वाचाळांना आवरा!

देशावर दीर्घकाळ सत्ता गाजवणार्‍या काँग्रेस पक्षाच्या नेत्यांना झाले आहे तरी काय, असा प्रश्न पडावा अशी आजची स्थिती आहे. देशात निवडणुकीचा ज्वर टिपेला असताना मतांच्या ध्रुवीकरणासाठी जणू स्पर्धाच लागली आहे! ती इतक्या टोकाला गेली आहे की, आपण कोणत्या बाजूचे आहोत वा कोणाचे मीठ खात आहोत, याचे साधे भानही कोणाला राहिल्याचे दिसत नाही. त्या नादात पाकिस्तानचे उघड …

वाचाळांना आवरा!

देशावर दीर्घकाळ सत्ता गाजवणार्‍या काँग्रेस पक्षाच्या नेत्यांना झाले आहे तरी काय, असा प्रश्न पडावा अशी आजची स्थिती आहे. देशात निवडणुकीचा ज्वर टिपेला असताना मतांच्या ध्रुवीकरणासाठी जणू स्पर्धाच लागली आहे! ती इतक्या टोकाला गेली आहे की, आपण कोणत्या बाजूचे आहोत वा कोणाचे मीठ खात आहोत, याचे साधे भानही कोणाला राहिल्याचे दिसत नाही. त्या नादात पाकिस्तानचे उघड समर्थन या नेत्यांकडून सुरू आहे. भारतातील नेत्यांना पाकिस्तानचे नाव सांगून धमकावण्याचे निंदनीय प्रकार सुरू आहेत. आणि हे सारे कोणाची तरी भलावण करण्यासाठी, एका वर्गाला सुखावण्यासाठी! पण त्याने काहीच फरक पडणार नाही, या वास्तवाशीही त्यांना काही देणेघेणे नसावे. वास्तविक रास्त मुद्दे जनतेसमोर नेऊन सत्तापालट करण्याची संधी काँग्रेसचा समावेश असलेल्या इंडिया आघाडीला आहे; परंतु देशाच्या सामान्य माणसाशी नाळ तुटल्याने काँग्रेसमधील आत्मविनाशी प्रवृत्ती वारंवार डोके वर काढत असतात.
‘इंडियन ओव्हरसीज काँग्रेस’चे अध्यक्ष आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे मार्गदर्शक सॅम पित्रोदा यांनी एका मुलाखतीत ईशान्य भारतातील लोकांना ‘चिनी’ आणि दक्षिणेकडच्या लोकांना ‘आफ्रिकन’ ठरवून टाकले! अमेरिकेत एखाद्याच्या मृत्यूनंतर 55 टक्के संपत्ती सरकारजमा होते; पण भारतात असा कोणताही कर नाही, असे उद्गार पित्रोदांनी काढले. म्हणजे काँग्रेसने सत्तेवर आल्यावर करांची अशीच करवत चालवावी, असा संदेशच जणू त्यांनी दिला. त्यापूर्वी 1984 च्या शीखविरोधी दंगलीचा उल्लेख करून, ‘हुआ तो हुआ’ असे म्हणत त्यांनी नव्या वादाला जन्म दिला. त्यानंतर महाराष्ट्रातील विरोधी पक्षनेते काँग्रेसचे विजय वडेट्टीवार यांनी, शहीद हेमंत करकरे यांचा मृत्यू पाकिस्तानी दहशतवादी कसाबच्या गोळीने झालेला नाही, तर तो संघाशी निष्ठा असलेल्या पोलिस अधिकार्‍याच्या गोळीने झाला, असे संतापजनक उद्गार काढले. एकप्रकारे, काँग्रेस पक्ष पाकिस्तानचीच भाषा बोलत असल्याचा आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्यावर केला. यामुळे समाधान झाले नाही म्हणून की काय, ज्येष्ठ काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांनी पुन्हा अक्कल पाजळली.
एका मुलाखतीत ते म्हणाले की, पाकिस्तानकडे अणुबाँब असल्याने, भारताने त्याचा आदर केला पाहिजे; अन्यथा पाक भारतावर अण्वस्त्रहल्ला करण्याचा विचार करू शकतो. तसेच दहशतवादी कारवाया करतो, म्हणून आम्ही पाकिस्तानशी चर्चाच करणार नाही, ही भूमिका योग्य नसल्याचे तारेही त्यांनी तोडले. वास्तविक मणिशंकर यांना थोडा इतिहास समजावून सांगितला पाहिजे. 1974 मध्ये इंदिरा गांधी यांच्या सरकारने केलेल्या पहिल्या अणू चाचणीतून भारताची अण्वस्त्रक्षमता सिद्ध झाली, तर वाजपेयी पंतप्रधान असताना 1998 च्या दुसर्‍या चाचणीद्वारे भारताची अण्वस्त्रसज्जता सुस्पष्ट झाली. 11 मे 1998 रोजी पोखरण येथे एकूण तीन चाचण्या घेतल्या गेल्या. त्यापैकी एक हायड्रोजन बाँबची होती. त्यानंतर दोन दिवसांनी शास्त्रज्ञांनी आणखी दोन अण्वस्त्र चाचण्या घेतल्या.
