मंत्री महोदयांच्या स्वागतासाठी विमानाने आले, कार्यकर्त्यांचे ‘मोहोळ’,

मंत्री महोदयांच्या स्वागतासाठी विमानाने आले, कार्यकर्त्यांचे ‘मोहोळ’,

प्रशांत वाघाये,

नवी दिल्ली : पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांची केंद्रीय राज्यमंत्रीपदी वर्णी लागली. ही बातमी मिळतात पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रातील भाजपचे कार्यकर्ते दिल्लीकडे येऊ लागले. भाजपच्या कार्यकर्त्यांचे जथ्येच्या जत्थ्ये विमानाने दिल्लीला येत आहेत. त्यामुळे एरवी दहा हजारांच्या घरात असलेले पुणे-दिल्ली विमानाचे तिकीट वाढल्याचे चित्र आहे. अचानक पुणे – दिल्ली प्रवासी संख्या वाढल्याने तिकीट वाढल्याचे मुरलीधर मोहोळ यांच्या कार्यकर्त्यांनी सांगितले.
महाराष्ट्रातील सर्व नव्या खासदारांची निवासाची सोय सध्या दिल्लीतील महाराष्ट्र सदनात केली आहे. मुरलीधर मोहोळ यांचेही वास्तव्य सध्या महाराष्ट्र सदनात आहे. त्यामुळे महाराष्ट्र सदनही मोहोळ यांच्या कार्यकर्त्यांच्या गर्दीने चांगलेच फुलले आहे. खूप दिवसांनी महाराष्ट्र सदनात एखाद्या व्यक्तीसाठी अशा पद्धतीने गर्दी होत असल्याचे चित्र आहे. मंत्रीपद जाहीर झाल्यानंतर फटाक्यांच्या आतिषबाजीसह मोहोळ यांचे जोरदार स्वागतही दिल्लीत करण्यात आले. सोमवारी रात्री पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर झाले. यामध्ये मुरलीधर मोहोळ यांना सहकार आणि नागरी उड्डयण खाते मिळाले. मोहोळ यांना मंत्रीपद मिळाल्यानंतर येणारी गर्दी खाते जाहीर झाल्यानंतर आणखीनच वाढली. मुरलीधर मोहोळ पुढच्या काही दिवसात ‘केंद्रीय राज्यमंत्री’ म्हणून पुणे दौऱ्यावर असणार आहेत. मात्र त्यापूर्वीच पुणे जिल्ह्यासह पश्चिम महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांनी दिल्लीत येऊन मुरलीधर मोहोळ यांचे अभिनंदन केले आहे.
मोहोळ यांचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल…
मुरलीधर मोहोळ खासदार झाल्यानंतर पहिल्यांदाच पुण्याहून दिल्लीला येत होते. यावेळी इंडिगो कर्मचाऱ्यांकडून मुरलीधर मोहोळ यांचे अभिनंदन करण्यात आले. मुरलीधर मोहोळ यांच्या अभिनंदनाचा हा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
पहिल्याच टर्ममध्ये केंद्रीय राज्यमंत्रीपदावर वर्णी
केंद्रीय मंत्री झालेले मुरलीधर मोहोळ पुण्यात भाजपचे चार वेळा नगरसेवक होते. कोरोना सारख्या कठीण काळात ते पुण्याचे महापौर होते. त्यानंतर भाजपने त्यांना पक्ष संघटनेत बढती देत महाराष्ट्र प्रदेश भाजपच्या सरचिटणीसपदी नेमले आणि पश्चिम महाराष्ट्राच्या प्रभारी पदाची जबाबदारी दिली. नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत त्यांना पुण्यातून उमेदवारी दिली होती. ते निवडून आल्यानंतर पहिल्याच टर्ममध्ये त्यांना केंद्रीय राज्यमंत्रीपद देण्यात आले. सहकार आणि नागरी उड्डयण अशा महत्त्वाच्या खात्यांच्या राज्यमंत्रीपदी नेमले.
मुरलीधर मोहोळ यांची केंद्रीय राज्यमंत्रीपदी निवड झाल्याची बातमी कळाली आणि त्यानंतर कधी एकदा दिल्लीला जाऊन मुरलीधर मोहोळ यांचे अभिनंदन करतो असे झाले. पुणे-दिल्ली विमानाचे दर बघितले तर १५- २० हजार असे तिकीट होते, तरीही तिकीट काढून दिल्लीला आल्याचे पुण्याचे राजू परदेशी यांनी सांगितले तर असाच काहीसा अनुभव ॲड. मनिष पाळेकर यांनीही सांगितला. गणेश मंडळाचा कार्यकर्ता केंद्रीय मंत्री झाल्याचा आनंद मोठा असल्याचेही ते म्हणाले.