एसटी वर्धापन दिन विशेष : एसटी सुसाट..; 87 हजार कर्मचार्यांचा वटवृक्ष
पुणे : Bharat Live News Media वृत्तसेवा : पुणे- अहमदनगर मार्गावर 1 जून 1948 रोजी राज्य परिवहन महामंडळाची पहिली बस धावली. तेव्हापासून आतापर्यंत एसटीची वाटचाल सुसाट सुरू आहे. 36 बेसफोर्ड बसवरून सुरू झालेल्या एसटीच्या ताफ्यात तब्बल 15 हजार बस असून
87 हजार एसटी कर्मचार्यांचा राबता आहे. आज (दि. 01 जून) एसटीचा 76 वा वर्धापन दिन आहे. त्यानिमित्त दै. ‘Bharat Live News Media’ च्या वतीने एसटीच्या 76 वर्षांच्या वाटचालीचा आढावा घेण्यात आला.
ऊन, वारा, पाऊस याची तमा न बाळगता अनेक अडी-अडचणी, अडथळे, आर्थिक संकटांवर मात करत राज्याच्या डोंगरदर्यातील वाड्या-वस्त्यांपासून आदिवासी पाड्यांपर्यंत एसटी आपली प्रवासी सेवा देत आहे. सुरुवातीला केवळ 36 बेसफोर्ड बसेसवर सुरू झालेला हा प्रवास 76 वर्षांत 15 हजार बसपर्यंत पोहोचला आहे. या बसेसच्या माध्यमातून 560 पेक्षा जास्त बसस्थानकांवरून दररोज सरासरी 55 लाख प्रवाशांची वाहतूक केली जाते. 75 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक, महिला, दिव्यांग, शालेय विद्यार्थी, विद्यार्थिनी, पत्रकार अशा 30 पेक्षा जास्त समाजघटकांना एसटीच्या प्रवाशी सेवेमध्ये 33 टक्क्यांवरून 100 टक्क्यांपर्यंत शासनाद्वारे सवलत दिली जाते.
एसटीच्या अन्य बस
2003 ते 2015 पर्यंतच्या बस
सुधारित साधी बस – 2003 मध्ये
परिवर्तन बस – 2005 मध्ये
वारी बस – 2008 मध्ये
सीएनजी बस – 2009 मध्ये
स्कूलबस – 2012 मध्ये
सिंहस्थ कुंभमेळा बस – 2015 मध्ये
इलेक्ट्रिक शिवाई, ई-शिवनेरी -2023-24 मध्ये
सध्या धावणार्या एसटीच्या बस
सामान्य बस (साधी बस- लालपरी)
एशियाड बस
हिरकणी बस
अश्वमेध बस
शिवनेरी बस
शिवशाही बस
नवीन साधी बस
विठाई बस
नवीन लालपरी
इलेक्ट्रिक शिवाई, शिवनेरी बस
अशी बदलत गेली एसटी
इंग्रजांची सत्ता संपुष्टात आल्यानंतर राज्यात एसटीची सेवा सुरू झाली. त्यानंतर एसटीची विविध रूपे पहायला मिळाली. 1948 सालची साधी बस ते आताची इलेक्ट्रिकवर धावणारी शिवाई, शिवनेरी आणि नवी लालपरी ही रूपे राज्यातील शहरासह गावांतील नागरिकांनी पाहिली. बीएसआरटीसीची पहिली बस 1 जून 1948 यादिवशी पुणे ते अहमदनगर या मार्गावर धावली. त्यानंतर बीएसआरटीसीचे विलीनीकरण करून नव्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एमएसआरटीसी) या नावाने महामंडळाचा कारभार सुरू आहे. पहिली लक्झरी आरामबस 1964 मध्ये तयार झाली. दापोडीच्या कार्यशाळेत ही बस तयार झाली.
पहिली वातानुकूलित बस 1965 साली दापोडीच्या कार्यशाळेत बनवण्यात आली. दुमजली ट्रेलर (डबल डेकर) बस 1967 मध्ये दापोडीच्याच कार्यशाळेत तयार झाली. प्रवाशांसाठी ही बस आकर्षण ठरली. पहिली शयन (स्लीपर) आसनी बस 1970 मध्ये दापोडी कार्यशाळेने बनवली. या बस पहिल्यांदा मुंबई ते पणजी मार्गावर धावल्या. त्यानंतर त्या मुंबई ते कोल्हापूर मार्गावर सोडण्यात आल्या. साधी बस म्हणजेच पहिली लालपरी 1999 मध्ये तयार झाली. ती एसटीची ओळख बनली. त्यानंतर 2002 मध्ये मिनी आणि मिडी बस दाखल झाल्या. या 9 मी. लांबीच्या 32 आसनी होत्या. त्यानंतर एसटीच्या ताफ्यात 2002 मध्येच शिवनेरी बस दाखल झाल्या. दादर-पुणे मार्गावर या व्होल्वो शिवनेरी वातानुकूलित बस अजूनही धावत आहेत. आता या इलेक्ट्रिक बसदेखील बनल्या आहेत.
हेही वाचा
Nashik News | धक्कादायक | दारणा नदीपात्रात आंघोळीसाठी गेलेल्या पती-पत्नी पैकी पतीचा बुडून मृत्यू
बीड : पुरवठा विभागातील कोतवाल २० हजारांची लाच घेताना रंगेहाथ सापडला
उन्हामुळे पालेभाज्या कडाडल्या; कोथिंबीर 60 तर मेथी 40 ते 50 रुपये गड्डी