मद्याच्या नशेत तर्र अन्…! रईसजाद्याच्या कारनाम्यावर एक प्रकाशझोत
अशोक मोराळे, महेंद्र कांबळे, पुणे
पुण्यातील एका मस्तवाल आणि मद्यधुंद रईसजाद्याने आपल्या भरधाव कारने (Pune Porsche Car Accident) एक युवक आणि एक युवती अशा दोन होतकरू अभियंत्यांचा बळी घेतला. राज्यभरातून त्याबद्दल संतापजनक प्रतिक्रिया उमटत आहेत. या प्रकरणी त्याच्या अब्जाधीश बापाने पोराला या सगळ्या कचाट्यातून वाचविण्यासाठी बरीच उठाठेव केली. त्यामुळे त्यालाही कठोरातील कठोर शिक्षा व्हायला पाहिजे, अशी मागणी जोर धरत आहे. या रईसजाद्याच्या कारनाम्यावर एक प्रकाशझोत…
ही कहानी आहे पुण्यातील एका बांधकाम व्यावसायिकाच्या मद्यधुंद रईसजाद्याने केलेल्या कृत्याची. वार शनिवार… ठिकाण… कल्याणीनगरचा परिसर! अनिस अवधिया मूळचा मध्यप्रदेशातील पालीचा, तर त्याची मैत्रीण अश्विनी कोस्टा ही देखील मध्यप्रदेशातील जबलपूरची. दोघेही पेशाने आयटी अभियंता. नोकरीच्या निमित्ताने त्यांचे पुण्यात वास्तव्य होते. मात्र, शनिवारची रात्र दोघांसाठीही काळ बनून आली. अनिस आणि मैत्रीण अश्विनी दोघे सॅटर्डेनाईट पार्टीसाठी एका हॉटेलमध्ये गेले होते. पार्टी संपल्यानंतर दोघे बाहेर पडले. साधारण मध्यरात्रीचे अडीच वाजले असतील. दोघे दुचाकीवरून घराच्या दिशेने निघाले होते. इतक्यात कल्याणीनगर जंक्शन चौकात एका भरधाव पोर्शे कारने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. अपघात (Pune Porsche Car Accident) एवढा भयानक होता की, अश्विनी हवेत उडून काही फूट फरफटत गेली. तिचा जागीच मृत्यू झाला, तर अनिस हा देखील गंभीर जखमी झाला होता. उपचारासाठी त्याला नजीकच्या खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. तेथे उपस्थित असलेले काही प्रत्यक्षदर्शी नागरिक या भयानक घटनेचे साक्षीदार आहेत. त्यांच्या निदर्शनास हा प्रकार येताच, त्यांनी तत्काळ अपघाताकडे धाव घेत तो रईसजादा आणि त्याच्या मित्रांना पकडून ठेवले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेली अश्विनी पाहताच त्यांना संताप अनावर झाला. त्यामुळे त्या बेवड्या रईसजाद्याला नागरिकांनी चोप दिला. तसेच त्याची गाडी दगडाने फोडली. पोलिसांना माहिती मिळताच, त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन त्या अल्पवयीन दारुड्या मुलाला ताब्यात घेतले.
बारावीची परीक्षा उत्तीर्ण झाल्यामुळे हा रईसजादा आपल्या मित्रांना पार्टीसाठी घेऊन गेला होता. मुंढवा येथील हॉटेल कोझी आणि मेरीयट सुटमधील ब्लॅक नावाच्या पबमध्ये त्यांनी मद्यप्राशन केले. त्यांची मद्यखरेदी, पिण्याचा प्रकार सर्व सीसीटीव्ही कॅमेर्यात कैद झाले आहे. एक्साईजच्या अहवालात देखील हा मुद्दा नमूद आहे. मद्याच्या नशेत तर्र झाल्यानंतर या रईसजाद्याने आलिशान पोर्शे कारचा ताबा आपल्याकडे घेतला. बेफान वेगाने गाडी हाकत त्याने अनिस आणि अश्विनी यांच्या दुचाकीला भरधाव वेगात धडक दिली. त्यामध्ये दोघांचा मृत्यू झाला. रईसजादा अल्पवयीन असताना देखील त्याच्या हातात महागडी कार देण्यात आली. विना क्रमांकाची ही कार तो शहरभर फिरवत होता, हे गंभीर आहे. तसेच हा बडे बाप का बेटा अल्पवयीन असतानादेखील दोन्ही हॉटेल्स् आणि पबचालकांनी त्याला मद्यविक्री केली, हेही गंभीर आहे. चालक अल्पवयीन मुलगा असल्यामुळे काही तासात त्याला जामीन झाला. मात्र, या सगळ्याला जबाबदार असलेल्या त्याच्या बापालाही कठोर शिक्षा व्हायला हवी, असा नागरिकांचा आग्रह आहे.
