मेंदूच्या ऊतींपासून तयार केला पहिला जिवंत संगणक

मेंदूच्या ऊतींपासून तयार केला पहिला जिवंत संगणक

मुंबई, Bharat Live News Media डेस्क : कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात ‘एआय’च्या आगमनानंतर मानवी कामे रोबोटने पार पाडण्याची तयारी सुरू केली असतानाच स्वीडिश शास्त्रज्ञांनी चक्क मानवी मेंदूच्या ऊतींपासून जगातील पहिला जिवंत संगणक तयार केला आहे. जगात सध्या जे सर्वोत्कृष्ट संगणक आहेत, त्याच गतीने किंवा त्याहीपेक्षा अधिक वेगाने हा जिवंत संगणक काम करू शकेल. बायोलॉजिकल न्यूरल नेटवर्कचा वापर करून फायनलस्पार्क या कंपनीच्या शास्त्रज्ञांनी हा जिवंत संगणक विकसित केला असून या संशोधनाचे एकूणच मानवी जीवनावर दूरगामी परिणाम संभवतात.
हा जिवंत संगणक सध्या एखादे डिजिटल प्रोसेसर वापर असलेल्या ऊर्जेपेक्षा कितीतरी कमी ऊर्जेत काम करतो. या संगणकाची तुलना हेवलेट पॅकार्ड एंटरप्राइझ फ्रंटियरसारख्या जगातील सर्वोत्कृष्ट संगणकाशी केली जात आहे. हा जिवंत संगणक तयार करणार्‍या शास्त्रज्ञांच्या मते मानवी मेंदू सर्वोत्कृष्ट संगणकाच्या वेगाने काम करतो. विशेष म्हणजे त्याची क्षमता एक हजार पट अधिक असते. महत्त्वाचे म्हणजे मानवी मेंदू केवळ 10 ते 20 व्हॅटस्ची ऊर्जा वापरतो तर सर्वोत्कृष्ट संगणकाला तब्बल 21 मेगाव्हॅट क्षमतेची ऊर्जा लागते. (एक मेगाव्हॅट म्हणजे दहा लाख व्हॅटस्).
फायनलस्पार्क कंपनीचे सहसंस्थापक डॉ. फ्रेड जॉर्डन यांनी सांगितले की, जिवंत संगणकाची कल्पना विज्ञान कथेवर आधारलेली आहे. परंतु त्यावर फार मोठे संशोधन झालेले नाही. या संगणकात पेशींपासून बनवलेल्या लहान, स्वयंसंघटित त्रिमिती ऊती वापरण्यात आल्या आहेत. केवळ विशिष्ट प्रकारच्या पेशी तयार करणे आणि न्यूरॉन्ससारखी वैशिष्ट्ये तयार होईपर्यंत त्यांचे प्रयोगशाळेत एक महिनाभर संवर्धन करणे इतपतच संशोधन या दरम्यान करण्यात आले आहे.
10,000 जिवंत न्यूरॉन्सपासून बनवल्या ऊती
या संगणकासाठी प्रयोगशाळेत अंदाजे 10,000 जिवंत न्यूरॉन्सपासून या ऊती तयार करण्यात आल्या. प्रत्येकाचा व्यास सुमारे 0.5 मि.मी. होता. त्यांना डोपामाईनच्या डोससह प्रशिक्षित केले गेलेे. या पेशी आठ इलेक्ट्रोडस्ने वेढलेल्या असतात, जे ऊतीमधील क्रिया प्रतिक्रिया मोजतात आणि संशोधक न्यूरॉनवर परिणाम करण्यासाठी इलेक्ट्रोडद्वारे विद्युत प्रवाह पाठवू शकतात.