अखंडित वीजपुरवठादार होणार केव्हा?

अखंडित वीजपुरवठादार होणार केव्हा?

राजेंद्र जोशी

कोल्हापूर : सन 1791 ते 1867 या काळात विस्मयकारक शोध लावणार्‍या, लोहाराच्या घरात जन्मलेल्या मायकेल फॅरेडे याने प्रवाही विजेचा (करंट इलेक्ट्रिसिटी) शोध लावला. यानंतर भारतात वीजनिर्मितीला चालना मिळाली असली, तरी विजेच्या गुणवत्तेवर तेवढा विचार झाला नव्हता आणि महाराष्ट्रात तर त्याकडे आजही गांभीर्याने पाहिले जात नाही. जगामध्ये वीजनिर्मितीच्या क्षेत्रात गुणवत्तापूर्ण आणि अखंडित वीज (क्वॉलिटी अँड अनइंटरप्टेड पॉवर) ही संकल्पना रुजवून काही दशके उलटली आहेत; पण आजही पायाभूत सुविधांच्या देखभाल दुरुस्तीत मागे आहोत. मग ज्यांना या उच्च दर्जाची वीज लागते, असे सेमीकंडक्टर उत्पादनांचे प्रकल्प महाराष्ट्रात येणार कसे, हा प्रश्न आहे.
जगभरात सेमीकंडक्टर चिप्सचा तुटवडा निर्माण झाल्यानंतर वाहननिर्मिती उद्योग (अ‍ॅटोमोबाईल इंडस्ट्री) मोठ्या प्रमाणात अडचणीत सापडला होता. याच काळात भारत सरकारने सेमीकंडक्टर निर्मितीला प्राधान्य दिले. ‘मेक इन इंडिया’ प्रकल्पांतर्गत सरकार मदतीचा पाठिंबा घेऊन उभे होते. अशा काळात काही जगविख्यात कंपन्यांनी भारतामध्ये असे प्रकल्प उभारण्यासाठी तयारी दाखविली आणि प्रकल्प प्रवर्तकांचे पाय गुजरात, तमिळनाडूकडे वळले. याची राजकारणात ओरड होणे स्वाभाविक होते. मोदी-शहांनी प्रकल्प गुजरातकडे वळविल्याची आरोळीही ठोकली गेली. विरोधकांनी तापलेल्या तव्यावर आपली राजकारणाची पोळी भाजूनही घेतली; पण त्यामागे गुणवत्तापूर्ण व अखंडित वीजपुरवठ्याचा अभाव हे प्रमुख कारण होते, ते गुलदस्त्यातच राहिले आणि भारत सेमीकंडक्टर निर्मितीचा हब होताना त्या प्रकल्पांच्या नकाशावर महाराष्ट्र दिसत नाही. याला महाराष्ट्राची विजेच्या पायाभूत सुविधांच्या अत्याधुनिकीकरणाविषयी असलेली अनास्था आणि या क्षेत्रात बोकाळलेला अपरिमित भ्रष्टाचार सर्वाधिक जबाबदार आहे, हे जोपर्यंत आपण समजून घेणार नाही, तोपर्यंत सेमीकंडक्टरच काय, अशा प्रकारच्या विजेची मागणी असणारे प्रकल्प महाराष्ट्रात पाय ठेवू शकणार नाहीत. मग राजकीय ओरड करून केवळ घसे सुकतील. पण औद्योगिक विकासाचा मार्ग काही खुला होणार नाही.
महाराष्ट्राच्या औद्योगिक विकासाला खिळ घालण्यास खंडित विजेचा पुरवठा प्रमुख कारणांपैकी एक कारण आहे. जगभरात काय चालले आहे, यापेक्षा कोल्हापुरात याविषयी प्रभावीपणे मांडण्याचे काम 25 वर्षांपूर्वी एक तरुण अभियंता करीत होता. ऑल इंडिया पॉवर फेडरेशनचे अध्यक्ष, सब ऑर्डिनेट इंजिनिअर्स असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत माने यांनी यामागे आपली ताकद पणाला लावली होती. विद्युत अभियांत्रिकीमध्ये हर्मोनिक्स आणि पॉवर पोल्युशन,पॉवर फॅक्टर हे विषय घेऊन त्यांनी गुणवत्तापूर्ण विजेच्या निर्मितीचा पुरस्कार केला होता. विजेची बचत म्हणजेच विजेची निर्मिती, अशा आशयाची छोटी भित्तीपत्रके शाळा-शाळांमध्ये वाटून किशोरवयीन मुलांमध्ये विजेविषयी जागृती निर्माण करणारा हा अवलिया इथवर थांबला नाही, तर वीज क्षेत्रातील उपकरण खरेदीमधील हजारो कोटींचा भ्रष्टाचार त्यांनी चव्हाट्यावर आणला. अशा सुमार दर्जाच्या उरकरणांमुळे भारतात विजेची गुणवत्ता हरवली आहे, असे त्यांचे मत होते. (उत्तरार्ध)
भोळ्या आशेवर राहण्यात अर्थ नाही
विद्युत अभियांत्रिकीमध्ये एक उत्तुंग व्यक्तिमत्त्व म्हणून परिचित असलेल्या श्रीकांत माने यांना सेवानिवृत्तीनंतर अवघ्या काही महिन्यांत हृदयरोग आणि कर्करोगाने जखडले. त्यात त्यांची जीवनयात्रा संपली; पण त्यांनी घालून दिलेल्या मार्गावरून चालण्याचे धाडस ना कोणी अभियंत्याने केले, ना त्यांच्या विचाराकडे महाराष्ट्राने गांभीर्याने पाहिले. यामुळेच महाराष्ट्र वीज निर्माण करतो, गेल्या 10 वर्षांत स्थापित क्षमतेत वाढ झाली; पण गुणत्तापूर्ण वीज निर्माण करण्यात आपण अपयशी ठरलो, हे वास्तव स्वीकारून आता पुढे जाण्याची गरज आहे. अन्यथा, प्रकल्प अन्य राज्यांत गेले म्हणून केवळ मोर्चे काढून ते परततील, या भोळ्या आशेवर राहण्यात काही अर्थ नाही.