जागतिक नेत्रदान दिन : मृत्यूनंतरही हे सुंदर जग मी पुन्हा पाहणार..!

जागतिक नेत्रदान दिन : मृत्यूनंतरही हे सुंदर जग मी पुन्हा पाहणार..!

नाशिक : नील कुलकर्णी

नव्वदच्या दशकात विश्वसुंदरी ऐश्वर्या रायची एक अर्थपूर्ण आणि हृदस्पर्शी प्रभावी जाहिरात दूरचित्रावाहिनीवर येत असे. ”सौंदर्य स्पर्धेत विचारलेल्या मेल्यानंतर तुम्ही या जगाला काय देऊन जाल.? या प्रश्नावर मी माझे सुंदर अनमोल डोळे या जगाला देऊन जाईल. त्यामुळे हे सुंदर जग कुणीतरी पु्न्हा पाहू शकेल..’ असे उत्तर तिने दिले होते. या जाहिरातीने तेव्हा नेत्रदान चळवळीला व्यापक वळण दिले, अनेकांनी उत्स्फूर्तपणे नेत्रदानाचा संकल्प केला. आज तीन दशकांनंतरही नेत्रदानाचा संकल्प करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे.
यंदाच्या नेत्रदिनाची संकल्पना अशी…
दि. १० जून हा जागतिक नेत्रदान दिन म्हणून साजरा केला जातो. ‘अंधत्व, दृष्टिदोष याविषयी जागरूकता वाढवताना मृत्यूनंतर नेत्रदानासाठी लोकांना प्रोत्साहित करणे’ ही यंदाच्या नेत्रदिनाची संकल्पना आहे. भारतापेक्षा अत्यंत लहान असूनही श्रीलंकासारखा देश संपूर्ण जगाला अंध, दृष्टिहीनांसाठी सर्वाधिक डोळे पुरवणारा देश ठरला आहे, तीच चळवळ भारतात रुजावी, असे येथील सामाजिक कार्यकत्र्यांनी बोलून दाखवली.
गेल्या दीड-दोन दशकांत नाशिकमध्ये नेत्रदान चळवळ बऱ्यापैकी रुजली असून, गोदानगरीत मरणोपरांत नेत्रदान करणाऱ्या संख्येतही वाढ झाल्याचे सकारात्मक चित्र असल्याची माहिती येथील नेत्ररोगतज्ज्ञांनी दिली. विशेष म्हणजे, अवयवदानाबद्दलही शहरात अत्यंत सकारात्मक दृष्टिकोन तयार होत असल्याचेही आश्वासक आणि आशादायक चित्र पाहायला मिळत आहे. मरणोपरांत नेत्रदान केल्यास मुक्ती किंवा मोक्ष मिळणार नाही, मृत्यूपश्चात संपूर्ण शरीराला अग्निसंस्कारानंतरच मोक्ष मिळतो. नेत्रदान केल्यास पुढील जन्मात अंध व्यक्तीचा जन्म मिळतो आणि अशा निराधार असलेल्या असंख्य गैरसमजामुळे नाशिकसह देशभरात मरणोपरांत नेत्रदान करण्याच्या चळवळीस अडथळे येतात. तरीही शहरात होणारे अवयवदान चळवळीला प्रोत्साहन देणारे अनेक कार्यक्रम, व्याख्याने आणि लोकांमध्ये वाढलेली जागरुकता यामुळे नाशिकमध्ये मरणोपरांत नेत्रदानासह एकूणच अवयवदानासाठी चळवळीस गती मिळत असल्याची माहिती या विषयावर काम करणारे तज्ज्ञ देतात.

मरणोपरांत नेत्रदानाने जनमानसात असलेले सर्व गैरसमज निराधार आहे. नेत्रतज्ज्ञ म्हणून मला वाटते की, अधिकाधिक लोकांनी मरणोपरांत नेत्रदानासाठी पुढे यावे. नेत्रदानाचा संकल्प करणाऱ्या व्यक्तीच्या जवळीच्या नातेवाइकांनीही त्यासाठी पूर्ण सहकार्य करावे. एका व्यक्तीने नेत्रदान केल्यास त्याचा फायदा आजच्या आधुनिक तंत्रज्ञाने ३ ते ४ व्यक्तींसाठी होतो. नाशिकमध्ये गेल्या दोन दशकांत नेत्रदान चळवळीने गती घेतली आहे. नेत्रदानात दात्यांच्या गेल्यानंतर नातेवाइकाची दिरंगाई, नकार कारणीभूत आणि प्रत्यारोपण कायदा (ह्युमन अॉर्गन ट्रान्सप्लांट अॅक्ट)ची प्रक्रिया क्लिष्ट व दीर्घकालीन आहे. त्याचाही परिणाम नेत्रदान चळवळीवर होतो. तरीही नेत्रदात्याने पुढे यावे आणि नेत्रदान करावेच. कधी कधी नेत्र उलपब्ध असतात, परंतु त्याचे लाभधारक तत्काळ उपलब्ध होत नाही हेही वास्तव आहे. – डॉ. मनीष बापये, नेत्ररोग तज्ज्ञ, नाशिक

हेही महत्त्वाचे…

नाशिकमध्ये रुजत आहे मरणोत्तर नेत्रदान संकल्पना; तरीही चळवळीस माेठा वाव
लोकांमधील गैरसमज हळूहळू होत आहेत कमी; नेत्रदानाची प्रक्रिया क्लिष्ट, प्रदीर्घ
मृत्यूनंतर ४ ते ६ तासांतच नेत्रदान करता येते.
२४ ते ४८ तासांत दात्याचे नेत्र प्रत्यारोपित केले जातात.
त्यापेक्षा जास्त कालावधीतही म्हणजे नेत्र सुरक्षित ठेवूनही होते नेत्रराेपण
नेत्रदानानंतर चेहरा विद्रुप होत नाही. पार्थिवाची होत नसते विटंबना.
इंदूर, मुंबईप्रमाणे नाशिकमध्येही व्हावी नेत्रपेढी (आयबँक)