हार्दिकच्या नेतृत्वात अहंकार : डिव्हिलियर्स
नवी दिल्ली; वृत्तसंस्था : मुंबई इंडियन्सला ‘आयपीएल 2024’च्या प्ले-ऑफमध्ये स्थान मिळवण्यात अपयश आले आहे. त्यामुळे आता हार्दिक पंड्याच्या नेतृत्वावरही टीका केली जात आहे. दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार एबी डिव्हिलियर्सनेही त्याच्यावर टीका केली आहे. हार्दिकच्या नेतृत्वात अहंकार दिसून येतो, असे त्याने म्हटले आहे.
डिव्हिलियर्सने त्याच्या यूट्युब चॅनेलवर म्हटले की, हार्दिकने म्हटले आहे की तो एम. एस. धोनीप्रमाणे शांत आणि छाती पुढे काढून नेतृत्व करण्याचा प्रयत्न करतो. मात्र, ते प्रत्येकवेळी जमेलच असे नाही.
डिव्हिलियर्स म्हणाला, ‘हार्दिक पंड्याची नेतृत्व शैली अती धाडसी आहे. त्यात अहंकार भरलेला वाटतो. मला असे वाटत नाही की, त्याने मैदानावरील चालणे नेहमीच प्रामाणिक असते; पण त्याने ठरवले आहे की, माझी हीच नेतृत्वाची पद्धत आहे. ही शैली गुजरात टायटन्समध्ये फायदेशीर ठरली. कारण, तिथे युवा संघ होता. कधी-कधी अनुभव नसलेल्या खेळाडूंना अशा प्रकारच्या नेतृत्वाला फॉलो करायला आवडते.’
डिव्हिलियर्सने याबाबत स्वत:चा अनुभवही सांगितला आहे. त्याने सांगितले की, ‘मला आठवते ग्रॅमी स्मिथ संघात होता. तेव्हा एक युवा म्हणून मला त्याचे अनुकरण करायचे असायचे; पण आता संघात रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह असे खेळाडू आहेत. त्यांना फक्त इतके हवे असते की, तू शांत राहा आणि सामना कसा जिंकायचा हे आमच्यावर सोपव. त्यांना उगीच धाडसीपणा नको असतो.’
डिव्हिलियर्स पुढे म्हणाला, ‘मला आताचा हार्दिक पटत नाही. मला त्याला खेळताना पाहायला आवडते. त्याने निधड्या छातीने खेळणे मला आवडते. कारण, मीही तसाच होतो.