छ. संभाजीनगर : पैठण तालुक्यात लोहगाव येथे दोन दिवसात २१९ मी.मी पाऊस

छ. संभाजीनगर : पैठण तालुक्यात लोहगाव येथे दोन दिवसात २१९ मी.मी पाऊस

पैठण Bharat Live News Media वृत्तसेवा : पैठण तालुक्यातील विविध महसूल मंडळात दोन दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला असून सर्वाधिक २१९ मी.मी पाऊस लोहगाव परिसरात पडल्याची नोंद तहसील कार्यालयात करण्यात आल्याची माहिती तहसीलदार सारंग चव्हाण यांनी दिली आहे.
पावसाळा सुरू होताच सलग दोन दिवसापासून दुपारी व रात्री तालुक्यातील वेगवेगळ्या महसूल मंडळामध्ये जोरदार पावसाने हजेरी लावली असून या पावसाच्या पाण्यामुळे छोट्या मोठ्या नदी नाल्यामध्ये पाणी वाहत असून दोन दिवस पडलेल्या पावसामध्ये विहामांडवा ८६ मी.मी, पाचोड ७२, आडुळ १११, नांदर ९३,बालानगर १३८, ढोरकिन १४६, बिडकीन १७०, पिंपळवाडी पिं ११३, पैठण शहर १११ असे एकूण मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून सर्वाधिक पाऊस लोहगाव येथे २१९ मि मी झाल्यामुळे विविध महसूल मंडळातील शेतकऱ्यांनी शेतीची मशागत सुरू केली आहे.
दरम्यान मंगळवार दि.११ रोजी सकाळी नाथसागर धरणामध्ये २ हजार ७८५ क्युसेक पाण्याचे आवक सुरू झाली असून मंगळवारी रोजी सायंकाळी धरणाच्या नियंत्रण कक्षात नोंद झाल्यानुसार पाणी पातळी १४९६.६२ फुटामध्ये नोंद करण्यात आली. पाण्याची टक्केवारी ४.७८ आहे मागील वर्षी या तारखेला ३३.४५ टक्के पाण्याचा साठा शिल्लक होता. नाथसागर धरणाच्या वरील भागात सतत छोटा मोठा पाऊस पडल्याने लवकरच धरणाची पाणी परिस्थिती पूर्वपदावर येईल अशी अपेक्षा पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत जाधव, धरण उपविभागीय अभियंता विजय काकडे यांनी व्यक्त केली आहे.