चार हजार वर्षांपूर्वी झाला होता कर्करोगावरील उपचाराचा प्रयत्न

चार हजार वर्षांपूर्वी झाला होता कर्करोगावरील उपचाराचा प्रयत्न

कैरो : चार हजार वर्षांपूर्वी प्राचीन इजिप्शियन लोकांनी शस्त्रक्रियेच्या माध्यमातून कर्करोगावर उपचार करण्याचा प्रयत्न केला होता, असे आता एका कवटीच्या अभ्यासावरून दिसून आले आहे. ही कवटी इंग्लंडच्या केब्रिज युनिव्हर्सिटीतील डकवर्थ कलेक्शनमध्ये होती. ती इसवीसन पूर्व 2686 ते 2345 या काळातील आहे. या कवटीमध्ये मोठ्या आकाराच्या प्रायमरी ट्युमरचे पुरावे आहेत. तसेच तीसपेक्षा अधिक सूक्ष्म असे मेटास्टेटिक घाव आढळले आहेत. हे घाव कापल्याच्या खुणांनी वेढलेले आहेत. कदाचित त्या काळातील लोकांनी धारदार शस्त्राद्वारे या रुग्णाच्या डोक्यावर शस्त्रक्रिया करण्याचा प्रयत्न केला असावा. हा रुग्ण तिशीतील तरुण पुरुष होता, असे दिसून येते.
यापूर्वीची कर्करोगाबाबतची सर्वात जुनी नोंद इजिप्तमधीलच इसवी सन पूर्व 1600 या काळातील आहे जी एडविन स्मिथ पॅपिरस यांनी केली होती. आता या नव्या नोंदीची माहिती ‘फ्रंटियर्स इन मेडिसिन’ या जर्नलमध्ये देण्यात आली आहे. स्पेनच्या सँतियागो डी कोम्पोस्टेला युनिव्हर्सिटीतील पॅलियोपॅथोलॉजिस्ट एडगर्ड कॅमेरोस पेरेझ यांनी सांगितले की, कर्करोगाशी थेट संबंधित सर्वात जुन्या शस्त्रक्रियेचा हा पहिला पुरावा आहे. तेथूनच आधुनिक उपचार पद्धतीस सुरुवात झाली, असे म्हणता येऊ शकते.
संशोधकांच्या टीमने आणखी एका कवटीचे यावेळी अध्ययन केले. ही कवटी 50 वर्षांच्या एका महिलेची असून ती इसवी सनपूर्व 664 ते 343 या काळातील होती. तिची कवटीही डकवर्थ कलेक्शनमध्ये ठेवण्यात आली होती. तिच्याही कवटीमध्ये कर्करोगामुळे निर्माण झालेल्या एका मोठ्या घावाची खुण आहे. तसेच धारदार शस्त्राने झालेल्या हल्ल्यामुळे बनलेल्या जखमेच्याही दोन खुणा तिच्या कवटीत आहेत.