नागपूर : रामटेकचा पराभव महायुतीच्या जिव्हारी, सुरू झाल्या तक्रारी

नागपूर; राजेंद्र उट्टलवार : नागपूर जिल्ह्यातील रामटेक लोकसभा मतदारसंघातील पराभव महायुतीच्या चांगलाच जिव्हारी लागला असून भाजप आणि शिवसेना शिंदे गटात परस्परविरोधी तक्रारी सुरू झाल्या आहेत. पुन्हा एकदा मोदी सरकार सत्तेत येत असताना आपली हॅट्ट्रिकची संधी गेल्याने सेनेचे माजी खासदार कृपाल तुमाने कमालीचे अस्वस्थ आहेत. रामटेक मतदारसंघात आपण दोनदा जिंकलो, काँग्रेसचे राष्ट्रीय नेते मुकुल वासनिक यांना …

नागपूर : रामटेकचा पराभव महायुतीच्या जिव्हारी, सुरू झाल्या तक्रारी

नागपूर; राजेंद्र उट्टलवार : नागपूर जिल्ह्यातील रामटेक लोकसभा मतदारसंघातील पराभव महायुतीच्या चांगलाच जिव्हारी लागला असून भाजप आणि शिवसेना शिंदे गटात परस्परविरोधी तक्रारी सुरू झाल्या आहेत. पुन्हा एकदा मोदी सरकार सत्तेत येत असताना आपली हॅट्ट्रिकची संधी गेल्याने सेनेचे माजी खासदार कृपाल तुमाने कमालीचे अस्वस्थ आहेत. रामटेक मतदारसंघात आपण दोनदा जिंकलो, काँग्रेसचे राष्ट्रीय नेते मुकुल वासनिक यांना पराभूत केले. यावेळी तर आपली लढाई अधिकच सोपी होती. मात्र, सर्व्हे विरोधात आहेत असे सांगत उमेदवार बदलायला लावला, मग निवडून का नाही आणला? असा थेट सवाल त्यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना केला असून आपण दिल्लीत भाजप नेते अमित शहा यांची भेट घेत या सर्व प्रकरणी तक्रार करणार असल्याचे ‘Bharat Live News Media’शी बोलताना स्पष्ट केले.
शिंदे गटाने काँग्रेसचे आमदार राजू पारवे यांना तिकीट दिले. काँग्रेसचे उमेदवार श्यामकुमार बर्वे यांनी त्यांना पराभूत करीत माजी मंत्री सुनील केदार यांनी सर्वांना धक्का दिला. महायुतीच्या विजयासाठी आपल्या तिकिटावर पाणी सोडणारे माजी खासदार कृपाल तुमाने यांनी भाजपला लक्ष्य केले आहे. पराभवाचे बावनकुळे यांच्यावर खापर फोडले जात असताना स्वतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकमेकांवर दोषारोपण करू नका, पुन्हा एकत्रितपणे काम करू, विधानसभा निवडणुकीत जिंकू असा सबुरीचा सल्ला दिला आहे. मात्र, बावनकुळे यांच्या कामठी विधानसभा मतदारसंघात काँग्रेस उमेदवार श्यामकुमार बर्वे यांना मिळालेले मताधिक्य लक्षात घेता विद्यमान भाजप आमदार टेकचंद सावरकर यांच्यासाठी ही धोक्याची घंटा आहे. शिंदे गटही आक्रमक झाला आहे. सर्व्हे अनुकूल नव्हता तर भाजपच्याच निष्ठावान कुणालाही तिकीट देता आले असते, मात्र काँग्रेस आमदाराला शिवसेनेचे तिकीट देण्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर दडपण आणले असा आरोप त्यांनी केला.
कृपाल तुमाने यांनी याचे कारण देत आपले तिकीट कापण्यात चंद्रशेखर बावनकुळे हेच खरे व्हिलन असल्याचा आरोप दिल्लीत माध्यमांशी बोलताना केल्यानंतर नागपूर जिल्ह्यात खळबळ उडाली. यापेक्षा मोठी जबाबदारी दिली जाईल, असा शब्द मुख्यमंत्र्यांनी दिला असला, मंत्रीपद, आमदारकीचे आश्वासन दिले असले तरी तुमाने आणि राजू पारवे कुणाचे पुनर्वसन करणार? हा खरा प्रश्न आहे. यामुळेच त्यांनी आपल्या मनातील भावनांना मोकळी वाट करून दिली. पंतप्रधान मोदींच्या सभेतही त्यांची विचारपूस करण्यात आली होती. मात्र, भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष डॉ. राजीव पोतदार यांनी तुमाने यांनी भाजपवर, बावनकुळे यांच्यावर उगीचच आरोप करू नये, गेल्या दोन निवडणुकीत भाजपनेच त्यांना निवडून आणले असा दावा केला. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, बावनकुळे यांनी विधानसभेत आपलाच विजय असल्याचे सांगत कार्यकर्त्यांनी नाउमेद न होण्याचा, सबुरीचा सल्ला दिला एकंदरीत भाजप-सेनेत यामुळे ‘ऑल ईज वेल’ होणार का, हे लवकरच कळणार आहे.
हेही वाचा : 

महाराष्ट्रातून महिला मंत्री म्हणून रक्षा खडसेंना मान; मंत्रिपदाची घेणार शपथ
गडकरी, पासवान यांना शपथविधीसाठी फोन, TDPचे ‘हे’ नेते होणार मंत्री