तडका : रडण्याचा क्रॅश कोर्स!

तडका : रडण्याचा क्रॅश कोर्स!

मागणी तसा पुरवठा हे कोणत्याही व्यवसायाचे मूलभूत तत्त्व असते. आजच्या आधुनिक काळात शहरी भागात सर्वत्र सोहळे झालेले आहेत. हे सोहळे मॅनेज करणारे मॅनेजर पण जागोजागी दिसून येत आहेत. लहान मुलाचे बारसे करायचे असो किंवा कुणा सुनबाईचे डोहाळ जेवण करायचे असो, इव्हेंट मॅनेजरला एक फोन केला की, तो तत्परतेने सर्वकाही उपलब्ध करून देतो. अर्थात, यासाठी भरपूर पैसे मोजावे लागतात. ज्याच्याकडे असे पैसे असतील, तो अशा प्रकारचे सोहळे साजरे करत असतो. लग्न समारंभ हा एक फार मोठा सोहळा असतो आणि त्यामध्ये लाखोंची उलाढाल होत असते. एकच एक इव्हेंट मॅनेजर नेमला आणि त्याला भरपूर पैसे दिले की, तो स्वागतापासून विदाईपर्यंत सर्व काही सुरळीत पार पाडण्याची जबाबदारी घेत असतो.
कोणत्याही लग्न समारंभामध्ये जेवण, सजावट, स्वागत हे सर्व काही इव्हेंट मॅनेजरने केले तरी काही गोष्टी मात्र या व्यक्तिगत असतात आणि त्या वर्‍हाडातील लोकांनाच कराव्या लागतात. विशेषत: लग्न आणि सर्व विधी आटोपून सासरी निघताना वधूला आणि तिच्या मैत्रिणींना रडणे आवश्यक असते. पूर्वी वधूला वाटी लावताना म्हणजेच तिच्या सासरी तिची रवानगी करताना अख्खे वर्‍हाड रडत असे. आई, वडील, बहीण, भाऊ आणि मैत्रिणी यांच्यासाठी हा एक नाजूक असा हळवा क्षण असे, ज्यामध्ये प्रत्येकाचे डोळे पाणावत असत. आजकाल असे रडणे फार दुर्मीळ झाले आहे.
आता मूळ विषयाकडे येऊयात. लग्नात वधूने आणि तिच्या मैत्रिणींनी नेमके कसे रडावे, याचे प्रशिक्षण देणारा क्रॅश कोर्स भोपाळमधील राधिका राणी यांनी सुरू केला आहे आणि त्याला भरपूर प्रतिसादही मिळत आहे. रडण्याचा कोर्स असल्यामुळे याला ‘क्राय कोर्स’ असेही म्हणता येईल. लव्ह मॅरेज म्हणजे प्रेमविवाह असेल तरी सासरी जाताना रडणे अनिवार्य आहे, असे लक्षात येईल. वधू निघताना तिच्या मैत्रिणी तिला ‘अगं, आता रडायला सुरुवात कर,’ असे म्हणतात, तेव्हा ती म्हणते की, ‘तुम्ही सुरू करा, मी तुम्हाला फॉलो करते.’
एका लग्नात तर वधूच्या एका मैत्रिणीने इतक्या मोठ्याने हंबरडा फोडला की, सगळे वर्‍हाड धावत पळत तिच्याकडे आले. ‘रडण्याचे पण हसे झाले’ असा काही प्रकार होऊ नये म्हणून राधिका राणी या बुद्धिमान महिलेने सासरी जाताना कसे रडावे, याचे प्रशिक्षण देणारा कोर्स भोपाळमध्ये सुरू केला आहे. हा कोर्स सात दिवसांचा असून, वधू आणि तिच्या मैत्रिणींसाठी आहे. इव्हेंट मॅनेजरच्या माध्यमातून तुम्ही सर्व काही करून घ्याल; पण रडावे तर तुम्हालाच लागणार आहे, हे निश्चित.
मग रडायचेच असेल तर सिस्टिमॅटिक आणि मेकअप न बिघडता कसे रडावे, हे या कोर्समध्ये शिकवले जाते.खरे तर विदाई हा नाजूक असा क्षण असतो. त्यावेळी डोळ्यांतून पाणी येणे साहजिक असते. काही वेळा वधुपक्षाकडील महिलांचे आणि विशेषत: नवरीचे रडणे पाहून नवरदेव स्वतः रडायला लागल्याची उदाहरणे आहेत. काही लोक तर इतके रडतात की, वरपक्षाकडील मंडळींना या वधूला सासरी नेत आहोत म्हणजे आपण काहीतरी अपराध करत आहोत, अशी भावना निर्माण होते. विदाईच्या वेळेला किंवा आपल्या मराठी भाषेत वधू वाटी लावताना रडण्याचा कोर्स काढावा ही खरी राधिका राणी यांची उद्योजकता म्हणावी लागेल.