नवी दिल्ली : मतमोजणीसाठी स्पष्ट मार्गदर्शक तत्त्वे जारी करावी; इंडिया आघाडीची निवडणूक आयोगाकडे मागणी

नवी दिल्ली : मतमोजणीसाठी स्पष्ट मार्गदर्शक तत्त्वे जारी करावी; इंडिया आघाडीची निवडणूक आयोगाकडे मागणी

नवी दिल्ली, Bharat Live News Media वृत्तसेवा : लोकसभा निवडणुकीचे 7 टप्पे नुकतेच पार पडले. मंगळवारी (दि.४ जून) मतमोजणी होत आहे. या मतमोजणीसाठी स्पष्ट आणि तपशीलवार मार्गदर्शक तत्त्वे जारी करावीत, ज्यामध्ये सर्वप्रथम पोस्टल मतांची मोजणी केली जावी, अशी मागणी इंडिया आघाडीच्या शिष्टमंडळाने निवडणूक आयोगाकडे रविवारी (दि.2) केली.
निवडणूक आयोगाकडे मतमोजणी संदर्भातील मागण्या सादर केल्यानंतर डॉ. अभिषेक मनु सिंघवी यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी सिंघवी म्हणाले की, “बहुपक्षीय शिष्टमंडळ निवडणूक आयोगाला भेटण्याची ही तिसरी वेळ आहे. आम्ही काही मागण्या त्यांच्याकडे केलेल्या आहेत. त्या ऐकूण घेतल्या गेल्या त्यांचे पालन होईल अशी अपेक्षा आहे. तसेच आमच्या मागण्या काही नव्या नसून जे नियम आहेत त्यांचे नीट पालन झाले पाहिजे,” असेही डॉ. सिंघवी म्हणाले.
पुढे बोलताना डॉ. सिंघवी म्हणाले की, “निवडणूक आयोगाने प्रथम पोस्टल मतपत्रिकांच्या मोजणीबाबत नियम बदलण्याचा निर्णय घेतला आहे. विद्यमान नियम ५४-अ अंतर्गत, कोणत्याही परिस्थितीत ईव्हीएमद्वारे मतमोजणी पूर्ण होण्यापूर्वी पोस्टल मतपत्रिकांची मोजणी पूर्ण करणे आवश्यक आहे. पोस्टल मतपत्रिकांची मोजणी पूर्ण झाली नाही तर ईव्हीएमद्वारे झालेल्या मतमोजणीचा निकाल जाहीर करता येणार नाही, असा नियम आहे.
पोस्टल मतपत्रिका पूर्णपणे बदलू शकतात आणि अंतिम निकालावर परिणाम करू शकतात. वैधानिक नियम मार्गदर्शक तत्त्वाद्वारे बदलले जाऊ शकत नाही. त्यामुळे, ईव्हीएम मतमोजणी पूर्ण करण्यापूर्वी पोस्टल मतपत्रिकांची मोजणी पूर्ण करावी लागेल हा नियम निवडणूक आयोग रद्द करू शकत नाही. आम्ही फक्त विद्यमान नियमांची अंमलबजावणी करण्यास सांगत आहोत, त्यानुसार आधी पोस्टल मतांची मोजणी केली जावी. मतमोजणी अधिकाऱ्यांनी मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्याचे निर्देश देण्यात यावे,” अशा मागण्या केल्याचे डॉ. सिंघवी म्हणाले.
यावेळी इंडिया आघाडीच्या या शिष्टमंडळात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉ. अभिषेक मनु सिंघवी, सलमान खुर्शीद, नासीर हुसेन, सपा नेते राम गोपाल यादव, माकप नेते सीताराम येचुरी, कम्युनिस्ट पक्षाचे नेते डी. राजा आणि आप नेते पंकज गुप्ता आदींचा समावेश होता.
हेही वाचा : 

लोकसभेच्या मतमोजणीपूर्वी इंडिया आघाडी पाठोपाठ भाजपही निवडणूक आयोगाकडे
देशाच्या गृहमंत्र्यांनी 150 कलेक्टरांना फोन करून धमकावले : नाना पटोले
गर्भपात करणारी महिला डॉक्टर गजाआड