वाजपेयींनी भारत अण्वस्त्रधारी देश झाल्याची घोषणा केली; पण भारताकडून अण्वस्त्रांचा प्रथम वापर केला जाणार नाही, याची ग्वाहीही दिली. या चाचण्यांनंतर अमेरिका व अन्य पाश्चात्त्य देशांनी भारतावर अनेक निर्बंध लादले. भारताने या अणुचाचण्या करण्याअगोदर पाकिस्तानने ‘घौरी’ या 1500 किलोमीटर पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी केली होती. त्यामुळे भारताच्या अणुस्फोट चाचण्यांना एक कारणही मिळाले होते. मग पाकिस्ताननेही 28 मे, 1998 रोजी बलुचिस्तानातील चगाई टेकड्यांच्या परिसरात 6 अणू चाचण्या घेतल्या. खरे तर पहिल्या चाचणीच्या वेळीही इंदिरा गांधी यांनी शांततामय मार्गाने अणुऊर्जेचा वापर करण्याचे धोरण जाहीर केले होते. त्यांच्या पुढाकारातून 1984 मध्ये अर्जेंटिना, ग्रीस, मेक्सिको, स्वीडन, टांझानिया व भारत या पाच खंडांतील 6 देशांनी एकत्र येऊन आण्विक निःशस्त्रीकरणासाठी प्रयत्न सुरू केले होते.
उलट पाकिस्तानने केवळ भारतावर डोळे वटारण्यासाठीच अणुचाचण्या केल्या. एवढेच नव्हे, तर अब्दुल कादिर खान या पाकिस्तानच्या अणुवैज्ञानिकाने गुप्तपणे अण्वस्त्रे तयार करून, ती इराण व उत्तर कोरियालाही निर्यात केली होती. आंतरराष्ट्रीय दबाव आल्यानंतर 31 जानेवारी, 2004 रोजी खान यांना अटक करण्यात आली; पण त्याच्या दुसर्‍याच दिवशी त्यांना पाकिस्तानचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांनी माफी दिली व केवळ नजरकैदेत ठेवले.
पाकिस्तान हे एक बेजबाबदार राष्ट्र आहे आणि उद्या दहशतवाद्यांच्या हातात अण्वस्त्रे पडल्यास अनवस्था उद्भेवल, यात शंका नाही; परंतु म्हणून पाकिस्तनाचा सन्मान करण्याची मणिशंकर यांची भाषा समर्थनीय नाही. ज्या देशातील दहशतवाद्यांनी भारतावर आक्रमणे केली, जम्मू-काश्मीरपासून मुंबईपर्यंत ठिकठिकाणी बाँबहल्ले घडवले, त्या देशाचा आदरसन्मान कशासाठी करायचा? आज भारताची अर्थव्यवस्था जगात पाचव्या क्रमांकाची असून, भारतावर अण्वस्त्रे डागण्याची हिंमत पाकिस्तान करूच शकणार नाही. मणिशंकर व त्यांचे दिल्ली किंवा मुंबईतील पंचतारांकित वर्तुळातील बुद्धिमंत मित्र पाकिस्तानचे गोडवे गात असतात; परंतु त्यात अर्थ नाही.
जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला हेसुद्धा तोंडाळ गृहस्थ म्हणून प्रसिद्ध आहेत. पाकिस्तानने बांगड्या भरलेल्या नाहीत, त्याच्याकडेही अणुबाँब आहे, असे बेलगाम वक्तव्य अब्दुल्ला यांनी केले. आपण कोणत्या देशाचे नागरिक आहोत, याचा त्यांना विसर पडला असावा. एकीकडे पाकव्याप्त काश्मीर आज ना उद्या भारतात विलीन करून घेतला जाईल, तो तर आपलाच अविभाज्य भाग आहे, अशी भूमिका एनडीए सरकारमधील काही मंत्री खंबीरपणे मांडत असतानाच, मणिशंकर व फारुख यांच्यासारखे नेते मात्र पाकिस्तानचा बागुलबुवा दाखवत आहेत. काँग्रेस नेत्यांच्या तोंडी ही भाषा शोभणारी नाही. शेजारी राष्ट्रांमध्ये तरी अण्वस्त्र स्पर्धा असता कामा नये आणि अण्वस्त्र युद्ध हे विनाशाकडे घेऊन जाणारे आहे, हे खरेच; परंतु म्हणून देशाच्या मनोधैर्याचे खच्चीकरण करण्याचे काम कोणीही करू नये. या बेलगाम नेत्यांना वेळीच आवर घालण्याची गरज आहे.