निपाणीत पावसामुळे ३० विद्युत खांब जमीनदोस्त; शहर रात्रभर अंधारात

निपाणीत पावसामुळे ३० विद्युत खांब जमीनदोस्त; शहर रात्रभर अंधारात

निपाणी: मधुकर पाटील ; काल सोमवारी सायंकाळी ६ ते रात्री ९ या वेळेत तीन तास झालेल्या विजांच्या कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे निपाणी शहर व परिसरात सुमारे ३० विद्युत खांब मोडून उन्मळुन पडले. तर लहान-मोठी १०० झाडे मुख्य रस्त्यासह संपर्क रस्त्यावर कोसळल्याने जनजीवन विस्कळीत झाले.
यामध्ये यरनाळ रोडला लागून असलेला कोंबडी फार्म उध्वस्त झाला. तर बेळगाव नाका येथील माऊली रेडियम शॉपीवर झाड कोसळल्याने दोन्ही ठिकाणचे सुमारे १० लाखाचे नुकसान झाले. सोमवारी सायंकाळी ६ पासून वीज पुरवठा खंडित झाल्याने संपुर्ण शहर रात्रभर अंधारात राहिले. शिवाय मंगळवार दिवसभरही वीज पुरवठा खंडित झाला होता. त्यामुळे वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी हेस्कॉमला तारेवरची कसरत करावी लागली.
गेल्या काही दिवसापासून वातावरणात उष्म्याचे प्रमाण अधिक जाणवत होते. उष्माने नागरिकांच्या अंगाची लाही-लाही होऊन जीव कासावीस होत होता. तर, अती उष्म्यामुळे नागरिक हैराण झाले होते. त्यामुळे एखादा वळीवचा पाऊस पडावा अशी अपेक्षा नागरिकांची होती. सोमवारी अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांना सुखःद धक्का मिळाला.
सोमवारी सकाळपासूनच हवेत अधिक उष्मा जाणवत होता. सायंकाळी सहानंतर गारपिटासोबत वादळी वाऱ्यासह वळीव पावसाने दमदार हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसामुळे सर्वांना दिलासा मिळाला. दरम्यान या काळात विजांचा कडकडाट व वादळी वाऱ्यामुळे अनेकांच्या घरावरील पत्रे उडून गेले, तर कौले फुटली तसेच यरनाळ रोड येथील संदीप शेटके यांच्या मालकीचा कोंबडी फार्म वादळी वाऱ्यामुळे उद्ध्वस्त झाला. यावेळी कोंबडी फार्म वरील पत्रे उडून गेल्याने मोठे नुकसान झाले. शिवाय ६०० पक्षी गतप्राण झाल्याने सुमारे शेटके यांचे ५ लाखाचे नुकसान झाले.
तर बेळगाव नाका येथे असलेल्या अमोल माहूरकर यांच्या मालकीच्या माऊली रेडियम शॉपीवर उंबराचे झाड कोसळल्याने मशिनरी व इतर साहित्याचे सुमारे ५ लाखाचे नुकसान झाले. याशिवाय अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडल्याने तर विद्युत खांब कोसळल्याने तब्बल २४ तास वीज पुरवठा खंडित झाला. त्यामुळे जनजीवन विस्कळीत होऊन नागरिकांची गैरसोय झाली. यामध्ये एकूण २ कोटीचे नुकसान झाले आहे.
यामध्ये अनेक ठिकाणचे संपर्क रस्ते परिस्थिती नागरिकांना रात्र जागून काढावी लागली. यामध्ये अनेक ठिकाणचे संपर्क रस्ते पावसामुळे बंद झाले. शिवाय सखल भागात पाणीच पाणी साचून राहिल्याने नागरिकांची गैरसोय झाली. तसेच वीज पुरवठा खंडीत झाल्याने नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागले. विशेष म्हणजे, सोमवारी सायंकाळी झालेला पाऊस शिवारात असलेल्या ऊस पिकाला फायद्याचा ठरला आहे.
३० हून अधिक ठिकाणी विद्युत खांब कोसळले
सोमवारी सायंकाळी अचानकपणे वादळी वारे व मेघगर्जनेसह पाऊस झाला. या काळात शहरासह ग्रामीण भागात १०० हून अधिक ठिकाणी झाडे उन्मळून पडली. तर फांद्या विद्युत खांबावर पडल्याने वीज पुरवठा खंडित झाला. यामध्ये निपाणी परिसरात एकाच रात्री ३० हून अधिक ठिकाणी विद्युत खांब पडले. यामध्ये १५ खांब पूर्णपणे निकामी झाले. मात्र, तरीही दुपारनंतर अनेक भागात विज पुरवठा सुरळीत करण्यात आला. दरम्यान नागरिकांनीही आपल्या परिसरातील झाडे, वेली यांचा त्रास विद्युत तारांना होत असेल तर त्याचा वेळीच बंदोबस्त करून घ्यावा शिवाय याची माहिती द्यावी.