थरारक ‘रोलर कोस्टर’ची निर्मिती कशी झाली?

न्यूयॉर्क : बहुतांशी जणांनी यात्रेत-जत्रेत किंवा एखाद्या महोत्सवात रोलर कोस्टर राईडसद़ृश्य पाळण्याचा थरार अनुभवलेला असतो. पण, हा अंगावर शहारे आणणारा अनुभव देणार्या रोलर कोस्टर राईडची निर्मिती कशी झाली, त्याचा क्वचितच आपण विचार केला असेल.
रोलर कोस्टर राईड म्हणजे रोमांच आणणार्या पाळण्यातील फेरी. हा पाळणा बहुतांशी जिलेबीसारख्या वेटोळ्या आकाराचा असतो. प्रचंड वेगाने तो वर-खाली करतो, त्यावेळी भीतीने गाळण उडाल्याशिवाय राहत नाही. अगदी हृदयाचा ठोका आता चुकतो की नंतर, असे वाटून जाते. पुढील क्षणी काय होईल, असे विचार मनात येऊ लागतात आणि केव्हा एकदा आपण त्यातून बाहेर येतो, याची प्रतीक्षा करणे सुरू होते. यावरून हा पाळणा किंवा रोलर कोस्टर राईड किती भयंकर असेल, याचा अंदाज बांधता येईल.
ज्यांना साहसी बाबी आवडतात, ते लोक अशा रोलर कोस्टर राईडमध्ये अगदी आनंदाने बसतात. पण, रोलर कोस्टर राईड मुळात मनोरंजन किंवा अॅडव्हेंचरसाठी बनवण्यात आलेली नव्हती, असे म्हटले तर तोही आश्चर्याचा एक धक्का असेल. याचमुळे त्याची निर्मिती नेमकी कशासाठी झाली, हे रंजक आहे.
19 व्या शतकात लोकांना असभ्य गोष्टींपासून लांब ठेवण्यासाठी रोलर कोस्टर राईडची निर्मिती करण्यात आली. 1884 च्या आधीपर्यंत बहुतेक अमेरिकन नागरिक जुगार खेळत असत व आणखीही अनैतिक बाबींकडे वळत. नागरी युद्धानंतर त्यांना हे शौक जडले होते. कितीतरी अमेरिकन लोकांना श्रीमंतांच्या या वर्तनाबद्दल चिंता वाटत होती. त्यातच लामार्कस अदना थॉम्पसन या गृहस्थांचाही समावेश होता.
लामार्कस अदना थॉम्पसन एकदा पेन्सिल्वानिया इथे गेले होते. तिथे त्यांनी ‘मॉच चंक’ या शहरात एका जुन्या मायनिंग रेल्वेमध्ये लोक निव्वळ विरंगुळा म्हणून बसलेले पाहिले. तिथले खाणकाम संपले होते, त्यामुळे त्या ट्रेनच्या 80 मिनिटांच्या प्रवासासाठी नागरिक एक डॉलर खर्च करायला तयार होते. या ट्रेनमध्ये बसून वर-खाली प्रवासाचा आनंद हे लोक लुटत होते. हे बघितल्यानंतर लामार्कस अदना थॉम्पसन यांना रोलर कोस्टर राईडची कल्पना सुचली. ते कोनी आयलँडला परत आले आणि त्यांनी रोलर कोस्टरची निर्मिती करण्यास सुरुवात केली.
1884 मध्ये जगातील पहिले रोलर कोस्टर तयार झाले. त्या काळात पाच सेंट म्हणजे अंदाजे आठ पैसे खर्च करून लोक या रोलर कोस्टर राईडचा आनंद लुटत असत. याचमुळे आताही लामार्कस अदना थॉम्पसन यांना अमेरिकन रोलर कोस्टरचा जनक म्हणून ओळखले जाते.
