जळगावमध्ये गेल्या निवडणुकीपेक्षाही यंदा मतदानाचे मीटर डाऊन

जळगावमध्ये गेल्या निवडणुकीपेक्षाही यंदा मतदानाचे मीटर डाऊन

जळगाव : Bharat Live News Media वृत्तसेवा
जिल्ह्यामधील लोकसभेच्या चौथ्या टप्प्यासाठी सोमवार (दि.१३) रोजी मतदान झाले. सकाळपासून नागरिकांनी मतदानासाठी लांबचलांब रांगा जरी लावलेल्या तरी मतदानाचा टक्का हा गेल्या निवडणुकीपेक्षा कमी झाला आहे. येथे सर्वाधिक फटका जळगाव लोकसभेला बसलेला आहे तर रावेर लोकसभेमध्ये तर थोडा फरकाने कमी आहे. जळगाव लोकसभेमध्ये 53.65 टक्के मतदान झालेले आहे तर रावेर लोकसभेमध्ये 61.36 टक्के मतदान झालेले आहे.
लोकसभा निवडणुकीच्या जळगाव व रावेर लोकसभेच्या निवडणुकीसाठी सोमवार (दि.१३) रोजी मतदान प्रक्रिया पार पडली. यामध्ये रावेर लोकसभेत 61.36% मतदान झाले आहे तर जळगाव लोकसभेमध्ये 53.65 टक्के मतदान झालेले आहे. जिल्हा प्रशासनाने विविध उपाय करून व विविध प्रबोधनात्मक कार्यक्रम तालुका स्तरावर आयोजन करूनही गेल्या निवडणुकीपेक्षा मतदानाचा टक्का हा कमीच राहिला आहे. यामध्ये 2019 मध्ये जळगाव लोकसभेमध्ये 56.12 टक्के मतदान झाले होते तर 2024 मध्ये 53.65 टक्के मतदान झालेले आहे. 2.47 टक्के मतदान या निवडणुकीत कमी झाले आहे. रावेर लोकसभेमध्ये 2019 च्या निवडणुकीत ६१.४० टक्के मतदान झालेले होते तर 2024 च्या निवडणुकीत 61. 36 टक्के झाले आहे. एकंदरीत यावर्षी 0.04 टक्के मतदान कमी झालेले आहेत.
जळगाव लोकसभा

अमळनेर 53.65
चाळीसगाव 52
एरंडोल 55.90
जळगाव सिटी 50.34
जळगाव ग्रामीण 58
पाचोरा 57.45

जळगाव लोकसभेमध्ये चाळीसगाव हा भाजपाचे आमदार मंगेश चव्हाण यांच्या मतदारसंघ असल्यावर या मतदारसंघातून 52 टक्के मतदान झाले. जळगाव सिटी या विधानसभा क्षेत्रावर भाजपाचे विद्यमान आमदार राजू मामा भोळे आहेत. ते नगरसेवक असून त्यांचे बहुमत असूनही जळगाव सिटी मधून 50.34 टक्केच मतदान झालेले आहे. जळगाव लोकसभेमध्ये सर्वाधिक कमी मतदान हे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नामदार अनिल भाईदास पाटील यांच्या विधानसभा मतदारसंघातून 46.20 टक्के मतदान झाले आहे.
रावेर लोकसभा

भुसावळ 57.33
चोपडा 61.20
जामनेर 60.18
मलकापूर 65.56
मुक्ताईनगर 62.56
रावेर 61.72

रावेर लोकसभा मतदारसंघांमध्ये सर्वात कमी मतदान हे भाजपाचे आमदार संजय सावकारे असलेल्या भुसावळ विधानसभा क्षेत्रातून 57.33 टक्के मतदान झालेले आहे. त्यानंतर राज्याचे संकटमोचक म्हणून प्रसिद्ध असलेले जामनेर विधानसभा क्षेत्राचे आमदार असलेले राज्याचे नामदार गिरीश महाजन यांच्या विधानसभा क्षेत्रामध्ये 60.18 टक्के मतदान झालेले आहे.
जिल्हा प्रशासनाने यावेळी व्हिडिओ व ऑडिओ तसेच पथनाट्य प्रत्यक्ष मतदारांच्या घरी जाऊन पत्र अनेक विविध प्रकारच्या योजनांमधून मतदारांना मतदान करण्यासाठी आवाहन केले होते. असे करूनही अपेक्षित तेवढे मतदानाचा टक्का वाढविण्यात यश आले नाही. मतदारांचे प्रबोधन करूनही मतदारांनी जिल्हा प्रशासनाला अपेक्षित प्रतिसाद दिलेला दिसून येत नाही.
38 उमेदवारांचे भविष्य ज्या ईव्हीएम मशीन मध्ये बंद झालेले आहे. ती यंत्रणा सोमवार (दि.१३ रात्री तालुकास्तरावर जमा होऊन जळगाव येथील स्ट्रॉंग रूम मध्ये ठेवण्यात आलेल्या सीआरपीएफ यांच्याकडे कडेकोट बंदोबस्तात ठेवण्यात आलेले आहेत. आता या ईव्हीएम मशीन मतमोजणी चार जून रोजी उघडण्यात येणार आहेत.