हैदराबाद प्ले-ऑफमध्ये; पावसामुळे गुजरातविरुद्धचा सामना रद्द

हैदराबाद; वृत्तसंस्था : सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध गुजरात टायटन्स हा सामना पावसामुळे रद्द करावा लागला. सामना निकाली न झाल्याने दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण देण्यात आला. हा एक गुणच सनरायझर्स हैदराबादसाठी प्ले-ऑफमध्ये पोहोचण्यासाठी पुरेसा होता. ते 15 गुणांसह तिसर्‍या स्थानावर पोहोचले असून त्यांचा अजून एक सामना बाकी आहे. उद्या होणार्‍या चेन्नई आणि आरसीबी यांच्यातील सामन्यानंतर प्ले-ऑफच्या …

हैदराबाद प्ले-ऑफमध्ये; पावसामुळे गुजरातविरुद्धचा सामना रद्द

हैदराबाद; वृत्तसंस्था : सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध गुजरात टायटन्स हा सामना पावसामुळे रद्द करावा लागला. सामना निकाली न झाल्याने दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण देण्यात आला. हा एक गुणच सनरायझर्स हैदराबादसाठी प्ले-ऑफमध्ये पोहोचण्यासाठी पुरेसा होता. ते 15 गुणांसह तिसर्‍या स्थानावर पोहोचले असून त्यांचा अजून एक सामना बाकी आहे. उद्या होणार्‍या चेन्नई आणि आरसीबी यांच्यातील सामन्यानंतर प्ले-ऑफच्या चौथ्या क्रमांकाची जागा नक्की होईल.
हैदराबादमध्ये गुरुवारी सकाळपासूनच पावसाची धाव सुरू होती पण, पावसाने काही काळासाठी विश्रांती घेतल्याने 8 वाजता टॉस होण्याची घोषणा झाली, पण कव्हर्स हटवायला सुरुवात होताच पावसाची पुन्हा एन्ट्री झाली आणि तो थांबलाच नाही. सततच्या पावसामुळे सामना खेळवणे शक्य नव्हते. त्यामुळे हा सामना रद्द करावा लागला. गुजरातचा हा सलग दुसरा सामना पावसामुळे रद्द करावा लागला आहे.
या सामन्यापूर्वी हैदराबाद 12 सामन्यांत 7 विजय मिळवून 14 गुणांसह चौथ्या क्रमांकावर होते. त्यांना उर्वरित दोन सामने जिंकून 18 गुणांसह क्वालिफायर 1 साठी दावा सांगण्याची संधी होती, पण आजची लढत रद्द झाल्याने त्यांना व गुजरात टायटन्सला प्रत्येकी 1 गुण मिळाले. त्यामुळे हैदराबाद 15 गुणांसह प्ले-ऑफसाठी पात्र ठरले आहेत. हैदराबादचा शेवटचा सामना पंजाबविरुद्ध आहे. तो सामना हैदराबादने जिंकला आणि राजस्थान आपला शेवटचा कोलकाताविरुद्धचा सामना हरले तर हैदराबाद दुसर्‍या स्थानावर येईल आणि त्यांना क्वालिफायर 1 मध्ये खेळण्याची संधी मिळेल.
हैदराबाद-गुजरात यांचा सामना रद्द झाल्याने दिल्ली कॅपिटल्सच्या उरलेल्या आशा पाण्यात मिळाल्या आहेत, तर लखनौ सुपर जायंटस् व गुजरात टायटन्स हेही स्पर्धेबाहेर फेकले गेले आहेत. मुंबई इंडियन्स व पंजाब किंग्स आधीच स्पर्धेबाहेर गेले आहेत. त्यामुळे चेन्नई आणि आरसीबी यांच्यातील सामन्यानंतर प्ले-ऑफच्या चौथ्या क्रमांकाची जागा नक्की होईल.