‘महादेव अॅप’चा भूलभुलैया! साहिल खाननंतर आता कोणाचा नंबर?
सुनील सकपाळ, मुंबई
आजकाल देशभरात ‘महादेव अॅप’ प्रचंड चर्चेत आले आहे. ‘महादेव ऑनलाईन बेटिंग अॅप’ नेमके आहे तरी काय? भारतात याचे जाळे नेमके कसे पसरले? याच्यामागचा सूत्रधार कोण? असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. विशेष म्हणजे, या प्रकरणात बॉलीवूड कलाकारांची नावे चर्चेत यायला लागली आहेत. कृष्णा अभिषेक, पुलकित सम्राट, भारती सिंह, सनी लिओनीसह अनेक स्टार्स ‘ईडी’च्या रडावर आहेत. या सर्व कलाकारांना हवालाद्वारे कोट्यवधी रुपये देण्यात आल्याचा आरोप आहे. रणबीर कपूरवर महादेव ऑनलाईन बेटिंग अॅपच्या सपोर्टिंग अॅपची जाहिरात केल्याचा आरोप आहे. त्यामुळे साहिल खाननंतर आता कोणाचा नंबर लागतो? याचीच उत्सुकता आहे…(Mahadev betting app case)
ऑनलाईन बुकिंगद्वारे चालवल्या जाणार्या विविध गेममध्ये बेकायदेशीर सट्टेबाजी करणारे एक मोठे नेटवर्क म्हणजेच ‘महादेव ऑनलाईन बेटिंग अॅप!’ यात पोकर, पत्ते खेळ, क्रिकेट, बॅडमिंटन आणि टेनिस या खेळांसह सार्वत्रिक निवडणुकांच्या सट्टेबाजीला परवानगी देण्यापर्यंतही विस्तार केला गेला आहे. या अॅपच्या माध्यमातून मॅचफिक्सिंग, क्रिप्टो करन्सीद्वारे मनी लाँडरिंग आणि पॅनेलच्या मालकांना नफा आणि खेळाडूंचे मोठ्या प्रमाणात नुकसान करण्यासाठी हेराफेरी केल्याचा आरोप आहे.
दुबईमध्ये बसून सौरभ चंद्राकर आणि रवी उप्पल हे अॅप भारतात चालवत होते. छत्तीसगडसह भारतातील विविध राज्यांतील मोठ्या शहरांमध्ये या अॅपची सुमारे 30 कॉल सेंटर्स उघडण्यात आली होती. ही कॉल सेंटर अतिशय चलाखीने चालवली जात होती. सौरभ चंद्राकर आणि रवी उप्पल हे त्यांचे दोन जवळचे सहकारी अनिल आणि सुनील दम्मानी यांच्या मदतीने भारतात हे अॅप चालवत होते. अॅपचे संचालक हवालाच्या माध्यमातून छत्तीसगडमधील अनिल आणि सुनील दम्मानी यांना मोठी रक्कम पाठवत होते.
त्यानंतर, हे पैसे छत्तीसगड पोलिसांचे अधिकारी चंद्रभूषण वर्मा यांच्यापर्यंत पोहोचवण्यात येत असल्याचा आरोप आहे. छत्तीसगड पोलिसांमध्ये तैनात असलेले पोलिस अधिकारी, सरकारी अधिकारी आणि राजकीय प्रभाव असलेल्या व्यक्तीपर्यंत हे पैसे लाच म्हणून पोहोचवण्याची जबाबारी वर्मा याच्यावर होती. हवालाद्वारे हे पैसे रायपूर येथील सदर बाजारातील एका ज्वेलर्सकडे पाठवण्यात येत असल्याचा आरोप आहे. सर्वात प्रथम अनिल आणि सुनील दम्मानी यांच्या मदतीने केवायसीद्वारे मोठ्या प्रमाणात बेनामी बँक अकाऊंटस् उघडण्यात आली.
अॅप चालवण्यासाठी छत्तीसगडमधील पोलिस, राजकारणी आणि सरकारी अधिकार्यांना भागीदारी देण्यात आली होती. याप्रकरणी तपास यंत्रणांना 90 हून अधिक बनावट बँक खात्यांची माहिती मिळाली आहे. या बनावट खात्यांचा वापर सट्ट्याच्या रकमेची देवाण-घेवाण करण्यासाठी करण्यात आल्याचा पोलिसांना संशय आहे.
या बँक खात्यांबाबतची माहिती घेतली असता, त्यात 2000 कोटी रुपयांचे व्यवहार झाले आहेत. त्यातील 68 बँक खात्यांमधील 3.86 कोटी रुपये गोठवण्यात आले आहेत. याप्रकरणी यापूर्वी राजस्थान पोलिसांनी चार आरोपींना अटक केली होती. त्यांच्याकडून 20 हून अधिक डेबिट व क्रेडिट कार्ड जप्त करण्यात आली होती. ही बँक खाती सट्टेबाजी अॅप व्यवहारांसाठी वापरण्यात आल्याचा संशय आहे.
