ईव्हीएम ठेवलेल्या गोदामाचे सीसीटीव्ही बंद; शरद पवारांच्या पक्षाकडून आरोप
पुणे : बारामती लोकसभा मतदारसंघाच्या गोदामात ठेवलेल्या ईव्हीएम तसेच अन्य यंत्रांच्या सुरक्षेसाठी असलेल्या सीसीटीव्ही फुटेजवरून वाद झाला आहे. गोदामातील सीसीटीव्ही फुटेज सुमारे पाऊण तास बंद असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या बारामती लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांनी केला आहे. मात्र, केवळ टीव्ही स्क्रीन बंद पडले होते. सीसीटीव्ही सुरू होते, असे स्पष्टीकरण बारामतीच्या निवडणूक निर्णय अधिकारी कविता द्विवेदी यांनी दिले आहे.
बारामती लोकसभेसाठी 7 मे रोजी मतदान झाले आहे. त्यानंतर ईव्हीएम मशिन सुरक्षितरीत्या गोदामात ठेवण्यात आल्या आहेत. सुरक्षितरीत्या ठेवलेल्या गोदामातील सीसीटीव्ही सुमारे पाऊण तास बंद पडल्याचा आरोप सुळे यांचे निवडणूक प्रतिनिधी लक्ष्मीकांत खाबिया यांनी केला आहे. याबाबत द्विवेदी यांच्याकडे लेखी तक्रारही केली आहे, तर सुळे यांनी अशा महत्त्वाच्या ठिकाणचे सीसीटीव्ही बंद असणे संशयास्पद असल्याचा आरोप केला आहे.
याबाबत त्यांनी सोशल मीडियावरील पोस्टमध्ये हा प्रक्रार निष्काळजीपणाचा असल्याचा आरोपही केला आहे. तक्रार केल्यानंतर संबंधितांकडून योग्य उत्तर मिळाले नसल्याचेही त्यांनी सांगितले. या ठिकाणी एकही तंत्रज्ञ उपस्थित नव्हता. तसेच तक्रारीनंतरही आमच्या प्रतिनिधींना गोदामात सोडले नाही. हा प्रकार गंभीर असून, केंद्रीय निवडणूक आयोगाने यात तातडीने लक्ष द्यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.
या ठिकाणी इलेक्ट्रिशियन काम करीत होता. त्याने या टीव्हीची केबल काढल्याने स्क्रीनवरील डिस्प्ले काही काळासाठी बंद होता. मात्र, सीसीटीव्ही सुरूच होते. याचे फुटेज कायम आहे. आता टीव्ही स्क्रीनवरील डिस्प्ले सुरू करण्यात आले आहे.
– कविता द्विवेदी, निवडणूक निर्णय अधिकारी
हेही वाचा
बुद्धिप्रामाण्यवादी छत्रपती संभाजी महाराज
रत्नागिरी : ‘कासव संवर्धन’ला तापमानवाढीचा फटका
यड्रावमध्ये अपघातात महिला ठार