‘निळवंडे’च्या उजव्या कालव्यातून अखेर सोडले पाणी; आ. तनपुरे यांच्याकडून पाइपची व्यवस्था

‘निळवंडे’च्या उजव्या कालव्यातून अखेर सोडले पाणी; आ. तनपुरे यांच्याकडून पाइपची व्यवस्था

राहुरी : Bharat Live News Media वृत्तसेवा : राहुरी तालुक्यातील जिरायती गावांना तारणहार ठरणार्‍या निळवंडे उजव्या कालव्यातून आवर्तन सोडण्याचा निर्णय प्रशासनाने आज घेतला. पाणी येताच आ. तनपुरे यांनी कणगर येथे शेतकर्‍यांसह जाऊन पाटबंधारे विभागाच्या अधिकार्‍यांना सूचना केल्या. शेतकर्‍यांना कालव्यातून पाणी मिळावे म्हणून आ. तनपुरे यांच्याकडून पाईप व्यवस्था करण्यात आली. राहुरी परिसरातील जिरायत गावांना पाण्याबाबत मोठ्या अडचणी निर्माण होत आहे. पाणी नसल्याने शेतकरी चिंताक्रांत असतानाच निळवंडेच्या उजव्या कालव्यातून पाणी मिळावे यासाठी शेतकर्‍यांकडून मागणी होत होती. आ. तनपुरे यांनी पाटबंधारे व महसूल प्रशासनाशी संवाद साधत हे पाणी सोडण्याची मागणी केली. शेतकर्‍यांना न्याय न दिल्यास आंदोलनाचा इशारा दिला होता.
अखेरीस शेतकर्‍यांना न्याय मिळत निळवंडेच्या उजव्या कालव्यातून राहुरी परिसरात पाणी दाखल होताच शेतकर्‍यांनी समाधान व्यक्त केले. आ. तनपुरे यांनी वडनेरचे किरण गव्हाणे, कनगर येथील अनिल घाडगे, नवनाथ मुसमाडे, भाऊसाहेब आडभाई, प्रकाश नालकर, वसंत घाडगे, चिंचविहिरे येथील शब्बीर पठाण, भगीरथ नरोडे यांसह निळवंडे उजव्या कालव्याच्या शेवटच्या टोकापर्यंत पाहणी केली. कणगर येथे शेतकर्‍यांच्या समस्या जाणून घेतल्या. आवर्तन प्रत्येक शेतकर्‍याला लाभावे म्हणून पाटबंधारे प्रशासनाने नियोजन करण्याबाबत उपयुक्त सूचना आ. तनपुरे यांनी केल्या. कालव्यातून शेतकर्‍यांना पाणी मिळावे यासाठी आ. तनपुरे यांच्या सहकार्याने पाईपची उपलब्धता आ. तनपुरे यांच्याकडून करण्यात आली.
दुष्काळात शेतकर्‍यांना आधार
आग ओकणार्‍या उन्हाने सर्वाधिक त्रास शेतकर्‍यांना होत आहे. शेती पिकांसह जित्राबांचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न भेडसावत असताना जिरायती पट्ट्यातील शेतकर्‍याच्या तोंडाला पाने पुसली गेली होती. निळवंडेच्या उजव्या कालव्याचे पाणी ऐन दुष्काळात उपलब्ध झाल्याने संबंधित शेतकर्‍यांना लाभ होणार असल्याचे समाधान वाटत असल्याचे आ. प्राजक्त तनपुरे यांनी सांगितले.
हेही वाचा

ऐन उन्हाळ्यात शेततळी ठरताहेत वरदान; इंदापूरमधील फळबागांना फायदा
दूध पिण्यातही असावी मर्यादा; होऊ शकतात दुष्परिणाम
काचेवर हातोडीने तडे देऊन बनवली पोर्ट्रेट्स्!