सेक्स स्कँडल! प्रज्वलचे कारनामे उघड, ‘त्या’ महिलांनी गाव सोडले

सेक्स स्कँडल! प्रज्वलचे कारनामे उघड, ‘त्या’ महिलांनी गाव सोडले

संजय सूर्यवंशी, बेळगाव

राजकारणी आणि त्यांचे अश्लील व्हिडीओ अशी प्रकरणे देशासाठी काही नवीन नाहीत. अशातच माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांचा नातू प्रज्वल रेवण्णाने केलेले सेक्स स्कँडल फक्त कर्नाटकच नव्हे तर देशाला हादरवून सोडणारे आहे. देशात आजपर्यंत घडलेल्या सेक्स स्कँडलमधील हे सर्वात मोठे अन् गंभीर प्रकरण म्हणायला हरकत नाही. प्रज्वल सापडला म्हणून चोर ठरला. परंतु, आजचे राजकारण अन् राजकारण्यांची घसरलेली पातळी पाहता असे डोमकावळे कमी नाहीत.
कर्नाटकातील राजकारणात गेली चार दशके हासन जिल्ह्यावर ज्यांचे प्रभुत्व आहे, ती व्यक्ती म्हणजे माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा. वक्कलिगा समाजाचे नेते आणि संपूर्ण घराणे राजकारणात यातून त्यांनी फक्त हासनवरच नव्हे तर संपूर्ण कर्नाटकात धर्मनिरपेक्ष जनता दल पक्षाच्या माध्यमातून आपले प्राबल्य निर्माण केले आहे. परंतु, गेल्या तीन आठवड्यांतील घडामोडी पाहता चार दशकांमध्ये देवेगौडांनी जे कमवले होते, ते नातवाने क्षणातच गमावले आहे. कारण त्यांचा नातू प्रज्वल रेवण्णाने स्वतःबरोबरच पक्षाची लक्तरेही वेशीवर टांगली आहेत. यामध्ये सध्या भाजपदेखील पिसला जात आहे.
वृद्धत्वामुळे देवेगौडा यांनी 2019 ची निवडणूक लढवणे टाळले आणि येथे नातू प्रज्वलला खासदारकीचे तिकीट मिळाले. अवघ्या 28 व्या वर्षी आजोबांच्या आणि बापजाद्याच्या पुण्याईने खासदारकी मिळालेला प्रज्वल बेफाम सुटला. त्याचा अनिर्बंध अन् उद्दाम आयुष्य जगण्याचा परिपाक म्हणजे तीन आठवड्यांपूर्वी उघडकीस आलेले सेक्स स्कँडल.
कर्नाटकातील पहिल्या टप्प्याची निवडणूक 26 एप्रिलला झाली. त्याच्या दोन दिवस आधीच हासन मतदारसंघातील प्रत्येक घरामध्ये अश्लील चित्रफिती व छायाचित्रे असलेले पेन ड्राईव्ह टाकण्यात आले. या पेन ड्राईव्हमध्ये प्रज्वलच्या एक-दोन नव्हे, तर तब्बल 2,976 अश्लील क्लिप व छायाचित्रे होती. हे सर्व व्हिडीओ आणि छायाचित्रे रातोरात सर्वत्र व्हायरल झाली. इतके होऊनही प्रज्वल विरोधात म्हणजेच देवेगौडा कुटुंबाविरोधात तक्रार देण्यासाठी कोणीही पुढे येत नव्हते. यावरून देवेगौडा कुटुंबीयांचा तेथे असलेला दबदबा स्पष्ट दिसून येतो. लेखिका व सामाजिक कार्यकर्त्या रूपा यांनी यासाठी पुढाकार घेतला. परंतु प्रज्वलच्या लैंगिक अत्याचाराला बळी पडलेली एकही महिला तक्रारीसाठी पुढे येत नव्हती. एक आली. पण, ती देखील घाबरून गाव सोडून पळून गेली. 24 एप्रिलला याची महिला आयोगाकडे तक्रार गेल्यानंतर महिला आयोगाच्या चेअरपर्सन नागलक्ष्मी शास्त्री यांनी चौकशीचे आदेश दिले. तरीही हजारावर महिलांपैकी कोणीही महिला तक्रार देण्यास पुढे येत नव्हती. परंतु, एका महिलेने धाडस दाखवत थेट मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन प्रज्वल रेवण्णा व त्याचे वडील एच. डी. रेवण्णा या बाप-लेकाविरोधात लैंगिक अत्याचाराची तक्रार दिली. केव्हा कुठे याची पहिली तक्रार दाखल झाली. राज्य शासनाने हे प्रकरण गांभीर्याने घेत एसआयटी नेमून चौकशीला प्रारंभ केला. चार दिवसांपूर्वी प्रज्वलचे वडील एच. डी. रेवण्णा यांना अटक झाली. प्रज्वल हा परदेशात पळून गेला असून तोही लवकरच हजर होईल. परंतु या सर्व घटनेने अश्लीलतेबाबत घसरलेल्या राजकीय पातळीचे सर्वसामान्यांना दर्शन घडवले आहे.
