सोलापूरच्या पर्यटकाचा गणपतीपुळे समुद्रात बुडून मृत्यू

सोलापूरच्या पर्यटकाचा गणपतीपुळे समुद्रात बुडून मृत्यू

गणपतीपुळे; Bharat Live News Media वृत्तसेवा : रत्नागिरी तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आणि जागतिक दर्जाचे पर्यटनस्थळ असलेल्या गणपतीपुळे येथील समुद्रात रविवारी सकाळी 11.30 वा.च्या सुमारास सोलापूर जिल्ह्यातील अजित धनाजी वाडेकर (25) या तरुणाचा समुद्राच्या पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली. तीन तरुणांना वाचविण्यात स्थानिक जीवरक्षक, व्यावसायिक व गणपतीपुळे पोलिसांना यश आले.
गणपतीपुळे येथे रविवारी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास सोलापूर जिल्ह्यातील इसबावे या ठिकाणाहून अजित धनाजी वाडेकर (25), अजय बबन शिंदे (23), सार्थ दत्तात्रय माने (24) व आकाश प्रकाश पाटील (25) असे चार तरूण गणपतीपुळे येथे देवदर्शनासाठी व पर्यटनासाठी आले होते. यावेळी या तरूणांनी प्रथम देवदर्शन न करता गणपतीपुळे समुद्राच्या पाण्यात आंघोळीसाठी उतरण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार हे चारही तरूण समुद्राच्या पाण्यात उतरले असता त्यांनी खोल पाण्यात जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी अजित वाडेकर हा खोल समुद्राच्या पाण्यात जाऊन अडकला. यावेळी अजित याला पाण्याबाहेर येता येत नसल्याचे लक्षात येता त्याच्याबरोबर असलेल्या तरूणांनी व समुद्राच्या पाण्यात असलेल्या इतर पर्यटकांनी आरडाओरडा करण्यास सुरुवात केली. ही बाब समुद्रकिनार्‍यावर तैनात असलेल्या गणपतीपुळे ग्रामपंचायतीच्या जीवरक्षक व सध्या गर्दीचा हंगाम असल्याने गस्तीवर असलेल्या गणपतीपुळे पोलिस दूरक्षेत्राचे सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक संदीप साळवी व हेड हेड कॉन्स्टेबल कुणाल चव्हाण यांच्या निदर्शनास येताच त्यांनी तत्कळ जीवरक्षकांना पाचारण करून समुद्राच्या पाण्यात पाण्यात गटांगळ्या खाणार्‍या तरुणाच्या सुटकेसाठी पाठवले.
यावेळी गणपतीपुळे समुद्रकिनार्‍यावरील जीवरक्षक अक्षय माने, महेश देवरुखकर, अजिंक्य रामाणी, विशाल निंबरे आदींसह गणपतीपुळे समुद्रकिनार्‍यावरील ए. टी. व्ही. व्यावसायिक राकेश शिवलकर यांनी समुद्राच्या पाण्यात उड्या घेऊन समुद्राच्या खोल पाण्यात अडकलेल्या तीन तरूणांना पाण्याबाहेर काढले. त्यानंतर समुद्राच्या पाण्यात अडकलेल्या अजित वाडेकर या तरूणाला वाचविण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याला पाण्याबाहेर काढल्यानंतर तो बेशुद्धावस्थेत असल्याने त्याला जीवरक्षक, स्थानिक व्यावसायिक व पोलिसांच्या मदतीने गणपतीपुळे देवस्थानच्या रुग्णवाहिकेने तातडीने मालगुंड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी नेण्यात आले. मात्र या ठिकाणी अजित याने उपचाराला प्रतिसाद न दिल्याने त्याला मालगुंड येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी मधुरा जाधव यांनी मृत घोषित केले. या तरुणाचे शवविच्छेदन करून त्याचा मृतदेह त्याच्या कुटुंबीय नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात येणार असल्याची माहिती गणपतीपुळे पोलिस दूरक्षेत्राच्या वतीने देण्यात आली आहे.
या घटने संदर्भात अधिक तपास जयगड पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक कुलदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गणपतीपुळे पोलिस दूरक्षेत्राचे पोलिस कर्मचारी करीत आहेत.
स्थानिकांच्या सूचनांकडे दुर्लक्ष केल्याने दुर्घटना
सध्या गणपतीपुळे येथे उन्हाळी पर्यटन हंगाम गर्दीने गजबजत असून पर्यटक व भाविकांनी समुद्राच्या खोल पाण्यात आंघोळीसाठी जाऊ नये, असे आवाहन गणपतीपुळे ग्रामपंचायत व जयगड पोलिस ठाण्याच्या वतीने करण्यात आले आहे. तरीही पर्यटक समुद्राच्या पाण्यात आंघोळ करण्यासाठी उतरतात. पर्यटक स्थानिकांच्या सूचनांचे पालन करीत नसल्याचे या घटनेवरून लक्षात येत आहे.
वर्षभरापूर्वीच झाले होते लग्न
या दुर्घटनेत मृत्यू ओढवलेला अजित वाडेकर हा एकुलता मुलगा होता. तो सोलापूर येथे गॅरेज चालवत होता. वर्षभरापूर्वीच त्याचे लग्न झाले होते. आता पावसाळा जवळ आल्याने समुद्र खळवलेला आहे. समुद्राचे पाणी वाळूमिश्रित झाले आहे. हे वाळूमिश्रित पाणीच नाकातोंडात गेल्याने गुदमरून त्याचा मृत्यू झाला.