असे चालायचे रॅकेट!
‘महादेव बेटिंग अॅप’ने ग्राहकांना वेबसाईटवर किंवा व्हॉटस्अॅपवरून खेळाच्या लिंक देण्यात आल्या. त्या लिंकवर क्लिक केल्यानंतर कंपनीचे यूझर आयडी देण्यात आले. यूझर आयडी तयार झाल्यावर ग्राहकाला त्याच्या वॉलेटमध्ये पैसे भरावे लागत होते. या वॉलेटमधून सट्टा सुरू झाला. पैसे जिंकले तर ग्राहकाला ठरल्यानुसार पैसे मिळत होते. ‘अॅप’वरून वादंग निर्माण झाल्यानंतर कंपनीने आणखी काही ‘अॅप’ तयार करून त्याद्वारे व्यवहार केले.
‘अॅप’चा पैसा दिल्लीतील नेत्यांपर्यंत
महादेव अॅपच्या मालकाकडून छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांना 508 कोटी रुपये मिळाल्याचा आरोप केला जात आहे. यावरून अनेकांची चौकशी सुरू आहे. दिल्लीतील काही ज्येष्ठ नेत्यांना या पैशातील काही हिस्सा पाठविला जात होता, असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे. महादेव अॅपप्रकरणी आतापर्यंत कुणीही दिल्लीतील कनेक्शनवर चर्चा केली नव्हती. पंतप्रधान मोदी यांनी थेट गांधी कुटुंबाकडे या अॅपच्या काळ्या पैशाचे कनेक्शन दाखविले आहे.
72 तासांनंतर मुसक्या आवळल्या
याच प्रकरणी अभिनेता साहिल खान याला न्यायालयाने अटकपूर्व जामीन नाकारल्यानंतर तो 25 एप्रिलपासून फरार झाला. या कालावधीत त्याने 4 दिवसांत 6 राज्यांतून 1,800 कि.मी. प्रवास केला. पोलिसांना संशय येऊ नये म्हणून साहिल हा साध्या कपड्यात वावरत होता. राज्याबाहेर विमानाने जाण्याचा प्रयत्न केल्यास पोलिस पकडतील या भीतीने साहिल खान राज्याबाहेर खासगी गाडीने प्रवास करत होता. त्याने जवळपास चार दिवसांत सहा राज्यांतून दिवस-रात्र प्रवास केला.
साहिलची गाडी छत्तीसगड भागातील नक्षलवादी परिसरातून पुढे जाणार तोच चालकाने घाबरून रात्रीच्या वेळी नक्षली भागातून पुढे जाण्यास नकार दिला. नक्षलवादी भागातून रात्रीच्या प्रवासाला साहिल खानचा चालक घाबरला. त्यामुळे साहिल खानला छत्तीसगडच्या जगदलपूर परिसरातील आराध्य इंटरनॅशनल हॉटेलमध्ये थांबावे लागले. ही माहिती पोलिसांना मिळताच मागावर असलेल्या मुंबई पोलिसांनी त्याला गाठत शनिवारी रात्री ताब्यात घेतले. तब्बल 72 तास मुंबई पोलिस साहिल खानच्या मागावर होते. साहिलकडून पोलिसांनी दोन मोबाईल आणि काही कॅश जप्त केली आहे. चौकशीत सोमवारपर्यंत पोलिसांच्या हाती न लागण्याचा त्याचा कट होता. यासाठी महाराष्ट्राबाहेर साहिल पळत असल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकार्याने दिली. (Mahadev betting app case)
बॉलीवूड कनेक्शन
अॅपचा सूत्रधार सौरभ चंद्राकरने फेब्रुवारीमध्ये लग्न केले. दुबईत हा लग्नसोहळा पार पडला. त्यामध्ये परफॉर्म करण्यासाठी बॉलीवूडमधील अनेक कलाकारांना चार्टर्ड प्लेनने बोलावण्यात आले. त्यांच्यासोबतच पाकिस्तानी गायक राहत फतेह अली खान आणि आतिफ अस्लम यांनाही बोलावले होते. याप्रकरणी लवकरच ईडी आणखी काही कलाकारांना समन्स बजावू शकते, असे सांगितले जात आहे. कृष्णा अभिषेक, पुलकित सम्राट, भारती सिंह, सनी लिओनीसह अनेक स्टार्स ईडीच्या रडावर आहेत. या परफॉर्मन्सच्या बदल्यात सर्व कलाकारांना हवालाद्वारे कोट्यवधी रुपये देण्यात आल्याचा आरोप आहे. तसेच, रणबीर कपूरवर महादेव ऑनलाईन बेटिंग अॅपची जाहिरात केल्याचा आरोप आहे. दुबईतील परफॉर्मन्समध्ये सहभागी असलेले अनेक कलाकार ईडीच्या रडारवर असून, त्यांची चौकशी करण्यात येणार आहे. यापूर्वी गेल्या महिन्यात ईडीने वेगवेगळ्या ठिकाणी छापेमारी करून 417 कोटींची संपत्ती जप्त केली होती.