एकीकडे असा प्रसंग ओढावला असताना, दुसरीकडे पैशाच्या गुर्मीत असलेल्या त्या दिवट्या कार्ट्याच्या बापाने आपलं पोरगं जणू काही फार मोठे गुण उधळून आले आहे, अशा थाटात मुलाची पाठराखण करण्यासाठी जी काही धावपळ केली, तो संतापाचा मुद्दा ठरला आहे. सुरुवातीला त्याने कार आपला मुलगा नव्हे तर त्याचा चालक चालवत होता, असा बनाव करण्याचा त्याने प्रयत्न केला. पण, या घटनेचे प्रत्यक्षदर्शी अनेक साक्षीदार असल्याने त्याचा तो प्रयत्न विफल ठरला. मात्र, या करोडपती बापाच्या उचापती बघता मुले गमावलेल्या आई-वडिलांना भविष्यात खरचं न्याय मिळणार की, इतर प्रकरणाप्रमाणे या घटनेची झालेली चर्चा हवेतच विरून जाणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
समाज माध्यमांवर नागरिकांकडून संताप…
बड्या बिल्डरचा मुलगा असल्यानेच त्याला यंत्रणांकडून वाचविले जात असल्याची चर्चा मागील चार दिवसांपासून रंगली होती. त्या अल्पवयीन बेवड्या पोराला तत्काळ मिळालेला जामीन, पोलिस ठाण्यात त्याला बर्गर, कोल्ड्रिंक दिल्याचा आरोप, अल्पवयीन असताना त्याला पबमध्ये मद्य पुरविणे, त्याला घरून अल्पवयीन असताना गाडी देणे, तरुण-तरुणीला भरधाव कारने उडविल्यानंतर मुलाला नागरिकांकडून मिळालेला चोप, त्याचा मद्य प्राशन न केल्याबाबतचा आलेला मेडिकल अहवाल, न्यायालयाकडून जामीन मिळाल्यानंतर देण्यात आलेली निबंध लेखनाची शिक्षा, वाहतूक नियमन करण्याची मिळालेली शिक्षा, मद्य सोडविण्यासाठी मानसोपचार तज्ज्ञांचा सल्ला घेण्याबाबत न्यायालयाने दिलेला आदेश, अशा सर्व बाबींचा नागरिकांकडून समाज माध्यमांवर अक्षरश: कीस काढण्यात आला. कायदा हा फक्त गरिबांसाठी, श्रीमंतांसाठी नाहीच अशीही चर्चा समाज माध्यमावर रंगली होती. काही राजकीय पक्षाकडून पोलिसांवर दबाव टाकला जात असल्याची देखील चर्चा समाज माध्यमांवर रंगल्याचे पाहायला मिळाले.
अपघातानंतर काय झालं…
रविवारी पहाटे अडीचच्या सुमारास अपघात झाल्यानंतर नागरिकांनी चोप देत अल्पवयीन मुलाला पोलिसांच्या हवाली केले. पोलिस ठाण्यात मुलाला आणल्याची खबर पित्याला मिळाल्यानंतर ओळखीच्या राजकीय मंडळीच्या मदतीने त्याने पोलिस ठाणे गाठले. याप्रकरणात मुलावर 304 ए नुसार व अन्य कलमानुसार गुन्हा दाखल झाला. त्याला लागलीच दुपारी अटक करून न्यायालयात नेण्यात आले. न्यायालयात हजर करण्यात आल्यानंतर न्यायालयाने त्याला काही अटी-शर्तींवर जामीन मंजूर केला. आता याच प्रकरणी मुलाच्या वडिलांना व मद्य पुरविणार्या पब मालकांना पुणे पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे.