सिन्नर एमआयडीसी बालकाचा खून; संशयितास अटक
सिन्नर; Bharat Live News Media वृत्तसेवा : सिन्नर येथील माळेगाव औद्योगिक वसाहतीत जुन्या वादातून एकाने दहा वर्षीय बालकाचा खून केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. पुरावा नष्ट करण्यासाठी बालकाचा मृतदेह झाडाझुडपात फेकून देण्यात आला होता. अभिषेक अच्छेलाल साह असे मृत बालकाचे नाव आहे.
याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून एका संशयितास अटक केली आहे. रमेश साह असे संशयिताचे नाव आहे. संशयित आरोपी व बालकाचे वडील अच्छेलाल साह हे दोघेही नातेवाईक आहेत. मुळचे बिहार येथील साह हे भगवती स्टील कारखान्यात कामास आहेत. त्यांच्यात दोन महिन्यांपूर्वी वाद झाला होता. वादानंतर रमेश साह बिहार येथे गेला होता. तेथून येताच संशयिताने अभिषेकचा शुक्रवारी (दि.10) खून केल्याची माहिती पोलिसांनी दिली. अभिषेकचा खूननंतर केल्यानंतर त्याचा मृतदेह खंडेराव मंदिराजवळील झाडांत टाकला. अभिषेकचा एक हात तोडलेला तर पोटावर चाकूचे वार होते. अभिषेक हरवला असल्याची तक्रार नातेवाईकांनी एमआयडीसी पोलिसांत केली होती.
निफाड विभागाचे पोलीस उपअधीक्षक डॉ. नीलेश पालवे, निरीक्षक यशवंत बाविस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार भगवान शिंदे, योगेश शिंदे, प्रकाश उंबरकर, प्रशांत सहाणे आदींचे पथक शोध घेत होते. त्यांना अभिषेकचा मृतदेह आढळला. त्यानंतर संशयितास अटक करण्यात आली. पोलीस निरीक्षक यशवंत बाविस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक सुरवाडकर यांच्यासह पथक घटनेचा कसून तपास करीत आहेत.