सुनेला मंत्रिपदासाठी फोन येताच एकनाथ खडसे…
जळगाव : Bharat Live News Media वृत्तसेवा – केंद्रीय मंत्रिपदाची शपथ घेण्याकरता भाजप पक्षनेतृत्त्वाकडून रक्षा खडसे यांना आज फोन आला आणि सूनेला मंत्रीपदाची संधी मिळाल्याने सासरे एकनाथ खडसे यांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले. दाटलेल्या कंठातून त्यांनी आनंद व्यक्त केला आहे.
रावेर लोकसभा मतदारसंघाच्या नवनिर्वाचित खासदार रक्षा खडसे यांना मंत्रिपदात स्थान मिळण्याची चर्चा सकाळपासून सुरु झाली होती. मंत्रिपदाची शपथ घेण्याकरता पक्षनेतृत्त्वाकडून रक्षा खडसे यांना फोन आला होता. त्यानुसार त्या आज शपथविधीसाठी दिल्लीला रवाना झाल्या. त्यांच्याबरोबर त्यांचे सासरे आणि ज्येष्ठ नेते एकनाथ खडसेही आहेत.
“रक्षा खडसे केंद्रीय मंत्री होत असल्याचा मनस्वी आनंद आमच्या कुटुंबाला आणि गावकऱ्यांना आहे. मला वाटते की गेले अनेक वर्षे भाजपत काम करत असताना त्या कामाचं श्रेय आणि रक्षा खडसेंनी भाजपावर ठेवलेली निष्ठा याचं फळ म्हणून तिला आज शपथविधीसाठी बोलावण्यात आले आहे. साऱ्यांचेच आशीर्वाद आमच्या परिवाराच्या पाठीशी आहेत. खासकरून तिसऱ्यांदा तिला संधी दिली, याबद्दल मतदारांचे आभार. मतदारांमुळेच दिल्लीपर्यंत आणि मंत्रिपदापर्यंत जाण्याची संधी मिळीली”, अशा शब्दात एकनाथ खडसे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
नव्या कॅबिनेटमध्ये रक्षा खडसेंच्या निमित्ताने पहिल्यांदाच खान्देशला महिला मंत्रीपद मिळाले आहे. याबाबत बोलताना एकनाथ खडसे म्हणाले की, उत्तर महाराष्ट्रातील त्या पहिल्या महिला मंत्री आहेतच. शिवाय महाराष्ट्रातूनही त्यांची (नव्या मंत्रिमंडळा) पहिली महिला म्हणून निवड करण्यात आली आहे. म्हणजेच नव्या मंत्रीमंडळात महाराष्ट्रातील महिला मंत्री म्हणून रक्षाताईंचं नाव आलंय. त्यामुळे महाराष्ट्राच्या मंत्री या नात्याने त्यांनी महाराष्ट्राला आणि जळगावला न्याय देण्याचा प्रयत्न करावा.
एवढा आनंद कधीच झाला नव्हता….
दरम्यान, रक्षा खडसेंचं कौतुक करताना एकनाथ खडसे यांचे डोळे पाणावले होते. कंठ दाटून आला होता. ते म्हणाले, “रक्षाताईंना मंत्रीपदाची शपथ घेण्यासाठी बोलावण्यात आलं आणि माझा आनंद गगनात मावेनासा झाला. मला अश्रू आवरता आले नाहीत. इतका आनंद माझ्या जीवनात कधीही झाला नव्हता. केंद्रात मंत्रीपदाची शपथ घेणं ही आयुष्यातील सर्वांत मोठी गोष्ट आहे.”
जनतेमुळेच मी निवडून आले
रक्षा खडसे या सलग तिसऱ्यांदा रावेर लोकसभेतून खासदार म्हणून निवडून आल्या आहेत. रक्षा खडसे एका चॅनेलला प्रतिक्रिया देताना म्हणाल्या, “लोकसभा निवडणुकीतील विजयाचं श्रेय जनतेला द्यावे लागेल. कारण जनतेमुळेच मी तिसऱ्यांदा खासदार म्हणून निवडून आले आहे. यासह आमच्या सर्व नेत्यांचे मी आभार मानते, त्यांच्या योगदानामुळे मी निवडून आले आहे.”
हेही वाचा:
महाराष्ट्र पुन्हा अव्वल
शपथविधीआधीच मोदी ३.० सरकारच्या अजेंड्यावर मोहोर