‘एक्झॅक्ट पोल’चा फैसला उद्या

‘एक्झॅक्ट पोल’चा फैसला उद्या

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : शनिवारच्या एक्झिट पोलच्या अंदाजांनंतर अवघ्या देशाची उत्सुकता ताणली गेली असून मंगळवारी मतमोजणीनंतर लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए विरुद्ध काँग्रेसच्या पुढाकाराने विरोधकांनी स्थापन केलेली इंडिया आघाडी यांच्यात प्रमुख लढत असून एनडीए 400 पार होणार की नाही याची सर्वांनाच उत्सुकता लागून राहिली आहे.
देशात सात टप्प्यांत लोकसभा निवडणूक पार पडली. 19 एप्रिल रोजी पहिल्या टप्प्याच्या मतदानाने ही प्रक्रिया सुरू झाली ती काल 1 जून रोजी सातव्या टप्प्याच्या मतदानाने संपली. सात टप्प्यांत झालेल्या मतदानाच्या टक्केवारीच्या आधारे शनिवारी सर्वच माध्यमांनी एक्झिट पोलचे अंदाज जाहीर केले. त्यात बहुतेक सर्वांनी भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए 300च्या पुढे जागा घेऊन सत्तेत येत असल्याचा अंदाज वर्तवल्याने प्रत्यक्ष निकालाबाबत उत्सुकता ताणली गेली आहे.
भाजपला अपेक्षा मोदींच्या करिष्म्याची
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जादू पुन्हा चालेल, अशी भाजपची अपेक्षा असून भाजपच्या पुढाकाराने एनडीए ही निवडणूक लढवत आहे. मागील दहा वर्षांतील कामे आणि उज्ज्वल भारताची पायाभरणी हे दोन मुद्दे घेत एनडीएने प्रचाराची रणधुमाळी गाजवली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विक्रमी सभा घेत देशाचा कानाकोपरा गाठत मतदारांशी संवाद साधला. गृहमंत्री अमित शहा आणि भाजपच्या इतर केंद्रीय नेत्यांनीही त्यात भर टाकत प्रचार गाजवून सोडला.
इंडिया आघाडीला अपेक्षा परिवर्तनाची
काँग्रेसच्या पुढाकाराने विरोधकांची इंडिया आघाडी स्थापन झाली. काही मित्रपक्षांतील कुरबुरी वग्रळता इंडिया आघाडीने या निवडणुकीत भाजपला थेट आव्हान दिले. संविधान, महागाई, बेरोजगारी या विषयांवर त्यांनी प्रचारात भर दिला. राहुल व प्रियांका गांधी यांनी देशभरात प्रचारसभा घेत वातावरण तापवले. सोनिया गांधी मात्र प्रकृतीच्या कारणास्तव प्रचारात उतरल्या नाहीत. दुसरीकडे विविध राज्यांतील घटक पक्षांनी आपापल्या राज्यांत प्रचाराची धुरा सांभाळत भाजपला टक्कर देण्याची स्थिती निर्माण केली.
या राज्यांवर लक्ष केंद्रित
लोकसभा निवडणूक जरी देशात होत असली तरी निकालाच्या दृष्टीने सात राज्ये कळीची ठरणार आहेत. त्यात उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, प. बंगाल, राजस्थान, मध्य प्रदेश, बिहार, कर्नाटक या राज्यांचा समावेश आहे. गेल्या निवडणुकीत या सर्व राज्यांत नेत्रदीपक कामगिरी करणार्‍या भाजपला त्याच यशाची पुनरावृत्ती करावी लागणार आहे; तर भाजपचा अश्वमेध रोखण्यासाठी या राज्यांत इंडिया आघाडीला यश मिळवावे लागणार आहे.
आता लक्ष मतमोजणीकडे
दीड महिन्याच्या घमासान प्रचारानंतर व सर्व मतदान पूर्ण झाल्यानंतर आता देशाचेच नव्हे तर जगाचे लक्ष निकालाकडे लागले आहे. मंगळवारी 4 जून रोजी सकाळी 8 वाजता देशात एकाच वेळी 543 मतदारसंघांत मतमोजणीला प्रारंभ होणार आहे. साधारणपणे 10 वाजेपासून कल मिळायला लागतील व दुपारी उशिरा निकाल हाती येण्याची शक्यता आहे. त्याच दिवशी सायंकाळी सत्तेत कोण आले हे ठरेल.
प्रशासन सज्ज
सर्व मतदारसंघांत मतमोजणीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली असून रविवारी या तयारीचा अंतिम आढावा घेण्यात आला. सुरक्षा व्यवस्था, मतमोजणीची टेबले, मतमोजणी करणारे अधिकारी कर्मचारी या सार्‍यांचा आढावा घेण्यात आला.