‘स्टार्टअप’च्या माध्यमातून हटवणार 25 हजार नादुरुस्त उपग्रह

‘स्टार्टअप’च्या माध्यमातून हटवणार 25 हजार नादुरुस्त उपग्रह

न्यूयॉर्क : पृथ्वीच्या चारही बाजूंनी 25 हजारहून अधिक नादुरुस्त उपग्रह व त्यांचे अवशेष फिरत आहेत. गत महिन्यातच फ्लोरिडातील एका घराच्या छतावर अशाच एका उपग्रहाचे भाग आदळले आणि यामुळे छताचे मोठे नुकसान झाले. अशीच मालिका कायम राहिली, तर 2035 नंतर अशा तुकड्यांमुळे दरवेळी किमान एका व्यक्तीचा बळी जाण्याची भीती आहे. या पार्श्वभूमीवर अंतराळातील नादुरुस्त उपग्रह व त्यांचे अवशेष हटवण्यासाठी स्टार्टअपच्या सहाय्याने नवी मोहीम राबवली जाणार आहे. यासाठी नॉर्वे, जपान, अमेरिका व फ्रान्स आदी देशांनी वेगवेगळ्या मोहिमा आखल्या आहेत.
नॉर्वेयन स्टार्टअप सोलस्ट्रॉर्मने छोट्या उपग्रहामध्ये ड्रॅग सेल किंवा ऑटो पॅराशूट लावण्यास सुरुवात केली आहे. या माध्यमातून सर्वप्रथम नादुरुस्त उपग्रहाचा वेग कमी केला जाईल आणि त्याचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर नादुरुस्त उपग्रह कोणत्याही नुकसानीशिवाय जळून जाईल किंवा पृथ्वीवर फेकला जाईल, याची तजवीज केली जाणार आहे.
जपानी कंपनी अ‍ॅस्ट्रोस्केल, क्लियरस्पेस रोबोटिक आर्मच्या साथीने उपग्रहांचे अवशेष शोधून काढेल आणि ते अंतराळातून बाहेर फेकले जातील, याची तजवीज केली जाईल. क्लियरस्पेस युरोपियन एजन्सीच्या साथीने अंतराळातील ई-वेस्टेज वायुमंडळाच्या दिशेने ढकलण्यासाठी टेटेकल्सची मदत घेतली जाणार आहे.ऑक्टोपससारखे हात असा टेेटेकल्सचा अर्थ होतो.
याशिवाय ऑटर या अमेरिकन मोहिमेंतर्गत स्टारफिश स्पेसने तयार केलेले उपकरण अंतराळात खराब उपग्रहांना चिकटून बसेल आणि त्यानंतर त्याला वायूमंडळाच्या समीप आणले जाईल. यासाठी हे उपकरण पृथ्वीच्या कक्षेत एका लक्ष्यापर्यंत पोहोचेल आणि इलेक्ट्रोस्ट्रटिक तंत्रज्ञानाने उपग्रहाच्या कचर्‍याला चिकटून जाईल, अशी याची रचना आहे.
डिटम्बलर हे फ्रान्सचे उपकरण अशा खराब उपग्रहांची फिरण्याची गती कमी करण्यावर भर देणार आहे. एअरबस एसईने गतवर्षी नोव्हेंबरमध्येच आपला डिटम्बलर लाँच केला आहे. हे उपकरण फ्रान्सच्या एका उपग्रहाशी जोडले गेले असून, त्याच्या माध्यमातून उपग्रहांची फिरण्याची गती नियंत्रणात ठेवली जाते. या उपकरणाचा व्यास केवळ 5 सेंटिमीटर्स इतका आहे. या उपकरणातील चुंबकीय प्रणालीच्या बळावर नादुरुस्त उपग्रह नियंत्रित केले जाण्याची योजना आहे. त्यानंतर ते परत आणण्याचाही प्रयत्न केला जाणार आहे.