आला रे मान्सून आला..!

आला रे मान्सून आला..!

शीर्षक वाचून तुम्हाला असे वाटेल की, लोकसभा निवडणुकीचा निकाल आला. छे छे, अजिबात तसे काही नाहीये. लोकशाही म्हटले की, निवडणुका होत असतात आणि यथावकाश याचे निकाल लागत असतात. या महत्त्वाच्या घटना आहेतच; पण त्याहीपेक्षा अधिक महत्त्वाची घटना म्हणजे मान्सून आला आहे ही आहे. येणार, येणार असे गाजत असलेला मान्सून आधी अंदमान-निकोबारमध्ये आणि पाठोपाठ केरळसह महाराष्ट्रात येऊन धडकला ही संपूर्ण देशासाठी आनंदाची बातमी आहे. उष्णतेची महाभयानक लाट देशभरात पसरलेली होती. राजस्थानच्या बाडमेरमध्ये 54 अंश सेल्सिअसपेक्षाही अधिक तापमान नोंदवले गेले आहे. राजधानी दिल्लीतही पारा 51 अंशांपर्यंत जाऊन पोहोचला होता.
जागतिक तापमानवाढ ही धोकादायक सूचना अनेक वेळा दिल्यानंतरही त्याच त्या चुका केल्यामुळे उष्णता दरवर्षी वाढत चालली आहे. मान्सूनचे पावसाळी ढग सॅटेलाईटच्या चित्रात दिसल्याबरोबर सर्वात अधिक कोण सुखावत असेल, तर तो म्हणजे बळीराजा. नैसर्गिक पर्जन्यावर देशातील फार मोठी शेती अवलंबून आहे. चांगला पाऊस पडेल, तर भरपूर धान्य पिकेल, जनावरांना चारा उपलब्ध होईल आणि आर्थिक चक्र गतिमान होईल, हे सर्व शेतकरी बांधव जाणून असतात. भर उन्हाळ्यात चमकणार्‍या विजांची, अवकाळी पावसाची पर्वा न करता बळीराजाने जमीन नांगरून ठेवलेली असते. बियाणे आणून ठेवलेले असतात. खते आणून ठेवलेली असतात. मान्सूनचे आगमन लांबले, तर पहिली गोष्ट होत असेल ती म्हणजे उष्णतेची लाट कायम राहते.
आता सर्वत्र पाणीटंचाईच्या बातम्या पसरल्या आहेत. एखाद्या विहिरीने तळ गाठला असला, तरी त्यात अक्षरशः शेकडो घागरी सोडून महिला पाणी शेंदण्याचा प्रयत्न करत आहेत, असे चित्र सर्वत्र दिसते. ग्रामीण भागातच नव्हे तर शहरी भागातही टँकरच्या वार्‍या इकडून तिकडे आणि तिकडून इकडे गावभर लगबगीने धावताना दिसत आहेत. ‘पाणी म्हणजे जीवन’ असे म्हटले जाते, याचे कारण म्हणजे, पाण्याशिवाय जगणे माणसाला अशक्यप्राय आहे. अशा भरपूर समस्या असलेल्या वातावरणात मान्सून आला ही सर्वांना आनंदी करणारी घटना आहे. केरळमध्ये धडकल्यानंतर मान्सून महाराष्ट्रातही पोहोचला आहे. आता मान्सून काही दिवसांत संपूर्ण राज्य व्यापून टाकेल ही सुखावणारी बाब आहे. खरे तर गेल्या काही दिवसांतील हीच सर्वात आनंददायी बातमी म्हणावी लागेल.
जलधारांच्या रूपात ईश्वराचे आशीर्वाद शेतामध्ये पडले आणि पाठोपाठ पेरणी केली की, पिके टरारून वर येतात आणि अवघी सृष्टी चैतन्यमय वातावरणाने बहरून जाते. जिकडेतिकडे हिरवे गवत असल्यामुळे पाळीव जनावरे खुशीत सर्वत्र चरण्याच्या आनंद घेत असतात. पाणी प्रश्न सुटल्यामुळे महिलावर्गाने सुटकेचा निःश्वास टाकलेला असतो. पिके चांगली येतील, तर आपल्याला प्राप्ती चांगली होईल, यामुळे बळीराजाही अत्यंत खुशीत असतो. जूनच्या अखेरीला तुम्ही कुठेही प्रवासाला निघालात, तर शेतामध्ये पेरणी करताना बळीराजा आणि त्याची अर्धांगिणी कष्ट करताना तुम्हाला पाहायला मिळतील. कष्टाचे फळ त्यांना मिळावे, यासाठी आपण देवाकडे प्रार्थना करत असतो. येणारा पावसाळा तुम्हा सर्वांच्या जीवनात आणि विशेषत्वाने शेतकरी बांधवांच्या जीवनामध्ये हर्ष, उल्हास आणि चैतन्य घेऊन येवो, हीच प्रार्थना!