130 वर्षांपर्यंत जगणार मनुष्य!

130 वर्षांपर्यंत जगणार मनुष्य!

बीजिंग : दीर्घायुष्य जवळपास प्रत्येकाला हवे असते. यासाठी अनेक जण आहारात बदल करतात, व्यायाम-कसरतीवर भर देतात. स्वत:ला तंदुरुस्त ठेवण्यासाठी हर तर्‍हेचे प्रयत्न करतात, पण एक खरे की अमरत्व कोणालाच प्राप्त नाही. अर्थात, दिर्घायुष्यासाठी अनेक प्रकारचे संशोधन, अभ्यास सुरू असतात आणि चीनमधील एका अभ्यासानुसार, तेथे रक्तात असे तत्त्व आढळून आले आहे, ज्यामुळे सर्वसाधारण व्यक्तीही किमान 130 वर्षांपर्यंत जगू शकेल!
नेचर एजिंग जर्नलमध्ये याबाबत एक शोधनिबंध प्रसिद्ध झाला आहे. चीनच्या संशोधकांनी यासाठी 840 दिवस उंदरांवर संशोधन केले. नर जातीचे उंदीर शोधून काढत त्यांना 20 महिन्यांचे असताना एका खास तत्त्वाचे इंजेक्शन देण्यात आले. यामुळे, उंदरांचे आयुष्य कमी असल्यासारखे भासू लागले, त्यांचे वृद्धत्व कमी झाले आणि सतत कार्यरत राहण्याची क्षमताही वाढली. त्यांचे आयुष्य यामध्ये 22.7 टक्यांनी वाढले, असे अभ्यासात आढळून आले.
या संशोधन पथकातील एक सदस्य झांग चेन्यू यांनी हा प्रयोग कसा राबवण्यात आला, याची सविस्तर माहिती दिली. ते म्हणाले, ‘जे उंदीर 840 दिवसांपेक्षा अधिक काळ जगू शकत नाहीत, त्यांचेच आयुर्मान अगदी 1266 दिवसांपर्यंत दिसून आले. या हिशेबाने मनुष्याच्या वयाचा विचार केला तर हे खास तत्त्वाचे इंजेक्शन घेतले आणि त्याचा अपेक्षित परिणाम झाला तर मनुष्याचे वय 120 ते 130 वर्षे सहज होऊ शकते. सध्या याचे इंजेक्शन तयार केले गेले असून परवानगी मिळाल्यास मनुष्याचे वय यामुळे वाढण्याची शक्यता आहे’.
या संशोधन पथकातील सदस्यांनी दिलेल्या माहितीनुसार, औषधाच्या माध्यमातून ते दिले जाऊ शकते. यामुळे, रक्त बदलण्याची गरज असणार नाही. उपचार अतिशय सहज व सोपे असतील. संशोधन पथकातील सदस्य चेन शी यांनी याबाबत बोलताना, ‘ईव्ही न्यू क्लिक अ‍ॅसिड व प्रोटीन्स पेशींमध्ये जातात, त्यावेळी ते मेंदूमध्ये सूचना पाठवतात. आम्हाला देखील याचमुळे संशोधनाची प्रेरणा मिळाली, असे नमूद केले.