अजित पवारांच्या राष्ट्रवादीला केंद्रात मंत्रीपद नाही! फडणवीसांनी सांगितले कारण
नवी दिल्ली, Bharat Live News Media वृत्तसेवा : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रतिनिधित्व पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पहिल्या कॅबिनेटमध्ये असणार नाही. “अजित पवार गटाला केंद्रीय मंत्रिमंडळात राज्यमंत्री स्वतंत्र प्रभार देण्यात येणार होते मात्र अजित पवार गटाकडून प्रफुल पटेल हे नाव अंतिम होते. प्रफुल पटेल हे ज्येष्ठ नेते आहेत, यापूर्वी ते कॅबिनेट मंत्रीपदावर राहिले आहेत. त्यामुळे कॅबिनेट मंत्रीपदच हवे, अशी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची भूमिका होती. म्हणून मंत्रिमंडळ विस्तार होईल तेव्हा प्रफुल पटेल यांना कॅबिनेट मंत्रीपद देण्यात येईल,” अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली. ते दिल्लीत माध्यमांशी बोलत होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नव्या कॅबिनेटमध्ये कोण कोण असणार याची उत्सुकता सर्वांनाच होती. विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांची कॅबिनेट मंत्रीपदावर वर्णी लागणार, हे जवळपास निश्चित मानले जात होते. तशी तयारी देखील त्यांच्या जवळच्या सहकाऱ्यांकडून करण्यात आली होती. मात्र अजित पवार गटाची लोकसभेवर केवळ एक जागा निवडून आली. त्यामुळे अजित पवार गटाला जर कॅबिनेट मंत्रीपद दिले तर एनडीएतील इतर घटक पक्ष नाराज होण्याची शक्यता होती. सोबतच राज्यात ७ खासदार असलेल्या शिवसेना शिंदे गटालाही राज्यमंत्रीपद मिळणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे शिवसेना शिंदे गटासह इतर घटकपक्षांची नाराजी ओढवेल, या शक्यतेचा विचार करून भाजपने सावध भूमिका घेतली आणि अजित पवार गटाला राज्यमंत्रीपद स्वतंत्र प्रभार देऊ केले. मात्र अजित पवार गटाने ते नाकारले.
तत्पूर्वी आज सकाळी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वतः सुनील तटकरे यांच्या निवासस्थानी पोहोचले होते. दीर्घकाळ त्यांच्या निवासस्थानी बैठक चालली. या बैठकीमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्यासह प्रफुल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ, धनंजय मुंडे, समीर भुजबळ उपस्थित होते.
हेही वाचा :
NDA Cabinet 3.0 : भाजपचे 32, TDP-JDU ला 2-2; जाणून घ्या संभावित मंत्र्यांची यादी
‘मला माफ करा…’: ‘बीजेडी’च्या पराभवानंतर व्हीके पांडियन यांची राजकारणाला सोडचिठ्ठी