मालेगावात 145 मिमी पावसाची नोंद; 15 जनावरे मृत्यूमुखी
मालेगाव : Bharat Live News Media वृत्तसेवा – शहरासह तालुक्यात रविवारी (दि.9) वादळीवारा व विजांच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली. झोडगे येथे सर्वात कमी 2 मिमी तर सर्वात जास्त करंजगव्हाण येथे 55 किमी पाऊस झाला. तब्बल दीड ते दोन तास पाऊस झाल्याने तालुक्यात सुमारे 145 मिमी पावसाची नोंद झाली आहे. तालुक्यात नऊ ठिकाणी वीज पडून शेतकर्यांचे सात बैल, एक म्हैस, एक गाय, तीन बकर्या, दोन मेंढ्या व एक कोकरु असे 15 पाळीव जनावरे मृत्यूमुखी पडले.
शहरासह तालुक्यात यंदा मार्च महिन्यापासूनच तापमानाने चाळीशी ओलांडल्याने असह्य उकाड्याने नागरिक हैराण झाले होते. त्यातच जूनचा पहिला आठवडा देखील कडक उन्हातच गेला होता. त्यामुळे नागरिकांचे लक्ष पावसाकडे लागले होते. 7 जूनला मृग नक्षत्र लागताच तिसर्या दिवशी रविवारी पावसाने वादळी वारा, विजांच्या कडकडाटासह हजेरी लावली. प्रारंभी साडेपाच वाजेच्या सुमारास जोरदार वादळी वारे वाहण्यास सुरूवात झाली. त्यानंतर दीड ते दोन तास मुसळधार पाऊस झाला. यामुळे कामानिमित्ताने घराबाहेर असणार्या नागरिकांची एकच धांदल उडाली. राहून-राहून येणार्या पावसामुळे शहरातील सखल भागात पाणी साचले. शहराबरोबरच तालुक्यात देखील कमी अधिक प्रमाणात पाऊस बरसला आहे. वादळीवार्यामुळे अनेक ठिकाणी नुकसान झाले. ग्रामीण भागातील लोणवाडे, कौळाणे (गा.), कळवाडी, वजीरखेडे, सातमाने, जळगाव (गा.), खडकी आदी गावातील शेतकर्यांचे बैल, गाय, बकर्या, मेंढ्या, म्हैस आदी पाळीव प्राण्यांवर वीज कोसळ्याने त्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे शेतकर्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे. शासनाने पंचनामा करुन नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकर्यांकडून केली जात आहे.
पशुधनाचे मोठे नुकसान…
गंगाराम दळवी (लोणवाडे) – 2 बैल
संजय मगर (कौळाणे (गा.) – 1 बैल
उमाजी सोनवणे (वळवाडी) – 1 बैल
रामेश्वर गायकवाड (वजीरखेडे) – 1 बैल
गोकुळ पगार (सातमाने) – 1 बैल
उज्ज्वला जाधव (सातमाने) – 1 बैल
ताराचंद शिंदे (जळगाव (गा.) – 3 बकर्या, 2 मेंढ्या, 1 कोकरु
मयुर देवरे (खडकी) – 1 गाय
बेबीबाई रोकडे (खडकी) – 1 म्हैस
असा झाला पाऊस
मालेगाव – 12.00 मिमी
दाभाडी – 06.00 मिमी
अजंग -12.00 मिमी
वडनेर – 10.00 मिमी
करंजगव्हाण- 55.00 मिमी
डोंगराळे – 10.00 मिमी
झोडगे – 02.00 मिमी
कळवाडी -04.00 मिमी
कौळाणे (नि.) -04.00 मिमी
जळगाव (नि.) – 09.00 मिमी
सौंदाणे – 07.00 मिमी
सायने – 09.00 मिमी
निमगाव – 05.00 मिमी
एकूण – 145.00 मिमी
हेही वाचा:
नाशिक : खासदार भगरे यांनी मान्सूनमुळे बळी पडलेल्या कुटुंबातील सदस्यांचे केले सांत्वन
Nashik Weather News | मान्सून वेशीवर: वीज पडून युवक ठार तर शेड कोसळल्याने एकाचा मृत्यू