते असे वाटत राहते. धमक्या सातत्याने देणे सुरू होते आणि त्यातून नात्यांचा विस्कोट होतो. नात्यातील व्यक्तीला नियंत्रित करण्याचा प्रयत्न होतो व त्याच्यावर बंधने घातली जातात.
जर मत्सर वेळीच आवरला गेला नाही तर त्यातून टोकाची भांडणे आणि खून-हाणामाऱ्या होण्याची शक्यता असते. मत्सर हा वेळीच आवरता येतो. पण त्यासाठी रॅशनल विचार करण्याची पद्धती आपल्या डोक्यात असायला हवी. ती जर नसेल तर पारंपारिक विचार पद्धती ही घातक ठरते।
हेही वाचा
Pudhari Crime Diary : ज्या साडीत पांडबाचा जीव अडकला, तिच साडी त्याच्या गळ्याभोवतीचा फास बनून गेली
Pudhari Crime Diary : कुटुंब कलह : पहिला आघात महिलांवरच!
Pudhari Crime Diary : ‘एका स्क्रू’मुळे उलगडली ‘मर्डर मिस्ट्री’! एका अफलातून पोलिस तपासाची अद्भूत कहाणी