गतवर्षी एच. डी. रेवण्णाच्या विरोधात विधानसभा निवडणूक लढवणारे भाजपचे उमेदवार व वकील जी. देवराजगौडा हे निवडणूक हरले होते. साहजिकच त्यांना यावेळी भाजपकडून लोकसभेची उमेदवारी मिळावी, ही अपेक्षा असणार. परंतु, कर्नाटकात भाजप-धजद आघाडी झाली आणि त्यांची उमेदवारी हुकली. तेव्हापासून देवराजगौडा प्रज्वलविरोधात भाजपकडे तक्रारी करत आहेत. प्रज्वलचा वाहन चालक कार्तिक गौडा याचे म्हणणे आहे की, आपण सर्व व्हिडीओ व क्लिप्स फार आधी देवराजगौडा यांना दिलेल्या होत्या. एका पोलिस अधिकार्‍याच्या म्हणण्यावरून तर या व्हिडीओ क्लिप्स विधानसभा निवडणुकीपूर्वी देखील काही राजकारणाकडे होत्या. परंतु, तेव्हा प्रज्वल निवडणूक लढवणार नसल्याने त्या कोणीही व्हायरल केल्या नव्हत्या. या अश्लील चित्रफितीबाबत भाजपला माहिती होती. परंतु, धजद आघाडी आणि देवेगौडा व माजी मुख्यमंत्री कुमारस्वामी नातू व पुतण्याला तिकिटासाठी दबाव, यामुळे हतबल होऊन भाजपने तिकीट दिले खरे; पण संपूर्ण देशात आज भाजपचे नाव देखील विनाकारण खराब होत असल्याचे दिसून येते.
अनन्वित अत्याचार, महिलांनी गाव सोडले
प्रज्वलचे एकेक कारनामे पाहता तो विकृत मानसिकतेचा होता व आहे की काय असेच वाटते. कारण 2976 व्हिडीओ क्लिप्स आणि छायाचित्रे त्याने स्वतःच बनवलेली आहेत. त्याचे अन् वाहन चालक कार्तिक गौडा याचे भांडण झाल्यानंतर प्रज्वलने कार्तिक गौडाच्या घरात घुसून त्याच्या गर्भवती पत्नीला धक्काबुक्की केली. शिवाय कार्तिकलाही मारहाण करत त्याच्याकडून 10 एकर शेत लिहून घेतले, याचा रागही कार्तिकला होता. त्यामुळे त्याने वर्षापूर्वी प्रज्वलची नोकरी सोडली होती. परंतु, नोकरी सोडण्यापूर्वी त्याने प्रज्वलच्या मोबाईलमधील सर्व व्हिडीओ क्लिप्स आपल्या मोबाईलवर ट्रान्सफर करून घेतल्या होत्या. यामध्ये हजारावर महिला दिसून येतात.
गेल्या तीन वर्षांपासून प्रज्वल आपल्याला व आपल्या पतीला ब्लॅकमेल करून बलात्कार करत होता, अशी तक्रार गेल्या आठवड्यात एका जिल्हा पंचायत सदस्य महिलेने दिली. त्यानंतर प्रज्वलवर बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे. प्रज्वल राहात असलेल्या ठिकाणाहून काही अंतरावर एक फार्म हाऊस आहे. या फार्म हाऊसची संरक्षक भिंत आठ फूट उंचीची आहे. प्रज्वलने बहुतांशी महिलांना व तरुणींना या ठिकाणी नेऊन लैंगिक अत्याचाराबरोबरच व्हिडीओ केल्याचे समोर आले आहे. अशा शेकडो महिलांचे चेहरे या व्हिडीओमध्ये दिसत असल्याने त्या आपले घर आणि गाव सोडून परागंदा झाल्याचे दिसून येते. या एकूण प्रकरणात प्रज्वलची अब्रू वेशीवर टांगली आहे, देवेगौडांच्या पक्षाची इज्जत जितकी जायची होती तितकी गेली आहे. राजकारणात ती परत येईल अथवा न येईल हा भाग अलहिदा. परंतु, यामध्ये सापडलेल्या असंख्य महिलांचे भवितव्य मात्र टांगणीला लागले आहे.
त्या महिलांवर पतींचा संशय
प्रज्वल रेवण्णा खासदार असल्याने व सक्रिय राजकारणात असल्याने त्याच्यासोबत महिलांचा घोळका असणे स्वाभाविक होते. अनेक महिला व तरुणींनी त्याच्यासोबत सेल्फी घेतली होती. अनेक सभा-समारंभांमध्ये व कार्यक्रमांमध्ये फोटो काढले होते. प्रज्वलचे सेक्स स्कँडल उघडकीला येताच अनेकांनी आपल्या सोशल मीडियावरील छायाचित्रे व व्हिडीओ डिलिट केले आहेत. तरीही राजकारणात असलेल्या व प्रज्वलसोबत छायाचित्रे असलेल्या महिलांवर त्यांचे पती देखील संशय घेत आहेत. त्यामुळे या महिलांचे जीवन अवघड बनले आहे. जे गुप्तपणे व चार भिंतीच्या आत घडले होते ते आता असे चव्हाट्यावर आल्याने या महिलांना पतीसोबत संसार करणे, नातेवाईकांना तोंड दाखवणे व समाजात उघडपणे जगणे मुश्कील होऊन बसले आहे.
हेही वाचा : 

कर्जबाजारी भूषणला नको ती अवदसा आठवली अन्…
कुटुंब कलह : सहानुभूतीची महती!
आधी आईवर अतिप्रसंग, नंतर मुलीचा लैंगिक अत्याचार करुन गळा आवळला