अल्पवयीन मुलीवर नराधम बापाचा अत्याचार; आरोपी अटकेत
अमरावती; Bharat Live News Media वृत्तसेवा : जन्मदात्या बापानेच अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यात उघड झाली आहे. तेरा वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी मोर्शी पोलिसांनी 14 मे रोजी आरोपी वडिलाविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.
पोलीस सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार, 29 एप्रिल रोजी सायंकाळी पीडित अल्पवयीन मुलगी घरी एकटीच होती. या दिवशी तिची आई स्वयंपाकासाठी बाहेर गेलेली होती. त्यामुळे घरात एकट्याच असलेल्या अल्पवयीन मुलीकडे वडिलाने नको ती मागणी केली. मुलीने नकार देताच तिला चाकूने भोसकून ठार मारण्याची धमकी दिली. त्यामुळे मुलगी प्रचंड घाबरली. या अवस्थेतच अल्पवयीन मुलीवर नराधम बापाने अत्याचार केला.
त्यामुळे ती अल्पवयीन मुलगी रडायला लागली. त्यावर त्या नराधमाने पुन्हा तिला जीवे मारण्याची धमकी दिली. हा प्रकार नेहमी होत असल्याने अखेर त्या मुलीने धाडस दाखवत आपल्या एका नातेवाईक महिलेकडे ही बाब बोलून दाखवली. हा संताप जनक प्रकार समजल्यानंतर नातेवाईक महिलेने मोर्शी ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीच्या आधारावर मोर्शी पोलिसांनी आरोपी वडिलाविरुद्ध बलात्कार, धमकी आणि बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. आरोपी अत्याचारी वडिलाला पोलिसांनी अटक केली आहे.