धुळ्यात अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांच्या टपाली मतदानास सुरुवात

धुळ्यात अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांच्या टपाली मतदानास सुरुवात

धुळे Bharat Live News Media वृत्तसेवा- धुळे लोकसभा मतदारसंघासाठी 20 मे रोजी मतदान होणार आहे. मतदानाच्या दिवशी अत्यावश्यक सेवेत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी भारत निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार जिल्हा माहिती अधिकारी कार्यालयातील तळमजला लगतची उजवीकडील खोली क्रमांक 1 (माध्यम कक्ष) जिल्हाधिकारी कार्यालय आवार, धुळे येथे ‘टपाली मतदान कक्ष (पोस्टल वोटींग सेंटर) स्थापन करण्यात आला आहे. त्याठिकाणी आज सकाळी 9.00 वाजेपासून अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांच्या टपाली मतदानास सुरुवात झाली. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अभिनव गोयल यांनी आज सकाळी या कक्षास भेट देवून पाहणी केली. (Lok Sabha Election 2024)

यावेळी उपजिल्हाधिकारी (प्रशासन) तथा नोडल अधिकारी संदीप पाटील, नायब तहसिलदार पंकज पाटील, मतदान केंद्र अधिकारी प्रमोद पाटील आदि उपस्थित होते.  जिल्हाधिकारी श्री.गोयल यांनी टपाली मतदान कक्षास भेट देवून टपाली मतदान प्रक्रियेची माहिती घेतली तसेच उपस्थितीत अधिकारी व कर्मचाऱ्यांना आवश्यक त्या सुचना दिल्या. Lok Sabha Election 2024

धुळे लोकसभा मतदार संघ निवडणूकीसाठी मतदानाच्या दिवशी अत्यावश्यक सेवेत कार्यरत असलेल्या मतदारांना मतदानाचा हक्क टपाली मतपत्रिकेद्वारे बजावता यावा, यासाठी जिल्हा माहिती अधिकारी कार्यालय, माहिती व जनसंपर्क भवन, तळमजला लगतची उजवीकडील खोली क्रमांक 1 (माध्यम कक्ष) जिल्हाधिकारी कार्यालय आवार, धुळे येथे दिनांक 14 ते 16 मे या कालावधीत सकाळी 9 ते सांयकाळी 5 वाजेपर्यंत टपाली मतदानाची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. धुळे लोकसभा मतदार संघात धुळे जिल्ह्यातील 1091 तर 8 इतर जिल्ह्यातील असे एकूण 1099 अत्यावश्यक सेवेत कार्यरत अधिकारी, कर्मचाऱ्यांनी टपाली मतपत्रिकेद्वारे मतदान करण्यासाठी नोंदणी केली आहे.  आज दुपारी बारा वाजेपर्यंत 67 अत्यावश्यक सेवेतील अधिकारी, कर्मचारी यांनी आपला मतदानाचा हक्क बजावल्याची माहिती नोडल अधिकारी संदिप पाटील यांनी दिली आहे. तसेच नोंदणी केलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या कालावधीत आपला मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन जिल्हाधिकारी  गोयल यांनी केले आहे.

हेही वाचा –

Home Voting Malegaon: मालेगाव बाह्य मतदारसंघात २१ ज्येष्ठांनी केले मतदान
निपाणी शहराला वादळी पावसाचा तडाखा; इमारतींच्या छतांचे नुकसान; झाडे पडून वीजपुरवठा खंडित
महायुतीचे उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडून येतील : मंत्री दिलीप वळसे पाटील