RCB vs DC : ‘आरसीबी’ शर्यतीत कायम

बंगळूर, वृत्तसंस्था : रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने दिल्ली कॅपिटल्सवर (RCB vs DC) 47 धावांनी विजय मिळवून प्ले-ऑफच्या शर्यतीतील आपले स्थान टिकवून ठेवले. हा सामना जिंकला असता तर दिल्लीचे 14 गुण झाले असते आणि ते चौथ्या क्रमांकावर पोहोचले असते, शिवाय ‘आरसीबी’चे आव्हान संपुष्टात आले असते. परंतु, बेंगळुरूने सलग पाचवा विजय मिळवत सातव्या स्थानावरून पाचव्या स्थानावर झेप घेतली. …

RCB vs DC : ‘आरसीबी’ शर्यतीत कायम

बंगळूर, वृत्तसंस्था : रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने दिल्ली कॅपिटल्सवर (RCB vs DC) 47 धावांनी विजय मिळवून प्ले-ऑफच्या शर्यतीतील आपले स्थान टिकवून ठेवले. हा सामना जिंकला असता तर दिल्लीचे 14 गुण झाले असते आणि ते चौथ्या क्रमांकावर पोहोचले असते, शिवाय ‘आरसीबी’चे आव्हान संपुष्टात आले असते. परंतु, बेंगळुरूने सलग पाचवा विजय मिळवत सातव्या स्थानावरून पाचव्या स्थानावर झेप घेतली. ‘आरसीबी’ने प्रथम 9 बाद 187 धावा केल्या, आणि नंतर दिल्लीला 140 धावांत गुंडाळले. ‘आरसीबी’च्या रजत पाटीदारने 52 धावा केल्या. ऋषभ पंतवर एका सामन्याची बंदी घालण्यात आली असल्याने अक्षर पटेलने दिल्लीचे नेतृत्व सांभाळले.
चिन्नास्वामी स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात ‘आरसीबी’चे 188 धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या दिल्लीची अवस्था बिकट झाली. 3.3 षटकांत दिल्लीने 4 फलंदाज गमावले. त्यांनी 30 धावांपर्यंतच मजल मारली होती. यानंतर शाय होप आणि अक्षर पटेल यांनी डाव सावरला. फर्ग्युसनने होपला बाद करून ‘आरसीबी’च्या होप्स वाढवल्या. पाठोपाठ त्रिस्टन स्टब्ज धावचित झाला. यानंतर रसिख सलामने अक्षरला साथ दिली; पण तो 10 धावांवर बाद झाला. दरम्यान, अक्षरने जॅक्सला षटकार ठोकून 30 चेेंडूंत 50 चा आकडा मागे टाकला. अक्षर असेपर्यंत दिल्लीला विजयाची आशा होती. यश दयालने अक्षरचा प्रतिकार संपुष्टात आणला. त्याने 57 धावा केल्या. यानंतर दिल्लीचा संपूर्ण डाव 19.1 षटकांत 140 धावांत संपुष्टात आला. ‘आरसीबी’कडून यश दयालने 20 धावांत 3 विकेट घेतल्या.
तत्पूर्वी, अक्षरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. कर्णधार फाफ ड्युप्लेसिस (6) अपयशी ठरला आणि मुकेश कुमारने तिसर्‍या षटकात त्याची विकेट घेतली. विराट चांगली फटकेबाजी करत होता आणि त्याने 13 चेंडूंत 1 चौकार व 3 षटकारांसह 27 धावांची खेळी केली. इशांत शर्माने त्याची विकेट घेतली. विल जॅक्स व रजत पाटीदार यांचे झेल दिल्लीच्या खेळाडूंनी टाकले आणि हे दोन्ही झेल कुलदीप यादवच्या गोलंदाजीवर उडाले होते. (RCB vs DC)
मिळालेल्या संधीचे सोने करताना जॅक्स व पाटीदार यांनी दिल्लीच्या गोलंदाजांना झोडपले. पाटीदारने 29 चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. या दोघांनी 53 चेंडूंत 88 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. रसिख सलामने ही जोडी तोडली आणि पाटीदार 32 चेंडूंत 3 चौकार व 3 षटकारांच्या मदतीने 52 धावांवर झेलबाद झाला. त्यानंतर कुलदीपने ‘आरसीबी’चा सेट फलंदाज बाद केला. जॅक्सने 29 चेंडूंत 3 चौकार व 2 षटकारांसह 41 धावा केल्या. कुलदीपच्या 4 षटकांत 52 धावा कुटल्या गेल्या. खलील अहमदने 18 व्या षटकात महिपाल लोम्रोर (13) व दिनेश कार्तिक (0) यांना माघारी पाठवले. 19 व्या षटकात इम्पॅक्ट प्लेअर म्हणून आलेला स्वप्निल सिंग भोपळ्यावर रसिख सलामच्या गोलंदाजीवर बाद झाला. कॅमेरून ग्रीनने 24 चेंडूंत 1 चौकार व 2 षटकारांसह नाबाद 32 धावा करून ‘आरसीबी’ला 9 बाद 187 धावांपर्यंत पोहोचवले.
* विराटने दिल्लीविरुद्ध सर्वाधिक 1039* धावा करण्याचा विक्रम नावावर केला. रोहित शर्माला (1034) त्याने मागे टाकले.