गरीब कुटुंबातील महिलेला वार्षिक १ लाख रुपये मिळतील : सोनिया गांधी
नवी दिल्ली, Bharat Live News Media वृत्तसेवा : लोकसभा निवडणुकीत मतदारांना आकर्षित करण्यासाठी काँग्रेसकडून विविध आश्वासने देण्यात येत आहेत. पक्षाचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी तरुण आणि गरीबांना काँग्रेस सोबत जोडण्याची जबाबदारी उचलली आहे. तर यूपीए अध्यक्षा सोनिया गांधी आणि पक्षाच्या सरचिटणीस प्रियंका वाड्रा महिलांना काँग्रेसच्या बाजूने करण्याचे काम करत आहेत. चौथ्या टप्प्यातील निवडणुकीमध्ये सोनिया गांधींनी महिला मतदारांना आकर्षित करण्यासाठी काँग्रेसच्या ‘महालक्ष्मी’ योजनेतून गरीब कुटुंबातील एका महिलेला दरवर्षी १ लाख रुपये दिले जातील, या घोषणेचा पुनरुच्चार केला.
काँग्रेसच्या ‘महालक्ष्मी’ योजनेतून गरीब कुटुंबातील एका महिलेला दरवर्षी १ लाख रुपये मिळणार
सोशल मीडिया ‘एक्स’च्या माध्यमातून व्हिडीओ पोस्ट करत सोनिया गांधींनी दिली माहिती
काँग्रेसचा हात महिलांची परिस्थिती बदलण्याची सोनिया गांधींनी दिली ग्वाही
काँग्रेसच्या जाहीरनाम्यातील आश्वासने देशातील महिलांपर्यंत पोहोचवण्यासाठी सोनिया गांधींनी पुढाकार घेतला आहे. त्यांनी सोशल मीडिया ‘एक्स’च्या माध्यमातून व्हिडीओ पोस्ट करत महिलांना आपला संदेश दिला आहे. सोनिया गांधींनी म्हटलंय की, ‘आज महागाईच्या काळात आपल्या महिला संकटाचा सामना करत आहेत. त्यांच्या मेहनतीला आणि तपश्चर्येला न्याय देण्यासाठी काँग्रेसने क्रांतिकारी पाऊल उचलले आहे. ‘महालक्ष्मी’ योजनेच्या माध्यमातून गरीब कुटुंबातील महिलेला दरवर्षी १ लाख रुपये दिले जाणार आहेत. या कठीण काळात काँग्रेसचा हात तुमच्या पाठीशी आहे. काँग्रेसचा हात तुमची परिस्थिती बदलेल, अशी ग्वाही मी देऊ इच्छिते.’ असे आश्वासन त्यांनी दिले आहे.
त्यांनी पुढे म्हटलंय की, स्वातंत्र्याच्या लढ्यात आणि आधुनिक भारताच्या उभारणीत महिलांचे मोठे योगदान आहे. काँग्रेसच्या गॅरंटीने कर्नाटक आणि तेलंगणातील कोट्यवधी कुटुंबांचे जीवन आधीच बदलले आहे. मनरेगा असो, माहितीचा अधिकार असो, शिक्षणाचा अधिकार असो किंवा अन्न सुरक्षा असो, काँग्रेस पक्षाने आपल्या योजनांद्वारे कोट्यवधी भारतीयांना बळ दिले आहे. महालक्ष्मी योजना ही महिलांसाठी न्याय देणारी योजना आहे.’
दरम्यान, राहुल गांधी यांनी सोनिया गांधींचा संदेश एक्सवर पोस्ट केला आहे. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हणले आहे की, गरीब कुटुंबातील महिलांनी हे लक्षात ठेवावे की, तुमचे एक मत म्हणजे दरवर्षी तुमच्या खात्यात १ लाख रुपये जमा होतील. महागाई आणि बेरोजगारीमध्ये झगडणाऱ्या महिलांसाठी काँग्रेसची महालक्ष्मी योजना जीवनदायी ठरणार आहे. दरमहा ८,५०० रुपये थेट बँक खात्यात आल्याने देशातील महिला आर्थिक अवलंबित्वातून मुक्त होतील आणि स्वत:च्या कुटुंबाचे भाग्य लिहितील. यासाठी तुम्ही मतदान करा आणि परिस्थिती बदला. असे आवाहन त्यांनी केले आहे.