नाशिक लोकसभा निवडणूक : माघारीनंतर रिंगणात ३१ उमेदवार
नाशिक : Bharat Live News Media वृत्तसेवा
नाशिक लाेकसभा मतदारसंघात सोमवारी (दि. ६) अर्ज माघारीच्या दिवशी राजकीय नाट्यानंतर पाच उमेदवारांनी माघार घेतली. माघार घेणाऱ्यांमध्ये प्रामुख्याने शिवसेनेचे विजय करंजकर, भाजपचे अनिल जाधव आणि राष्ट्रवादीचे निवृत्ती अरिंगळे यांचा समावेश आहे. त्यामुळे रिंगणात अंतिमत ३१ उमेदवार असले तरी महायुती, महाआघाडी, वंचित व अपक्ष शांतिगिरी महाराज यांच्यामध्ये प्रमुख चौरंगी लढत होईल.
नाशिक लोकसभा मतदारसंघात अर्जाच्या छाननीनंतर साऱ्यांच्याच नजरा या माघारीकडे लागल्या होत्या. जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी माघारीच्या वेळी अनेक राजकीय घडामोडी पाहायला मिळाल्या. माघारीवेळी पाच जणांनी माघार घेतली. मात्र त्यासाठी प्रमुख उमेदवारांना घाम गाळावा लागला. ठाकरे गटाकडून उमेदवारी न मिळाल्याने नाराज असलेल्या करंजकर यांनी अपक्ष अर्ज दाखल केला होता. मात्र, माघारीच्या पूर्वसंध्येला त्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश करत लोकसभेतून माघार घेतली. त्याचप्रमाणे भाजपने जाधव तर राष्ट्रवादी अजित पवार गटाने अरिंगळे यांची मनधरणी करत त्यांना निवडणूकीतून अर्ज माघारी घ्यायला लावले. त्यामुळे महायुतीचे गोडसे यांना काहिसा दिलासा मिळाला आहे. परंतु शांतिगिरी महाराज व सिद्धेश्वरानंद महाराज यांनी त्यांची अपक्ष उमेदवारी कायम आहे.
नाशिक लोकसभा मतदारसंघातून शांतिगिरी महाराजांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. महायुतीतून आपल्याला तिकीट मिळावे, अशी इच्छा शांतिगिरी महाराजांनी व्यक्त होती. मात्र हेमंत गोडसेंना उमेदवारी जाहीर करण्यात आली. त्यामुळे शांतिगिरी महाराज अपक्ष रिंगणात उतरले आहेत. मात्र, त्यांनी माघार घ्यावी यासाठी भाजपचे संकटमोचक तथा मंत्री गिरीश महाजन गेल्या आठवड्यात भेट घेतली. तर दुसरीकडे पालकमंत्री दादा भुसे यांनी सिद्धेश्वरानंद महाराजांची भेट घेत मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, या दोघांनाही उमेदवारी करण्याचा ठाम निर्णय घेतला आहे. त्यामूळे महायुतीच्या डोकेदुखीत काहीशी भर पडणार आहे
टेंन्शन व धावपळ
माघारीच्या दिवशी अखेरच्या दोन तासात खऱ्याअर्थाने सारे राजकीय घडामोडींना वेग आला. दुपारी पावणे दोन वाजता एक-एक करून उमेदवार माघारीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात प्रवेशकर्ते झाले. तोपर्यंत मात्र, प्रमुख राजकीय पक्षांचे पदाधिकारी, उमेदवार व त्यांचे समर्थक कार्यालयात तळ ठोकून होते. त्यांच्या चेहऱ्यावर टेंन्शन दिसून येते होते. भाजपाचे अनिल जाधव हे यांनी माघार घ्यावी, यासाठी खुद्द उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेतला. त्यानूसार माघारीसाठी काही मिनिटे शिल्लक असताना जाधव हे कार्यालयात पोहचले. यावेळी महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांनी जाधव यांना सोबत घेत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचे कार्यालय गाठले.
माघार घेणारे उमेदवार असे…
किसन शिंदे, विजय करंजकर, निवृत्ती अरिंगळे, शशिकांत उन्हवणे, अनिल जाधव
निवडणूक दृष्टीक्षेपात
एकूण उमेदवार ३९
पात्र उमेदवार ३६
अपात्र उमेदवार ३
माघारी ५
अंतिम उमेदवार ३१