अकोला : मतमोजणीची पूर्वतयारी नियोजनपूर्वक करावी; निवडणूक निर्णय अधिकारी अजित कुंभार
अकोला, Bharat Live News Media वृत्तसेवा : अकोला लोकसभा मतदारसंघासाठी मतमोजणी एमआयडीसी फेज-4 परिसरातील महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ येथे (दि.4) जून रोजी सकाळी 8 वाजता सुरू होणार आहे. यासाठी नियुक्त अधिकारी व कर्मचाऱ्यांनी निवडणूक आयोगाच्या सुचनेप्रमाणे प्रत्येक कार्यवाही नियोजनपूर्वक व काटेकोरपणे पार पाडावी, असे निर्देश निवडणूक निर्णय अधिकारी अजित कुंभार यांनी आज (दि.15) अकोला येथे दिले.
निवडणूक निर्णय अधिकारी कुंभार म्हणाले की, संपूर्ण मतमोजणी प्रक्रियेचे नियोजन, नियंत्रण आणि अंमलबजावणी काटेकोरपणे व्हावी. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार प्रत्येकाने आपापली जबाबदारी समन्वयाने पार पाडावीत. निवडणूक कामात कुठेही अडथळा निर्माण होवू नये. तसे कुठे आढळल्यास संबंधितांवर लोकप्रतिनिधित्व अधिनियमानुसार कारवाई करण्यात येईल.
मतमोजणीच्या अनुषंगाने नोडल अधिकारी आणि सहाय्यक अधिकाऱ्यांची बैठक जिल्हाधिकारी कुंभार यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन भवनात झाली, त्यावेळी ते बोलत होते. उपजिल्हा निवडणूक अधिकारी महेश परंडेकर, उपजिल्हाधिकारी अनिल माचेवाड व सर्व नोडल अधिकारी, तसेच सहायक अधिकारी उपस्थित होते.
मतमोजणी स्थळी त्रिस्तरीय सुरक्षा व्यवस्था
मतमोजणी केंद्र आणि परिसरात त्रिस्तरीय सुरक्षा व्यवस्था तैनात करण्याचे आदेश जिल्हाधिकारी कुंभार यांनी दिले आहेत. मतमोजणी केंद्राच्या 100 मीटर परिसरात मोबाईल किंवा इलेक्ट्रॉनिक वस्तु घेवून जाता येणार नाहीत. तपासणी काटेकोरपणे व्हावी व त्यासाठी चोख बंदोबस्त असावा, असे आदेश कुंभार यांनी दिले. ईव्हीएम मतमोजणी केंद्रात पाठवणे, फेरीनिहाय आकडेवारीची अचूक नोंद, मतमोजणी तक्त्याचे संकलन, आवश्यक साहित्याचा पुरवठा आदी बाबी दक्षतापूर्वक पार पाडाव्यात, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.
मतमोजणी स्थळी मीडिया कम्युनिकेशन सेंटर तयार करून माध्यमांना फेरीनिहाय माहिती आणि आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. मतमोजणी केंद्रात पोलीस बंदोबस्त, मंडप व्यवस्था, स्वच्छतागृहे, पार्किंग, एक दिवस आधी मुक्कामी राहण्याची आवश्यकता असलेल्यांना निवासव्यवस्था आदी बाबी सुसज्ज करण्याचेही निर्देश त्यांनी दिले.
संपूर्ण मतमोजणी प्रक्रियेचे समन्वयन, देखरेख आदी जबाबदारी अपर जिल्हाधिकारी रामदास सिद्धभट्टी यांना देण्यात आली आहे. सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी संदीपकुमार अपार यांना टपाली मतपत्रिका प्रशिक्षण, तसेच डॉ. शरद जावळे यांना प्रत्यक्ष टेबलवरील आणि व्हीव्हीपॅट स्लीप प्रशिक्षणाची जबाबदारी देण्यात आली आहे. टपाली मतपत्रिका मोजणीसाठी अतिरिक्त सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून विजय पाटील यांना जबाबदारी देण्यात आली आहे. जिल्हा माहितीविज्ञान अधिकारी अनिल चिंचोले, श्रीनिधी वाजपेयी यांच्याकडे ईटीपीबीएस प्रशिक्षण, रॅन्डमायझेशन आदी जबाबदारी आहे.
हेही वाचा :
अल्पवयीन मुलीवर नराधम बापाचा अत्याचार; आरोपी अटकेत
Uddhav Thackeray | माझ्या भोवती शिवसेना प्रमुखांचे कवच
New Delhi : भाजपला बीएमसी निवडणूक हरण्याची भिती वाटते का? काँग्रेसचा सवाल