यंदा ‘पीओपी’ गणेशमूर्तींना सरसकट बंदी; मुंबई महापालिकेचा निर्णय

यंदा ‘पीओपी’ गणेशमूर्तींना सरसकट बंदी; मुंबई महापालिकेचा निर्णय

मुंबई: Bharat Live News Media वृत्तसेवा: गणेशोत्सव व नवरात्रोत्सवात केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या मार्गदर्शक तत्त्वाचे पालन करण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला आहे. त्यामुळे यंदा गणेश मुर्त्यांप्रमाणे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या पीओपी मुर्त्यांना सरसकट बंदी घालण्यात येणार असल्याचे समजते. त्यामुळे गणेश उत्सव मंडळांना यंदा शाडूच्या मूर्तीशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही.
‘पीओपी’ गणेशमूर्त्यांना सरसकट बंदी का?

पीओपी पाण्‍यात विरघळत नसल्यामुळे गाळ तळाशी साचतो.
जलाशयातील जिवंत झरे बंद होतात.
मूर्तीवरील रासायनिक रंगामुळे जल प्रदूषण होऊन जलचरांना धोका
त्यामुळे केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने २०२० मध्ये पीओपीवर बंदी घातली

गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सवात पीओपीच्या मूर्तींवर पूर्णपणे घालण्यात आलेली बंदी योग्यच असल्याचे निरीक्षण मुंबई हायकोर्टाने नोंदवले आहे. पीओपी पाण्‍यात विरघळत नसल्यामुळे अशा गणेश मूर्तींचा गाळ विहीर, तलाव आणि जलाशय यांच्या तळाशी साचतो. यामुळे जलाशयातील जिवंत झरे बंद होतात. तसेच या मूर्तीवरील रासायनिक रंगामुळे जल प्रदूषण होऊन जलचरांना देखील धोका निर्माण होतो. यामुळे केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने २०२० मध्ये पीओपी मूर्ती वापरास व विक्रीस बंदी घातली आहे. परंतु, राजकीय हस्तक्षेपामुळे पीओपीचा वापर अद्यापपर्यंत थांबलेला नाही. मात्र, यंदापासून पीओपी गणेश मूर्ती यावर सरसकट बंदी घालण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला आहे.
२०२३ मध्ये घरगुती गणेशमूर्ती शाडूच्या मातीच्याच असाव्यात, असे बंधनकारक करण्यात आले होते. विशेष म्हणजे यासाठी शाडूची मोफत मातीही मूर्तिकारांना देण्यात आली होती. यंदाही शाडूच्या मातीचे मोफत वाटप करण्यात येणार आहे. २०२३ मध्ये सार्वजनिक गणेश मूर्तीसाठी शाडूचा वापर करणे खर्चिक व अशक्य असल्यामुळे गणेश मूर्तीकारांनी पीओपी गणेश मूर्तीसाठी आग्रही भूमिका घेतली होती. याला राजकीय पाठबळ मिळाल्यामुळे सार्वजनिक गणेश मूर्त्यांना पर्यावरण पूरक मुर्त्यांमधून वगळण्यात आले होते.
मात्र, यंदा गणेश मूर्ती बनविण्यासाठी सरसकट पीओपीला बंदी घालण्याचा विचार मुंबई महापालिकेचा आहे. त्यामुळे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनाही पर्यावरण पूरक गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना करावी लागणार आहे. याबाबत लवकरच गणेशोत्सव समन्वय समिती, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, मुंबई महापालिका यांच्यात बैठक होणार असल्याचे समजते.
पर्यावरण पूरक उंच मूर्ती बनवणे शक्य
मुंबईतील गणेशोत्सव उंच मुर्त्यांसाठी प्रसिद्ध आहे. उंच मुर्तींची ही परंपरा कायम टिकवण्यासाठी अंधेरी पश्चिमेकडील नरेश मेस्त्री मूर्तिकराने गणेशोत्सव मंडळांना पर्यावरण पूरक मूर्तीचा पर्याय दिला आहे. कागद, शाडूची माती, डिंक, पाणी यांचे मिश्रण करून फायबरच्या साच्यामध्ये टाकून गणपतीचा आकार देण्यात येतो. या मूर्तीचा समुद्रात विसर्जन केल्यानंतर अवघ्या तीन ते चार तासात विरघळून जाते. विशेष म्हणजे या मिश्रणापासून कितीही फूट उंच मूर्ती बनवणे शक्य असल्याचे मूर्तिकाराचे म्हणणे आहे. पण या मूर्तीचा खर्च पीओपी मूर्तीपेक्षा ४० ते ५० हजारांनी जास्त असणार आहे.
हेही वाचा 

Lok Sabha Elections 2024 : १ कोटी मतदार ठरविणार मुंबईतील ११६ उमेदवारांचे भवितव्य
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेदिवशी ‘लोकल’मधून पडून ५ मुंबईकरांनी गमावला होता जीव
मविआच्या काळात मुंबईच्या विकासाला खीळ : पंतप्रधान मोदी