Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : वैष्णोदेवी यात्रेकरूंना घेऊन जाणाऱ्या बसवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी संघटना लष्कर-ए-तोयबाची शाखा असणार्या द रेझिस्टन्स फ्रंटने स्वीकारली आहे.
रविवारी जम्मू आणि काश्मीरच्या रियासी जिल्ह्यात यात्रेकरूंना घेऊन जाणाऱ्या बसवर दहशतवादी हल्ला झाला होता. ही बस शिव खोरी मंदिराहून कटरा या माता वैष्णोदेवी मंदिराच्या बेस कॅम्पकडे परतत असताना ही घटना घडली. जवळच्या जंगलात लपलेल्या दहशतवाद्यांनी वाहनावर हल्ला केला आणि गोळीबार केला. बसच्या चालकाला गोळी लागल्याने त्याचे वाहनावर नियंत्रण गेले. बस दरीत कोसळली. या अपघातात १० भाविक ठार झाले तर ३३ जण जखमी झाले होते.
तपास ‘एनआयए’कडे सोपविला
एनआयएची टीम या दहशतवादी हल्ल्याचा तपास करणार आहे. एफएसएल (फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी) टीम देखील घटनास्थळी पोहोचली आहे.
दहशतवाद्यांच्या शोधासाठी ड्रोनचा वापर
रिआसीचे पोलिस उपअधीक्षक मोहित शर्मा यांनी सांगितले की, एका वळणावर चेहरे झाकलेल्या दोन दहशतवाद्यांनी बसवर तुफान गोळीबार केला. यामुळे चालक घाबरला व बस दरीत कोसळली. दरीत मृतदेह व जखमी पडले होते. जखमींचा आरडाओरडा ऐकून रस्त्यावरच्या लोकांनी धाव घेतली. काहींनी पोलिसांना माहिती देताच पथक दाखल झाले. पोलिसांनी काही रिकामी काडतुसे हस्तगत केली. दुसरीकडे सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांना शोधण्यासाठी मोहीम हाती घेतली असून आसपासचा सारा परिसर पिंजून काढला. डोंगराळ आणि दाट झाडीच्या या प्रदेशात रात्री उशिरापर्यंत शोधमोहीम सुरू होती. आज सकाळपासून पुन्हा जवानांकडून दहशतवाद्यांचा शोध सुरू आहे. जंगल परिसरात शोध घेण्यासाठी ड्रोनचा वापर केला जात आहे. राज्य आपत्ती प्रतिसाद दलही घटनास्थळी पोहोचले आहे. दहशतवाद्यांनी बसवर हल्ला केलेल्या ठिकाणी एफएसएल (फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी) टीम देखील पोहोचली आहे.
वैष्णोदेवी यात्रेकरुंवरील हल्ल्याची जबाबदारी ‘लष्कर-ए-तोयबा’ने स्वीकारली