अखेर बारामतीत धोकादायक होर्डिंग उतरविण्यास पालिकेकडून सुरुवात..!

अखेर बारामतीत धोकादायक होर्डिंग उतरविण्यास पालिकेकडून सुरुवात..!

बारामती : Bharat Live News Media वृत्तसेवा : बारामती शहर व परिसरात असलेल्या विनापरवाना, धोकादायक होर्डिंग्जबाबतचे वृत्त दै. ‘Bharat Live News Media’मध्ये बुधवारी (दि. 15) प्रसिद्ध झाले. त्यानंतर नगरपरिषदेने याबाबत कार्यवाहीला सुरुवात केली. धोकादायक होर्डिंग क्रेनच्या साह्याने उतरविले जात आहेत. नागरिकांनी या कारवाईबाबत समाधान व्यक्त केले. बारामती शहर, एमआयडीसी व परिसरात अनेक होर्डिंग विनापरवानगी लावण्यात आलेले आहेत.
भव्य-दिव्य असणार्‍या या होर्डिंगमुळे मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मुंबईत नुकतीच होर्डिंगची दुर्घटना घडली. बारामतीतही सोमवारी रात्री जोरदार वादळी वारे व पावसामुळे अनेक होर्डिंगचे कापड फाटून रस्त्यावर आले. पालिकेने यासंबंधीचा धोका ओळखून लागलीच कार्यवाहीला सुरुवात केली आहे. शहरातील धोकादायक होर्डिंगचे सांगाडे क्रेनच्या साह्याने उतरविले जात आहेत.
होर्डिंगचे नव्याने स्ट्रक्चरल ऑडिट करा
दरम्यान, जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी जिल्ह्यातील पालिका, ग्रामपंचायतींना यासंबंधी पत्र देत तत्काळ उपाययोजना करण्याचे आदेश दिले आहेत. सर्व होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडिट नव्याने करून 15 दिवसांच्या आत अहवाल सादर करावा. स्ट्रक्चरल ऑडिट न केलेली सर्व होर्डिंग अनधिकृत समजून संबंधित अधिकार्‍यांनी त्यांना नोटिसा देऊन ते तत्काळ काढून टाकण्याची कार्यवाही करावी. धोकादायक, वाहतुकीस अडथळा ठरणार्‍या होर्डिंगवर तातडीने कारवाई करावी तसेच या कामाचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करावा, असे पत्र डॉ. दिवसे यांनी दिले आहे.
बारामती शहरात 50 हून अधिक होर्डिंगधारकांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. धोकादायक होर्डिंग काढून टाकण्याचे काम क्षेत्रीय अधिकार्‍यांकडून बुधवारपासून सुरू करण्यात आले आहे. ज्या होर्डिंगधारकांनी परवानगी घेतलेली नाही, त्यांच्यावर कायद्यानुसार दाखल होईल. त्यात होर्डिंग लावणारे व मालक यांचा समावेश असेल. याशिवाय ज्या इमारतीवर ही होर्डिंग उभारली गेली आहेत, त्या मिळतकधारकाच्या घरपट्टीत त्याची कर आकारणी केली जाईल.
– महेश रोकडे, मुख्याधिकारी, बारामती नगरपरिषद.

हेही वाचा

अपक्षांना मिळणाऱ्या मतांवर ठरणार नाशिकचे गणित
जलसंपदा विभागाच्या जागेत होर्डिंगरूपी यमराज..!
Peregrine Falcon : रॉकेटच्या वेगाने शिकार करणारा पक्षी